Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : पशुपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

Dairy Business : नेवासा तालुक्यातील देवगाव येथील गणेश लहाणू पाडळे यांनी बीएबीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता घरच्या दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पशुपालन

शेतकरी : गणेश लहाणू पाडळे

गाव : देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

एकूण शेती : सहा एकर

एकूण गाई : १५ गाई व सहा कालवडी.

नेवासा तालुक्यातील देवगाव येथील गणेश लहाणू पाडळे यांनी बीएबीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता घरच्या दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले. पाडळे कुटुंब पारंपरिक पद्धतीने पशुपालन व्यवसाय करत होते. मात्र बंदिस्त गोठ्यात पशुपालन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्यांनी मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. मुक्तसंचार गोठा तयार केल्यानंतर गाईंच्या संख्येत वाढ केली. सध्या त्यांच्याकडे बारा संकरित गाई, दोन देशी, एक गीर गाय व सहा कालवडी आहेत. सध्या प्रतिदिन ७० ते ८० लिटर दुधाचे संकलन होत आहे. पाडळे कुटुंबाची सहा एकर शेती असून शेती कामांसाठी एक बैलजोडी देखील आहे. घरच्या शेतीमध्ये चारा पिकांच्या लागवडीस त्यांनी प्राधान्य दिले आहे. दुग्ध व्यवसायात गणेश यांना वडील लहाणू, भाऊ उमेश यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांची मदत मिळते.

व्यवस्थापनातील बाबी

दैनंदिन कामांना दररोज सकाळी साडेपाच वाजता सुरवात होते. सर्वप्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला बांधल्या जातात. मिल्किंग मशिनद्वारे दूध काढले जाते. त्यानंतर चारा व खुराक दिला जातो.

एका गाईला साधारण पंधरा किलोपर्यंत सकाळी चारा दिला जातो. त्यात गिन्नी गवत, ऊस, मका आणि मुरघास यांचा समावेश असतो. सर्व चाऱ्याची रात्रीच कुट्टी करून ठेवली जाते.

मुक्तसंचार गोठ्यात जनावरांना पिण्यासाठी पाण्याच्या हौदाची व्यवस्था केलेली आहे.

दुभत्या गाईला दूध देण्याच्या क्षमतेनुसार दररोज सकाळी व संध्याकाळी पशुखाद्य दिले जाते. त्यात प्रामुख्याने गोळीपेंड, सरकी पेंड यांचा समावेश असतो. त्यासोबत प्रोटिन व कॅल्शिअमयुक्त खाद्य दिले जाते. पहिले दोन महिने कॅल्शिअम व त्यानंतर दूध वाढीसह शरिरासाठी फायदेशीर असलेले खनिज मिश्रण दिले जाते.

संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी, चारा व अन्य कामे केली जातात. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.

नवजात वासरांना पहिले तीन महिन्यांपर्यंत दूध पाजले जाते. त्यानंतर हळूहळू दूध पिण्याची सवय कमी करून खाद्य खाण्याची सवय लावली जाते. वासरांना शारीरिक वाढीसाठी पोषक आहार देण्यावर भर दिला जातो. योग्य व्यवस्थापनामुळे वासरे, कालवडीच्या वाढीला मदत मिळते.

चाराटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी घरच्या मक्यापासून मुरघास निर्मिती केली जाते. त्यासाठी मक्याच्या सुधारित वाणाची लागवड करण्यावर भर दिला जातो. मुरघासामुळे टंचाईच्या काळात चारा टंचाईवर मात करता येते.

आरोग्य व्यवस्थापन

जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित लसीकरणावर भर दिला जातो. लम्पी त्वचा आजार, लाळ्या खुरकूत यांचे लसीकरण प्राधान्याने केले जाते. लसीकरणासाठी स्थानिक सरकारी पशुवैद्यकांची मदत व मार्गदर्शन घेतले जाते.

गोठ्यातील प्रत्येक गाय व कालवडीला दर तीन महिन्यांतून एकदा जंताच्या डोस दिला जातो.

गोचीड निर्मूलनासाठी गोठ्यात उपाययोजना केल्या जातात.

शेणखताची विक्री

दरवर्षी पशुपालनातून सुमारे २५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील काही शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरले जाते. तर उर्वरित शेणखताची विक्री केली जाते. गोठ्यातील शेणाची दररोज उचल करतात. मुक्त गोठ्यातील शेणखताचा दर्जा चांगला असल्याने शेतकऱ्यांकडून फळबागांसाठी खताला चांगली मागणी असते. शेणखताच्या वापरामुळे घरच्या शेतीतून दर्जेदार चारा पिकांचे उत्पादन मिळत आहे.

गणेश पाडळे, ७७५६९६४७४९

(शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT