Pomegranate Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Farming : वातावरण बदलानुसार आंबिया बहरातील बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

Pomegranate Cultivation : सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. मोहोळ) येथील अविनाश माणिक काळे यांची दोन एकर शेती आहे. दोन एकरांपैकी एक एकरावर डाळिंब बाग, तर उर्वरित एक एकरांवर चारा पिकांची लागवड केली आहे.

सुदर्शन सुतार

Pomegranate Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : डाळिंब

शेतकरी : अविनाश माणिक काळे

गाव : खंडाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : २ एकर

डाळिंब लागवड : १ एकर

सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी (ता. मोहोळ) येथील अविनाश माणिक काळे यांची दोन एकर शेती आहे. दोन एकरांपैकी एक एकरावर डाळिंब बाग, तर उर्वरित एक एकरांवर चारा पिकांची लागवड केली आहे. शेतीक्षेत्र कमी असल्याने शेतीला पूरक म्हणून अविनाश यांनी दुग्ध व्यवसायाची जोड दिली आहे.

मागील चार वर्षांपासून अविनाश काळे डाळिंब उत्पादन घेत आहेत. एक एकरांत साधारणपणे ४०० डाळिंब झाडे आहेत. सर्व झाडे भगवा वाणाची आहेत. बागेत प्रामुख्याने आंबिया बहर धरला जातो. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन करून त्या माध्यमातून उत्पादन घेतले जाते.

आमच्या भागातील एकूण वातावरण आंबिया बहरासाठी पूरक असून, या बहरातील फळांना बाजारात दरही चांगले मिळतात. त्यामुळे हा बहर आम्हाला सोईचा वाटतो. एकरी साधारण ५ ते ६ टनांच्या पुढे बागेतून डाळिंबाचे उत्पादन मिळते. सध्या आंबिया बहराच्या बागेत वातावरण बदलानुसार काटेकोर व्यवस्थापनावर भर दिला जात असल्याचे अविनाश काळे सांगतात.

व्यवस्थापनातील बाबी

मागील वर्षीच्या आंबिया बहरातील फळांची काढणी साधारणपणे जानेवारी महिन्यात पूर्ण झाली.

फळ काढणी पूर्ण झाल्यावर बागेत पडलेली फळे गोळा करून घेतली. यामध्ये रोगग्रस्त फळे असल्यामुळे त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्‍यक होते. त्यानुसार शास्त्रीय पद्धतीने फळांची विल्हेवाट लावली. जेणेकरून त्यामुळे रोगप्रसार होणार नाही.

बागेतील सर्व झाडांवरील फळ काढणी पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे मे महिन्याच्या शेवटापर्यंत बाग ताणावर होती. या दरम्यान बागेला विश्रांती देण्यात आली. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी बागेला पाणी देऊन ताण तोडला.

ताण कालावधीत बागेत रासायनिक खत व्यवस्थापन, छाटणी, बागेची स्वच्छता आणि मशागतीच्या कामांवर भर देण्यात आला.

या काळात झाडाभोवती चर काढून रासायनिक खतांचे बेसल डोस आणि शेणखत यांची मात्रा दिली. त्यात चांगले कुजलेले शेणखत प्रतिझाड २५ किलो प्रमाणे दिले. रासायनिक खतांच्या बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०ः२६ः२६ या खतांचा वापर केला.

बागेतील दोन ओळींमधील मोकळ्या जागेत रोटर मारून जमिनीची चांगली मशागत केली.

त्यानंतर बहार धरण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी करून पानगळ करून घेतली.

पानगळ केल्यानंतर तिसऱ्या दिवशी झाडाच्या खोडावरील वॉटरशूट काढून घेण्याच्या कामाला सुरुवात केली. बागेतील रोगग्रस्त फांद्यांची छाटणी केली. छाटणी केल्यानंतर रोगग्रस्त फांद्या बागेबाहेर नेऊन त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.

बागेत गवत चांगलेच वाढले होते. वाढलेले सर्व गवत ग्रासकटरच्या साह्याने काढून घेतले. त्यानंतर संपूर्ण बागेची स्वच्छता केली. त्यानंतर झाडांच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावून घेतले.

कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासठी शिफारशीत घटकांची फवारणी केली,

खत व्यवस्थापन

बहर नियोजनानुसार दर ४ ते ५ दिवसांनी ठिबक सिंचनमधून मॅग्नेशिअम सल्फेट, १३ः०ः४५ या रासायनिक खतांच्या मात्रा आलटून पालटून देण्यात आल्या. याप्रमाणे पुढील साधारण दीड महिना या पद्धतीने खत व्यवस्थापन केले जाईल.

काडी बळकट होण्यासाठी ०ः५२ः३४ आणि ०ः०ः५० ही विद्राव्य खते आठवड्यातून एकदा ड्रीपमधून दिली जातील.

बाग फुटण्यास सुरुवात झाल्यावर पोटॅशिअम शोनाईटची मात्रा एक वेळ दिली जाईल.

काडीमध्ये गर्भधारणा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ०ः५२ः३४ः यांची दोन वेळा फवारणी घेतली जाईल. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सिलिकॉनची एक फवारणी होईल.

आगामी नियोजन

बागेतील झाडांना सध्या कळी लागण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात काडीमध्ये पुरेसा अन्नद्रव्यांचा साठा तयार होण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल.

मागील आठवड्यात सातत्याने पाऊस होत असल्याने बागेत कोणतीही कामे करणे शक्य झाले नाही.

सध्या वातावरणात बदल होतो आहे. बदलत्या वातावरणामुळे बागेत समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी वातावरण बदलानुसार बागेचे सातत्याने निरीक्षण करत आहे.

कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीप्रमाणे रासायनिक कीडनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या जातील.

पुढील काळात नवती काढणे, वॉटरशूट काढण्याची कार्यवाही नियमित केली जाईल.

नियोजित वेळापत्रकानुसार रासायनिक खतांचे नियोजन केले जाईल. ठिबकद्वारे खत व्यवस्थापनावर भर दिला जाईल.

काडीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरेसा साठा तयार होण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

बागेतील वाफसा स्थिती आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जाईल.

फळ सेंटिग चांगली होण्यासाठी शिफारशीत घटकांच्या फवारणीवर भर दिला जाईल.

फळ धारणेनंतर फळांचा दर्जा आणि फळांना चकाकी येण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी घेतली जाईल.

अविनाश काळे, ८३८०९३३७१८

(शब्दांकन : सुदर्शन सुतार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT