Rabi Season
Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बी हंगामातील आपत्कालीन पीक व्यवस्थापन

Radhika Mhetre

डॉ. आदिनाथ पसलावर, डॉ. अनिल करुणाकर, डॉ. योगेश इंगळे

Emergency Crop Management :
विदर्भात मध्यंतरी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले दिसते. विदर्भातील कापूस, तूर, हरभरा, भात या पिकांचे नुकसान झाले असून, शेतात पाणी साचून राहिल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. दरम्यानच्या काळात सातत्याने ढगाळ वातावरण राहिल्याने किडींच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. तसेच तणांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या सर्वांचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी पीक व्यवस्थापनात पुढील कार्यवाही उपयोगी ठरेल.

कापूस :
अवस्था ः बोंड विकास, बोंड फुटणे आणि वेचणी.
- कपाशीच्या शेतातील अतिरिक्त साचलेले पाणी काढून टाकावे
- कापूस वेचताना प्रतवार व वाणानुसार स्वतंत्रपणे वेचून स्वच्छ, कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा.
- पावसामुळे ओला झालेला कापूस साठविण्यापूर्वी वाळवावा. असा कापूस नेहमीच्या कापसात न मिसळता स्वतंत्र साठवावा.
- सद्यःस्थितीत बोंडसड रोगाचे प्रादुर्भाव उद्‌भवू शकतो. अशी रोगग्रस्त बोंडे गोळा करून नष्ट करावीत.
- कापूस पिकामध्ये पुनरुत्पादक वाढीमुळे (indeterminate growth habit) योग्य व्यवस्थापन असल्यास काही प्रमाणात पुनर्प्राप्ती होऊ शकते, पण फरदड घेणे टाळावे.
- कपाशीची बोंडे भरण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे) फवारणी उपयुक्त ठरते.
-लवकर येणाऱ्या कापसाच्या वाणाची (१४०-१५० दिवस) काढणी केल्यानंतर, सिंचनाची उपलब्धता असल्यास हरभरा किंवा गहू यापैकी रब्बी पीक घ्यावे.

तूर :
अवस्था ः फुलोरा व शेंगा अवस्था

- तुरीच्या शेतातील अतिरिक्त साचलेले पाणी काढून टाकावे.
- अतिरिक्त पाणी साचल्यामुळे उद्‌भवणाऱ्या तूर पिकातील मर/मूळकुज प्रादुर्भाव वाढू शकतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा १०० मिलि प्रति १० लिटर पाणी या द्रावणाची मुळाजवळ आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
-सततचे ढगाळ वातावरण किंवा धुक्यामुळे तुरीच्या फुलोरा व शेंगावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यावर लक्ष ठेवावे.
- तुरीच्या शेतातील लोळलेली किंवा आडवी झालेली झाडे उभी करून घ्यावी. ती जमिनीलगत ओलसर राहिल्यामुळे रोगास बळी पडू शकतात.
- लोळलेल्या पिकामध्ये प्रकाश संश्‍लेषण क्षमता, अन्न (कार्बोहायड्रेड्‌स), पोषक द्रव्ये तसेच पाण्याची वाहतूक कमी होते, त्यामुळे गुणवत्ता व उत्पादनात घट होते.
- पिकांचे अचानक तापमान घट/थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आगोटी करावी. त्यासाठी वाळलेले (किंवा हलके ओलसर) तण, लाकूड, काडी कचरा गोळा करून शेतामध्ये जाळावा. त्यामुळे शेत आणि फळबागांमध्ये आवश्यक उष्णता टिकवून ठेवता येते. साधारणतः हिवाळ्यात इन्व्हर्शन लेयर हा वातावरणाचा एक स्तर असून, त्यात तापमान उंचीसह कमी होणे थांबते आणि त्याऐवजी गरम राहते. उबदार उलट्या थरामुळे शेतातून निघणारा धूर थांबला जातो. यामुळे जमिनीतून किंवा पृष्ठभागावरून बाहेर पडणाऱ्या उष्णतेला (लाँग वेव्ह रेडिएशन) अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तापमानातील घसरण बऱ्‍याच प्रमाणात कमी होईल.
- जमिनीवर उपलब्ध सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. त्यामुळे उष्णतेला प्रतिरोध (थर्मल इन्सुलेशन) होऊन मातीचा मुळाच्या परिसरातील पृष्ठभाग उबदार राहील.
-कोरड्या जमिनीत उष्णता वाहकता कमी असते. त्यामुळे या जमिनी कमी उष्णता साठवते. परिणामी, पिकांना शीतलहरीचा धोका अधिक राहतो. हे टाळून पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हलके सिंचन द्यावे.

