Mahadeo Falke Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Management : शेड निर्जंतुकीकरण, तुती बाग व्यवस्थापनावर भर

Mulberry Orchard Management : बीड जिल्ह्यातील राहेरी (ता. गेवराई) येथील महादेव विश्वनाथ फलके यांनी मागील दहा वर्षांपूर्वी पारंपरिक कपाशी आणि ऊस लागवड थांबवून रेशीम उद्योग सुरू केला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Update :

शेतकरी नियोजन

रेशीमशेती

शेतकरी : महादेव विश्वनाथ फलके

गाव : राहेरी ता. गेवराई जि. बीड

तुती लागवड : साडेसात एकर

बीड जिल्ह्यातील राहेरी (ता. गेवराई) येथील महादेव विश्वनाथ फलके यांनी मागील दहा वर्षांपूर्वी पारंपरिक कपाशी आणि ऊस लागवड थांबवून रेशीम उद्योग सुरू केला. सुरवातीच्या काळात एक एकरावर तुती लागवड केली. सध्या त्यांनी संपूर्ण साडेसात एकरावर तुती लागवड केली आहे. रेशीम उद्योगामुळे शेतीतील उत्पन्न जवळपास चार ते पाच पट वाढले. सातत्य आणि शास्त्रोक्त व्यवस्थापनामुळे हे शक्य झाल्याचे महादेव फलके सांगतात. संपूर्ण रेशीम उद्योगामध्ये पत्नी सौ. शीलाबाई यांची महादेवराव यांना विशेष साथ मिळाली आहे. रेशीम उद्योगामुळे दोन मुलींचा विवाह चांगला करणे शक्य झाले. तसेच मुलगा अथर्वचे वैद्यकीय शिक्षण होत असून एक मुलगी बी फार्मचे शिक्षण घेत असल्याचे श्री. फलके अभिमानाने सांगतात.

रेशीम उद्योगाची सुरवात

वडिलोपार्जित साडेसात एकर शेतीमध्ये कपाशी आणि ऊस लागवड करत शेतीला जोड म्हणून ऊस वाहतुकीचा व्यवसायही करत होते. मात्र त्यातून कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत बसत नव्हती. २०१२ च्या दुष्काळात जनावरांना चाऱ्यासाठी उसाची वाहतूक करताना त्यांना गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे रेशीम उद्योगाविषयी माहिती मिळाली. आपण जेवढे कष्ट पारंपारिक शेती आणि व्यवसायात घेतो, त्या तुलनेत रेशीम उद्योग आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर असल्याचे त्यांना जाणवले. त्यातूनच २०१५ मध्ये महादेवरावांनी पहिल्यांदा एक एकरमध्ये तुती लागवड केली. सुरवातीला राहेरी गावात महादेव यांच्यासह दत्तात्रय फलके या दोघांनी रेशीम उद्योगाचा श्रीगणेशा केला. सध्या गावामधील सुमारे २०० पेक्षा अधिक शेतकरी रेशीम उद्योग करत आहेत.

तुती बागेचा विस्तार

महादेव फलके यांनी २०१५ मध्ये एक एकरावर तुती लागवड आणि रेशीम कीटक संगोपनगृहाची उभारणी करत प्रत्यक्ष व्यवसायाला सुरवात केली. अत्यल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळाल्याने २०१६ मध्ये तुतीच्या क्षेत्रात आणखी दोन एकरने वाढ केली. क्षेत्रात केलेली वाढ फायद्याची ठरल्याने पुन्हा २०१८ मध्ये दोन एकर व २०२०-२१ मध्ये आणखी अडीच एकरावर तुती लागवड केली. अशी सध्या त्यांच्याकडे संपूर्ण साडेसात एकर शेतीमध्ये तुती लागवड आहे.

तुती लागवड

सुरवातीची एक एकरावरील तुती लागवड ४ बाय १ फुटावर करण्यात आली. पुढे लागवड अंतरामध्ये वाढ करत ८ बाय १ फूट वर आणले. सध्या अडीच एकर ४ बाय ४ वर, तर चार एकर ८ बाय १ फुटावर केलेली लागवड आहे. तसेच एक एकर क्षेत्रावर ८ बाय १० फुटावर ट्री प्लांटेशनचा पर्याय निवडत तुती लागवड केली आहे. ही झाडे वाढण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागला. मात्र त्यापासून दर्जेदार पाला रेशीम कीटकांसाठी उपलब्ध होत आहे. कोरडवाहू शेतीत रेशीम उद्योग करण्यासाठी हा पर्याय अत्यंत उत्तम असल्याचे फलके सांगतात.

खत, सिंचन व्यवस्थापन

तीन वर्षांतून एकदा तुतीच्या बागेला एकरी दोन ट्रॉली प्रमाणे शेणखत दिले जाते. या शिवाय प्रत्येक बॅच नियोजनानुसार बॅच घेण्यापूर्वी बागेची छाटणी केली जाते. छाटणीनंतर १०:२६:२६ किंवा १२:३२:१६ या रासायनिक खतांसह अमोनिअम सल्फेट आणि बोरॉन यांच्या मात्रा दिल्या जातात. रासायनिक खते दिल्यानंतर आंतरमशागत व खुरपणीचे काम केले जाते. सिंचनासाठी तुती बागेत तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. या महिन्यात आणि पुढील महिन्यात बागेला पंधरा दिवसांतून एक वेळ सिंचन केले जाईल. त्यानंतरच्या काळात वाफसा स्थिती पाहून सिंचन केले जाईल.

बॅच नियोजन

वर्षभरात साधारण जून ते एप्रिल दरम्यान दहा बॅच घेतल्या जातात. त्यासाठी २४ बाय ६० फूट आकाराची तीन रेशीम कीटक संगोपनगृह उभारण्याली आहेत. एकदा बॅच घेतल्यानंतर त्या शेडमध्ये दुसरी बॅच किमान दीड महिना घेतली जात नाही. जेणेकरून रेशीम कीटकांवर होणारा रोगांच्या प्रादुर्भाव टाळला जाईल. या दरम्यान शेड निर्जंतुकीकरणावर अधिक भर दिला जातो. एक बॅच साधारण २५० ते ५०० अंडीपुंजाची असते. साधारण ५०० अंडीपुंजाच्या वर्षाला तीन बॅच, तर २५० अंडीपुंजीच्या सात ते आठ बॅच असे वर्षभरात घेण्याचे त्यांचे नियोजन असते.

आगामी नियोजन

या महिन्याच्या अखेरीस २५० अंडीपुंजाची नवीन बॅच सुरू करणार आहे. त्यासाठी चॉकी नोंदणी आगाऊ करून ठेवली आहे.

मागील १५ दिवसांपूर्वी तुती बागेत छाटणीची कामे केली आहेत. आगामी काळात बागेस रासायनिक खतमात्रा देऊन आंतरमशागतीची कामे केली जातील. जेणेकरून आगामी बॅचसाठी दर्जेदार तुती पाला उपलब्ध होईल.

कीड-रोग व्यवस्थापनासाठी प्रयत्न

श्री. फलके यांच्या अनुभवानुसार २०१५ ते २१ या दरम्यान रेशीम उद्योगामध्ये कोणतीही समस्या आली नव्हती. परंतु अलीकडे तुती बागेतील पाल्यावर फुलकिडे, मिलीबग, कोळी कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. याशिवाय रेशीम अळ्यांवर ग्रासरी, फ्लॅचरी, मस्कार्डीन या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यापैकी ग्रासरी, फ्लॅचरी या रोगांचा प्रादुर्भाव वर्षभर जाणवतो. मात्र जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दरम्यान प्रादुर्भाव जास्त असतो. त्याचा रेशीम कोष उत्पादनावर परिणाम होत असल्याचे श्री. फलके यांचा अनुभव आहे. त्यावर पर्याय म्हणून सप्टेंबर, ऑक्टोबर या दरम्यान बॅच घेणे टाळले जाते. शिवाय रेशीम कीटक संगोपनगृह, तुती पाला यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर विशेष भर दिला जातो. तसेच उझी माशीच्या नियंत्रणासाठी त्यांनी स्वतः सात ते आठ सापळे तयार केले आहेत. ते लावले जातात. शिवाय चिकट सापळे देखील शेडच्या भोवताली लावले जातात.

महादेव फलके, ९५२७०१९४५० (शब्दांकन : संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा उठाव वाढला; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हिरवी मिरचीचे दर?

Agriculture AI : शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर लाभदायी

Name Change Of Constituency : राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाच्या नावात बदल होणार

Cotton Cultivation : सघन कापूस लागवड फायद्याची

Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड!, जमा केले ऊस बिलापोटी प्रती टन ५० रुपये

SCROLL FOR NEXT