Madhmashi Sanshodhak Book Review :
पुस्तक : मधमाशी संशोधक
लेखक : सुनील पोकरे
प्रकाशन : गोडवा कृषी प्रकाशन, पुणे
पाने : ४८
मूल्य : ६० रुपये.
मधमाशी आज केवळ मधापुरती मर्यादित नाही. तर पिकांमध्ये परागीभवन करून उत्पादन वाढवण्यात तिचे योगदान मोलाचे आहे याबाबत अलीकडील काळात जागृती वाढली आहे. दिवसागणिक मधमाशीपालकांची संख्या वाढत आहे. मधमाश्यांच्या वसाहतींचे शास्त्रीयदृष्ट्या संगोपन, मधपेट्या निर्मिती, शेतकऱ्यांच्या शेतात त्या भाडेतत्त्वावर ठेवण्यास देणे, मध संकलन व ब्रॅंडद्वारे विक्री आदी व्यवसायांमधून अनेकांचे अर्थकारण उंचावत आहे ही सुखावणारी बाब आहे.
देशातील मध परदेशात निर्यात होत आहे. आज या उद्योगाची उल्लेखनीय वाटचाल असण्यामागे जी कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे संशोधक. ज्यांनी उभे आयुष्य मधमाशीपालनासाठी वेचून मोलाचे संशोधनकार्य केले आणि पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक पथ तयार केला.
पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त सहायक संचालक सुनील पोकरे यांनी मधमाशी संशोधक या पुस्तकाचे लेखन करून संशोधकांच्या कार्याला उजाळा दिला आहे. यंदाच्या वर्षी त्याचे प्रकाशन झाले आहे. सुमारे सोळा संशोधकांचा थोडक्यात परिचय यात दिला असून त्यात पाच परदेशी संशोधकांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यसेनानी सीताराम गंगाधर ऊर्फ बापूसाहेब शेंडे, डॉ. गोविंद देवडीकर, चिंतामण ठकार, डॉ. रघुनाथ फडके, डॉ. कमलाकर क्षीरसागर, डॉ. मंदा सूर्यनारायण, डी. बी. महिंद्रे, डॉ. विष्णू वाकणकर, अमृताराव घाडगे, वसंत दिवाण,
शिवाजी साळवी आदींच्या कार्याची महती त्यातून कळते. दरवर्षी २० मे हा जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. ज्यांच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस सुरू केला त्या एन्टोन जान्सा यांच्या कर्तृत्वाची झलकही पुस्तकात पाहण्यास मिळते.
संशोधकांचा हा प्रवास काळ अगदी १९१८, १९१९ या शतकांपासूनच आहे. त्यांनी आर्थिक बिकट परिस्थितीत, आजच्या तुलनेत अपुऱ्या साधनांमध्ये कष्ट वेचले, संघर्ष केला, अभ्यास केला त्यावरच मधमाशीपालनाचा पाया रचला गेला.
त्या आधारे आज आधुनिक मधमाशीपालन शास्त्राची व व्यवसायाची इमारत खंबीर उभी आहे. मधमाश्यांचे प्रकार, जीवनचक्र अभ्यासण्यासाठी त्यांना देशभरात प्रसंगी परदेशात जाऊन जंगले, वने, शेतांमधून भ्रमंती करावी लागली. तेथे दीर्घकाळ राहावे लागले.
मधमाश्यांची वसाहत लाकडी पेटीत बंद करणे म्हणजे दैवी संकट ओढवून घेणे अशी त्या काळात अंधश्रद्धा होती. ती दूर करून पेटीत त्यांचे शास्त्रीय पालन करण्याची वैज्ञानिक प्रथा या संशोधकांनी सुरू केली. मधमाश्यांचे अनुवंशशास्त्र, गुणसूत्रे जाणून घेतली. वसाहतींचे स्थलांतर तंत्रज्ञान शोधले.
मधुबन निर्मिती, राणीमाशी, कामकरी माशी आदींची वर्तनवैशिष्ट्ये, फुलोरी, जंगली, घुंघुरट्या, युरोपीय मधमाशा असे प्रकारानुसार संगोपन, खाद्य, परागकण, रोग, फुलोऱ्यासाठी वनस्पतींचा शोध, त्यांचे वर्गीकरण, मधाचा स्रोत ओळखणे, आदिवासी भागात जंगली मधमाश्यांचे पोळे न पिळता मध काढणे, आकर्षण फळीच वापर, शास्त्रीय पद्धतीने मध काढणे, मधमाश्यांना हाताळण्याचे साहित्य, पोशाख, उपकरणे असा ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिनाच या संशोधकांनी खुला केला.
मधमाश्यांची संवादशैली, वसाहतींचा अचूक अभ्यास, हाताने स्पर्श न होता स्वच्छ मध काढण्याची प्रक्रिया, आधुनिक पेट्यांची निर्मिती, धूरयंत्र अशा संशोधनकार्यातून मधमाशीपालनशास्त्राची प्रगती होत राहिली. केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता आदिवासी व शेतकऱ्यांचे संघटन, शास्त्रीय प्रशिक्षण, संस्थात्मक बांधणी, संशोधन प्रबंध व साहित्य लेखन याद्वारेही या शास्त्राला चालना मिळत राहिली.
आज पुणे येथे दिमाखाने उभ्या असलेल्या केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची जडणघडण अशाच संशोधकांच्या धडपडीतून झाली आहे. हा सारा मागोवा पुस्तकात संक्षिप्त रूपाने घेण्यात आला आहे. मधमाशीपालकच नव्हेत तर शेतकरी, अभ्यासक, प्रक्रिया उद्योजक, संशोधक, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था आदी सर्वांसाठीच हे पुस्तक प्रेरणादायी व मार्गदर्शन ठरणारे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.