Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming : घडांचा दर्जा राखण्यावर भर

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Farmer Management in Banana Farming :

शेतकरी नियोजन

पीक : केळी

शेतकरी : जगदीशराजेंद्र सूर्यवंशी

गाव : हिंगणे बुद्रूक, ता. जामनेर, जि.जळगाव

केळी क्षेत्र : सात एकर

एकूण झाडे : १० हजार झाडे

जगदीश सूर्यवंशी यांच्या संयुक्त कुटुंबाची हिंगणे बुद्रूक (ता. जामनेर, जि. जळगाव) शिवारात १५ एकर मध्यम प्रकारची जमीन आहे. या शिवाय भाडेतत्त्वार त्यांनी पाच एकर शेती घेतली आहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून जगदीश शेती करीत आहेत. शेती बागायती आहे. सिंचनासाठी दोन विहीरी असून वाघूर धरणातून जलवाहिनी टाकून पाण्याची सोय केली आहे. केळी प्रमुख पीक आहे. खरिपात कापूस, तूर, रब्बीत कांदा बिजोत्पादन, मका आदी पिके घेतात. कांदेबाग केळीची नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लागवड केली जाते.

बाजारातील कमी दरांचा फटका बसू नये यानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन वाणाच्या १०० टक्के उतिसंवर्धित केळी रोपांचा उपयोग केला जातो. एक फूट उंचीच्या गादीवाफ्यावर लागवड केली जाते. गादीवाफा साडेतीन फूट रुंद ठेवला जातो. सिंचनासाठी सिंगल लॅटरल वापरल्या जातात. लागवड पाच बाय साडेपाच फूट अंतरावर केली जाते. शेतीच्या नियोजनात कृषितज्ज्ञ शरद महाजन, तुषार पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. सध्या केळी व्यवस्थापन असे....

कांदेबाग केळीची सात एकरांमध्ये डिसेंबर महिन्यात लागवड केली आहे.

सध्या केळी बाग १० महिन्यांची झाली आहे. लवकरच काढणीच्या कामांना सुरुवात होईल. सणासुदीच्या काळात केळी काढणीवर येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

लागवडीसाठी मध्यम जमिनीची निवड केली जाते. त्यात शेणखत टाकून जमिनीची पूर्वमशागत केली जाते. खोल नांगरट करून जमीन काही दिवस उन्हामध्ये तापू दिली जाते. जेणेकरून जमिनीतील कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होतील.

त्यानंतर गादीवाफे तयार करून ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या जातात. लागवडीच्या काळ हिवाळ्याचा असतो. या काळात पाण्याची गरज कमी असते. यामुळे रोप लागवड केल्यानंतर रोज किमान अर्धा तास सिंचन केले जाते. हळूहळू तापमानात वाढ होताच सिंचनाचा कालावधी देखील वाढविला जातो.

अन्नद्रव्य व्यवस्थापन

सुरुवातीच्या काळात प्रति एक हजार झाडांना ९.२४.२४ या खताचा बेसल डोस दिला जातो. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देखील दिल्या जातात.

लागवडीनंतर चौथ्या दिवशी, १५ व्या दिवशी व पुढे पीक एक महिन्याचे झाल्यानंतर नियमितपणे आळवणी केली जाते. त्यात कीटकनाशक, बुरशीनाशक व पीक वाढीसाठी विद्राव्य खतांचा समावेश केला जातो. एकाच प्रकारचे खत पुन्हा पुन्हा वापरले जात नाही.

पीक एक महिन्याचे झाल्यानंतर १२ः३२ः१६ या खताची प्रति एक हजार झाडांना मात्रा दिली जाते. हा पहिला डोस दिल्यानंतर १४ः३५ः१४ हे मिश्र खत दिले जाते.

पीक चार महिन्याचे झाल्यानंतर १०ः२६ः२६ हे खत तिसरा बेसल डोस म्हणून दिले जाते. त्यासोबत मॅग्नेशिअम सल्फेट व युरिया प्रति एक हजार झाडे या प्रमाणे दिले जाते.

लागवडीनंतर चार महिन्यांनी पिकास विद्राव्य खते देण्यास सुरवात केली जाते. त्यात १२ः६१ः०, ११ः४०ः११, १३ः०ः४५ ही खते आलटून पालटून दिली जातात. दर चार ते पाच दिवसाआड ही खते दिली.

दर महिन्यात युरिया व पोटॅशची मात्रा ड्रीपमधून दिली जाते. तसेच विद्राव्य खतेही दिली जातात.

पीक संरक्षण

केळी बागेत खोडकीड व हुमणी अळीचा प्रादुर्भाव मुख्यतः दिसून येतो. पीक दोन ते तीन महिन्याचे असताना व पुढे पीक निसवणीच्या अवस्थेत असतानाही अळीची समस्या येते. त्यासाठी शिफारशीत घटकांचा वापर केला जातो. वाढीच्या अवस्थेत पिकाचे सातत्याने निरिक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातात.पिकाचे निरिक्षण करून कमतरतेची लक्षणे अभ्यासून अन्नद्रव्य व्यवस्थापन केले जाते.

आगामी नियोजन

सध्या बागेतील झाडांवर दर्जेदार घड लागलेले आहेत. आगामी काळात घडांचा दर्जा राखण्यावर भर दिला जाईल.

केळी पक्व होण्यासाठी ०ः९ः४६ आणि ०ः०ः५० या खतांचा ड्रीपमधून वापर केला जाईल. जेणेकरून केळीचा दर्जा राखण्यास मदत होईल.

बागेतील फुटवे नियमितपणे काढून घेतले जातील. दर १० दिवसांनी फुटवे व पाने काढून घेतले जातील.

घडांना चकाकी येण्यासाठी व घड पक्व होण्यास गती मिळण्यासाठी घडावर आणखी एक फवारणी घेण्याचे नियोजन आहे. त्यात बुरशीनाशक, कीटकनाशक व विद्राव्य खतांचा समावेश केला जाईल.

बागेत सतत निरीक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार उपाय केला जाईल.

बागेत आवश्यकतेनुसार वाफसा कायम ठेवण्यासाठी सिंचन केले जाईल.

- जगदीश सूर्यवंशी, ९०४९७३३३३४, (शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक

Fig Management : अंजिरातील मीठा बहर व्यवस्थापन

Warana Milk : म्हैस खरेदीसाठी ४२ हजारांचे अनुदान, वारणा दूध संघाचा निर्णय

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षिततेचे उपाय

Agri Tourism : मावळ तालुका झालाय ‘कृषी पर्यटन हब’

SCROLL FOR NEXT