हरभरा :
अवस्था ः वाढीची व फुलोरा अवस्था.

-हरभरा पिकामध्ये शेतात अतिरिक्त साचलेले पाणी काढून टाकावे.
- रुंद वरंबा सरी पेरणी पद्धतीचा अवलंब न केलेल्या शेतामध्ये डवरणीनंतर, डवऱ्याला दोरी बांधून दर चार तासानंतर सरी काढावी.
- अतिरिक्त पाणी साचल्यामुळे हरभरा पिकात मूळकुज व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढून नुकसान होते. त्याच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा १०० मिलि प्रति १० लिटर पाणी या द्रावणाची मुळांजवळ आळवणी करावी किंवा ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक २.५ किलो १०० किलो शेणखतात मिसळून जमिनीमध्ये वापरावा. ज्यांच्याकडे शेणखत उपलब्ध नाही, ते तात्पुरता पर्याय म्हणून ओलसर मातीमध्ये मिसळून ट्रायकोडर्माचा वापर करता येईल.
-हरभरा पिकाला फुलोरा, घाटे लागण्याची व दाणा भरण्याच्या पीक अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- फुलधारणा व घाटे भरणे यासाठी १९:१९:१९ या संयुक्त खताची १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी उपयुक्त ठरते.

गहू व रब्बी ज्वारी
- बागायती गव्हाची उशिरा पेरणी १५ ते २० डिसेंबरपर्यंत व अति उशिरा पेरणी ७ जानेवारीपर्यंत करता येईल. याकरिता पीडीकेव्ही सरदार (एकेएडब्ल्यू ४२१०-६) व एकेएडब्ल्यू ४६२७ हे शिफारशीत वाण वापरावेत.
- ज्वारी पिकामध्ये गरज पडल्यास निंदणी व डवरणी करून पीक तणविरहित ठेवावे. उर्वरित नत्र खताची अर्धी मात्रा दिलेली नसल्यास नत्रखत ४० किलो प्रति हेक्टरी द्यावे.

फळबागांकरिता उपाययोजना ः
- बागेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
- झाडे उन्मळून पडल्यास शेंड्याकडील ४५ सेंमी फांद्या कमी करून छाटणी करावी. छाटणी केलेल्या भागावर बोर्डो मिश्रण (१ टक्का) लावावे.
- झाडांची मुळे उघडी पडलेली असल्यास मातीची भर देऊन घ्यावी.
- बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार देऊन झाडे उभी करावीत. अशा झाडांच्या वाफ्यामध्ये मेटॅलॅक्सिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी हे द्रावण ८ ते १० लिटर प्रति झाड या प्रमाणे वापरावे.
- इजा झालेल्या झाडांवर बहर घेऊ नये.
- पावसाने फळे गळालेली असल्यास योग्य विल्हेवाट लावावी.
- संत्रा, मोसंबी, लिंबू अशा आंबिया बहरसाठी ताणावर सोडलेल्या बागांचा ताण अवकाळी पावसाने तुटतो. बागा ताणात राहण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही) २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
-झाडांची पाने गळून पालवी कमी झालेली असल्यास, झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट (१ टक्का) १ किलो अधिक जिबरेलिक ॲसिड २.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी फायदेशीर राहू शकते.

डॉ. आदिनाथ पसलावर, ९८२२२२०२७२
(विभाग प्रमुख, कृषी विद्या विभाग)
डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७
(सहायक प्राध्यापक, अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प -फळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT