Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Article by Satish Kulkarni : आजवरच्या भारतीय विचार प्रणालीमध्ये वाद विवादाला मोठे स्थान होते. म्हणून बहुतांश भारतीय सनातन परंपरा (त्यात अगदी वेदांना मानणारे आणि न मानणारे अशा दोन्ही मुख्य परंपरा) सतत प्रवाही राहिल्या आहेत.
Book
Book Agrowon

Rigved Arthasar Book : पुस्तक : ऋग्वेद अर्थसार

लेखक : बापू भानुदास कुंभार

प्रकाशन : सकाळ मीडिया प्रा. लि., पुणे

पाने : २९३

मूल्य : ४७० रुपये

आजवरच्या भारतीय विचार प्रणालीमध्ये वाद विवादाला मोठे स्थान होते. म्हणून बहुतांश भारतीय सनातन परंपरा (त्यात अगदी वेदांना मानणारे आणि न मानणारे अशा दोन्ही मुख्य परंपरा) सतत प्रवाही राहिल्या आहेत. भारतीय विचार प्रणालीमध्ये उपनिषदे, त्याचे सार असलेली भगवद्‌गीता आणि ब्रह्मसूत्र यांचे प्रत्येक आचार्यांनी वेगळे अर्थ लावले.

ही जगण्याशी अधिक सुसंगत असे अर्थ लावण्याची सोय भारतीय दर्शनांमध्ये आहे म्हणूनच ती प्रवाही राहिल्याचे दिसते. त्या तुलनेमध्ये पाश्‍चात्त्यामध्ये त्या त्या विचारांचे बंदिस्त डबके होत गेल्याचे दिसून येते. आपल्या विचारांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांचे शांतपणे ऐकण्याची, जिथे चुकीचे वाटेल, त्यावर टीका करण्याची आणि बरोबर वाटेल ते ग्राह्य धरण्याची परंपरा समाजाला अधिक सहिष्णू करत आलेली आहे.

Book
Book Review : सकस चारा उत्पादन, प्रक्रिया तंत्र

परकीय आक्रमणाच्या काळामध्ये वेद व त्याच्याशी संबंधित अभ्यास मागे पडत विशिष्ट संप्रदायांपुरता मर्यादित झाला. त्याचा प्रत्यक्ष जगण्याशी संपर्क तुटला. परिणामी, खऱ्या अर्थाने विश्‍वाचे गूढ उलगडण्यासाठी निर्माण झालेले वेद कालौघामध्ये मागे पडले. आज आधुनिक विज्ञान आणि समाजशास्त्रे विश्‍वाचे गूढ उलगडण्यासोबतच समाजांच्या विविध धारणांसंदर्भात एकेक विचार मांडताना दिसत आहेत.

या शास्त्रांची सांगड प्राचीन वेदातील मंत्राशी घालण्याचा प्रयत्न ‘ऋग्वेद अर्थसार’ या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक बापू भानुदास कुंभार यांनी केला आहे. त्यांनी लावलेल्या अर्थानुपत्तीमुळे आपण काही वेळा चकित होऊन जातो. अशा अर्थाविषयी मतभेद होऊ शकतात. किंबहुना, त्या त्या विज्ञानातील तज्ज्ञांनी अधिक साक्षेपाने विचार करून आपली मते मांडल्यास नवे प्रवाह तयार होतील. त्यांच्या पौराणिक विश्‍लेषणाबाबतही तेच म्हणावे लागेल.

पौराणिक कथांचे परंपरागत अर्थ आणि नवे अर्थ या बाबत विचार करताना प्रतिके, प्रतिमा यांचा विचार अधिक साकल्याने करावा लागेल, हे प्रत्येकाला समजेल. ही समज प्रत्येकाच्या मनामध्ये उपजली, तर माझ्या मते तेच या पुस्तकाचे खरे यश ठरणार आहे.

वेद हे अपौरुषेय मानले जातात. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे मंत्र गुरू शिष्य परंपरेतून पुढे आलेले आहेत. त्या काळी लिहिण्याची सोय नसल्याने अत्यंत कमी शब्दांमध्ये, अचूक उच्चारांसह केवळ पाठांतराच्या बळावर त्यांचा आजवरचा प्रवास पार पडला.

ते टिकून राहिले ही चांगली बाब झाली असली तरी त्याचा अर्थ पुढे पुढे विलुप्त होत गेला. त्यामुळे मूळ मंत्रकर्त्या ऋषीला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता, हे सांगणे अवघड होते. त्यातच एकेका मंत्राचे अनेक अर्थ होत असल्यामुळे विद्वानांमध्ये मतभेद होतात. अगदी कालनिश्‍चितीपासून मतभेदांना सुरुवात होते.

Book
Book Review : चिकित्सा मराठा समाजाच्या वर्चस्वाची

वेदामध्ये येणारे मंत्र हे विविध देवांच्या (त्यातही आज कालबाह्य झालेल्या) प्रार्थनांच्या स्वरूपातील आहेत. वेदांचा अंतिम भाग असलेली उपनिषदे वगळता बहुतांश भागांमध्ये मंत्र- तंत्र, कर्मकांडे, यज्ञ विधी, प्रार्थना आणि वर्णने यांचा समावेश असल्याचे मानले जाते.

उपनिषदे ही अंतर्मुखी असून, उपनिषदे वगळता सर्व भाग हा बहिर्मुखी मानला जातो. आपल्या आसपासच्या बाह्य आणि एकूणच ज्ञात असलेल्या ब्रह्मांडातील घटनांचा समावेश या मंत्रामध्ये होतो.

आजच्या विज्ञानाच्या जगामध्ये पुढे येत असलेल्या विविध शाखांतील संशोधनांचा, विचारांचा आधार घेतला तर त्यातून वेगळेच, अनोखे अर्थ पुढे येत जातात. अर्थात, ऋग्वेदामध्ये जे काही सांगितले गेले, त्या सर्व बाबी आजच्या प्रगत विज्ञानाच्या अनुषंगाने पटणाऱ्या नाहीत. उदा. पृथ्वीचा जन्म सूर्याच्या आधी झाला,

ती विश्‍वामध्ये एकटीच फिरत होती आणि नंतर सूर्याच्या कक्षेत येऊन फिरू लागली इ. आजच्या विविध शास्त्रांशी या प्राचीन मंत्राची सांगड घालणाऱ्या म्हणजेच विज्ञान आणि प्राचीन मंत्र या दोन टोकांना सांधणाऱ्या पुलाप्रमाणे असलेल्या अशा पुस्तकांची नक्कीच गरज आहे. निदान ऋग्वेदाबाबत तरी हे पुस्तक ती गरज नक्कीच पूर्ण करेल, यात शंका नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com