Book Review : अस्वस्थ संवेदनांचे कृषिसूक्त...

Article by Jayshree Wagh : शेतकऱ्यांचे दुःख, दुष्काळ आणि वणवण यांना वाचा फोडणारे साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहे. पूर्वापार पाझरणाऱ्या लोकगीतांतून, ओव्यांतून शेतकऱ्यांच्या, त्याच्या कुटुंबीयांचे दुःख आपल्या पुढे येत होते.
Book Review
Book ReviewAgrowon
Published on
Updated on

जयश्री वाघ

जळताना भुई पायतळी (कवितासंग्रह)

कवी : तान्हाजी बोऱ्हाडे

काव्याग्रह : प्रकाशन

किंमत : १५०/-

शेतकऱ्यांचे दुःख, दुष्काळ आणि वणवण यांना वाचा फोडणारे साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहे. पूर्वापार पाझरणाऱ्या लोकगीतांतून, ओव्यांतून शेतकऱ्यांच्या, त्याच्या कुटुंबीयांचे दुःख आपल्या पुढे येत होते. कवितेकडून दरवेळी क्रांतीची अपेक्षा का करायची, तिने माणसाच्या मनावरचा प्रचंड भार थोडा हलका केला तरी खूप! अभिव्यक्तीच्या या प्रवाहात कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांचा ‘जळताना भुई पायतळी’ हा कवितासंग्रह नुकताच आला आहे.

हिरव्या, पोपटी कोंभांच्या लवलवणाऱ्या पात्यांतून विलसणारे भूमीचे आदिम मार्दव लोभसवाणे असते, यात काही शंकाच नाही. पण बदलत्या हवामानाच्या अस्मानी आणि मानवनिर्मित सुलतानी संकटांनी घामाचे योग्य दाम शेतकऱ्यांच्या पदरात पडणे मात्र एक स्वप्नच ठरले आहे. अशा वेळी ‘‘चाड्यावर पहिली मूठ ठेवताना/ बापाच्या चेहऱ्यावर उमटलीय / इंद्रधनुष्यासारखी सप्तरंगी रेखा’’ या ओळीतून कवी ‘इंद्रधनुष्यच ते, किती काळ टिकणार?’ हेही स्पष्ट करतो.

Book Review
Book Review : सकस चारा उत्पादन, प्रक्रिया तंत्र

‘‘आई सारवतेय मातीची प्राचीन दरिद्री भिंत / पुन्हा पुन्हा तिच्या अपराजित हातांनी’’ हात अपराजित असले तरी वारंवार ढासळणारा जगण्याचा बुरुज लिंपणार तरी किती?

शेतीतले मरणप्राय जगणे मांडतांना कवी म्हणतो, ‘‘आत्महत्येची चौकशी सुरू असताना शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला,

तुम्ही फक्त पंचनामा आणि पोस्टमॉर्टेम करून / आज त्याला मृत घोषित केलंत / माझा बाप तर या आधीच मेलेला होता /

फक्त आजवर त्यानं आपला मृत्यू जाहीर केला नव्हता.’’

जन्म सरतो तरी त्याला ‘जगणे’ सापडत नाही. त्याने रक्त आटवून पिकविलेल्या जोंधळ्याला कधी चांदणे लगडत नाही. आणि म्हणूनच आताच्या कागदावरच्या परीक्षा पास झालेल्या लेकरांना कष्ट करून मातीतून मोती पिकविण्याची गोष्ट आउटडेटेड वाटत असते.

‘‘नुसताच वाढत चाललाय बळीवंश / पण तयार होत नाहीत वारसदार / जे घट्ट पकडून ठेवतील / पायाखालची सरकणारी जमीन’’

त्यातच भर म्हणून अराजकाच्या या वर्तमानात तरुणाईच्या दिशाहीन भरकटण्याची सलही कवी आपल्या कवितेतून मांडतो. त्यांना ‘नवख्या अवखळ गोऱ्ह्यांची’ चपखल उपमा देत कवी म्हणतो, की ही कोणती पेरणी चालू आहे / आमच्या पोरांच्या डोक्यातल्या सुपीक जमिनीवर / जिचा कसलाही संबंध नाहीये / आमच्या शेतातल्या मातीशी / अन् पोरांच्या भविष्याशीही.

Book Review
Book Review : चिकित्सा मराठा समाजाच्या वर्चस्वाची

जागतिकीकरणामुळे मातीपासून मुळे तुटत चालल्याची खंत पुन्हा पुन्हा या कवितांतून उमटत राहते. पैशाची गणिते बांधावर पोचली नि माणसांची मने मात्र निर्जीव होत चालल्याची जाणीव कवीला अस्वस्थ करते. त्यातच श्रमजीवी इतिहासाची पाने चाळताना आपला निःशब्द झालेला बाप पाहून कवीला ही भीती दाटून येते की, आपला काळही आपल्यासारखाच कालबाह्य झाल्याची जाणीव तर त्याला होत नसेल?

मग आठवत राहतो त्याला एखाद्या ऐतिहासिक स्थळी पाहिलेला प्राचीन शिलालेख, त्याची भाषा त्याच्या अर्थासहित लुप्त झालेली, आपल्यापर्यंत पोहोचण्याआधीच काळाच्या गतिमान उदरात.

तरुण शेतकरी मुलांच्या लग्नाचे प्रश्‍न मांडणारी अप्रतिम कविता ‘रुक्षभूमी’, राबणाऱ्या हातांसाठी सुखाचे दान मागणारी आशादायी रचना ‘पसायदान’, कास्तकारांचा देव विठोबाशी जुळलेली नाळ वर्णन करणारा गोड अभंग ‘समाधी’, क्रांतीची भाषा बोलणारी रचना ‘ठिणगी’, ‘निरोप’ तसेच ‘निरुत्तर झालीय माती’ यांसारख्या अनेक कविता नेमक्या नि धारदार झाल्या आहेत. कविवर्य विठ्ठल वाघांच्या ‘वृषभसुक्त’चीच आठवण व्हावी, असे तान्हाजी यांचे हे शेतीमातीला वाहिलेले जणू कृषिसूक्तच!

‘शेती म्हणजे गुन्हा’ हे सांगताना उंबरठ्याशी येऊ घातलेल्या काळाचे सुतोवाच ही कविता करते. दागो काळे यांची प्रस्तावना, नजर खिळवून ठेवणारे दर्शन मांजरे यांचे मुखपृष्ठ आणि काव्याग्रह प्रकाशन यांच्या सहयोगातून निर्माण झालेले हे रसायन सहजासहजी, वाचल्याशिवाय बाजूला ठेवताच येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com