Pomegranate Crop : राज्यातील प्रमुख फळपीक म्हणून डाळिंब ओळखले जाते. मागील काही वर्षांत रोगट कलम, अयोग्य बहार व्यवस्थापन, तेलकट डाग आणि मर रोगामुळे डाळिंब लागवडीत घट होत आहे. आहे त्या हवामानात जमिनीचा योग्य वापर करून बाजारपेठेतील मागणी आणि निर्यातीचा विचार करता राज्यात डाळींब लागवडीसाठी भरपूर वाव आहे. त्यासाठी बागेत कीड-रोग व्यवस्थापनासह अन्नद्रव्ये आणि योग्य बहार व्यवस्थापनावरही भर देण उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाच आहे. फायदेशीर डाळिंब लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचीच सविस्तर माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
डाळिंब हे उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधातील एक महत्त्वाच फळपीक आहे. सोलापूर, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, धाराशीव, लातूर या पट्ट्यात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. डाळिंब लागवडीत सुरुवातीला पाहुया या पिकाला जमीन कशी लागते ते...
जमीन
डाळिंब लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम ४५ सेंटीमीटर खोली असलेली जमीन निवडावी. जमीन उन्हाळयात २ ते ३ वेळा उभी आडवी नांगरुन कुळवून सपाट करावी. भारी जमिनीत ५ बाय ५ मिटर अंतरावर लागवड करावी. त्यासाठी ६० बाय ६० बाय ६० सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात तळाशी वाळलेला पालापाचोळयाचा १५ ते २० सेंटीमीटर जाडीचा थर देऊन २० ते २५ किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, १ किलो सिंगल सुपरफॉस्फेट च मिश्रण करुन खड्डे जमिनी बरोबर भरुन घ्यावेत. पावसाळयात रोपांची लागवड करावी. कलमाच्या आधारासाठी शेजारी काठी पुरुन आधार द्यावा. ५ बाय ५ मिटर मीटर अंतराने प्रती हेक्टरी ४०० झाडे लावावीत.
वाणांची निवड
डाळिंबाच्या गणेश या वाणाचे वैशिष्टय असे की, बिया मऊ असून दाण्याचा रंग फिक्कट गुलाबी असतो फळात साखरेच प्रमाणही चांगल आहे. या वाणापासून चांगल उत्पादन मिळत. तर मस्कत या जातीच्या फळाचा आकार मोठा असतो. या वाणाचे दाणे पांढरट ते फिक्कट गुलाबी असतात. याशिवाय डाळिंबाच्या मृदुला, जी १३७, फुले आरक्ता, भगवा या वाणांपासूनही चांगल उत्पादन मिळत.
पाणी आणि खत व्यवस्थापन
डाळींबाला फुले येण्यास सुरुवात झााल्यानंतर फळे उतरेपर्यंतच्या काळात नियमित पाणी देणं महत्वाचं आहे. पाणी वेळेवर न दिल्यामुळे फुलांची गळ होऊ शकते. फळांची वाढ होत असतांना पाण्याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्यास फळांना तडे पडतात आणि न पिकलेली फळे गळतात. पाऊस न झाल्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावे आणि पुढे फळे निघेपर्यंत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फळाची तोडणी संपल्यानंतर बागांचे पाणी तोडावे. पूर्ण वाढलेल्या झाडाला ६२५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश नत्र दोन समान हप्त्यात विभागून दयावेत.
बहार व्यवस्थापन
डाळिंबाला लागवडीनंतर तीन वर्षानंतर बहार धरावा. रोपांची वाढ जोमदार असेल तर दोन वर्षानंतरही बहार धरु शकतो.डाळींबाला आंबिया बहार, मृग बहार आणि हस्तबहार असे तीन बहार येतात. जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात आंबिया बहार धरला जातो. जून- जुलै महिन्यात मृग बहार धरला जातो. तर सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात हस्त बहार धरला जातो. यापैकी आंबिया बहार धरणं जास्त फायदेशीर आहे. कारण या बहाराची फळे जून - ऑगस्ट काळात तयार होतात. याच काळात फळांची वाढ होताना आणि फळे तयार होताना हवा उष्ण आणि कोरडी राहते. त्यामुळे फळाला चांगली गोडी येते. फळांवर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्याची कमतरता जर असेल तर मृगबहार धरावा.
फळांची काढणी
डाळींबाचे फळ तयार होण्यास फूले लागण्यापासून साधारणतः ६ महिने लागतात. आंबिया बहाराची फळे जून ते ऑगस्ट मध्ये मृगबहाराची फळे नोव्हेबर ते जानेवारीमध्ये आणि हस्तबहाराची फळे फेब्रूवारी ते एप्रिल मध्ये तयार होतात. फळांची साल पिवळसर करडया रंगाची झाली म्हणजे फळ तयार झाले असे समजावे आणि फळाची तोडणी करावी.
डाळिंब लागवडीतील धोके
पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंब बागांना बसतो. अशावेळी सुमारे ५० टक्के फूलगळ होण्याची भीती असते. त्यामुळे पिकाला उष्णतेचा ताण बसू नये म्हणून आपल्याकडील हवामानाचा विचार करुन योग्य बहार धरण गरजेच आहे. याशिवाय डाळिंबावर तेलकट डाग रोग, मर रोग पडण्याचा धोका असतो. तेलकट डाग रोगामुळे आणि मर रोगामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर पूर्ण बागच तोडून टाकण्याची वेळ आलेली आहे. हे रोग टाळायच असेल तर रोपांची खरेदी खात्रीशीर रोपवाटिकेतूनच करावी. मातृवृक्ष हे तेलकट डाग किंवा मर रोगमुक्त बागेतील असल्याची खात्री करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीचा म्हणजेच जून-जुलैमध्ये लागवड केल्यास रोपाची मर कमी प्रमाणात होते.
डाळिंब मार्केट
डाळिंबाच्या प्रतीनूसार फळांच्या आवकेनूसार किलोला डाळिंबाला ४० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. दर्जेदार डाळिंबाला यापेक्षाही चांगला भाव मिळतो.
राज्यातील बरेचसे शेतकरी हस्त, आंबिया आणि मृग अशा तिन्ही बहरांत डाळिंबाच उत्पादन घेतात. त्यामुळे वर्षभर डाळिंब उपलब्ध होत असते. उत्तर महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी डाळिंब उत्तर भारतात दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मार्केटला पाठवतात. तर काही प्रमाणात बंगळूर तसेच चेन्नईच्या बाजारातही डाळिंबाला चांगली मागणी आहे. तर दक्षिण महाराष्ट्रातील माल दक्षिण भारतातील मुख्य बाजारपेठेत जात असतो. पण गुजरात आणि राजस्थान राज्यांतही डाळिंबाच चांगल उत्पादन होत असल्यामुळे या ठिकाणच्या डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्यास दर कमी मिळतात. त्यामुळे मार्केटचा आभ्यास करुनच डाळिंबाचा बहार धरावा.
तर निर्यातीमध्ये दुबई, रशिया, बांगलादेश आणि नेपाळ याठिकाणच्या मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाला चांगली मागणी आहे. चांगला रंग, आकार आणि चकाकी असलेल्या डाळिंबाना निर्यातदार पसंती देतात. चांगल्या दर्जाची फळांची उपलब्धता कमी असल्यामुळे डाळिंब निर्यातीला चांगली संधी आहे. त्यासाठी डाळिंबाच योग्य नियोजन करुन उत्पादन घेण गरजेच आहे.
--------------------------------------------
माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.