Agriculture Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Warehouse Update : कृषिमूल्य साखळ्यांची निर्मिती होत असताना गोदाम उभारणी हा घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, हे विविध परिस्थितीत शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि महिला बचत गट यांना विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करताना अनुभवावयास येते. सोयाबीन, उडीद, मूग, मका, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या पिकांची साठवणूक करताना सार्वजनिक गोदाम व्यवस्थेचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे.

यासाठी गोदाम पावती योजनेचा पुरेपूर उपयोग करून या योजनेत सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे गोदाम उभारणीचा उद्देश सफल होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास खऱ्या अर्थाने मदत होणार आहे. कृषी क्षेत्रातील बाजारविषयक विश्लेषक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार विविध कृषी उत्पादनांचे बाजारभाव पुढील सहा महिन्यात वाढणार आहेत.

पीक काढणीच्या काळात अन्नधान्याचे दर काही वेळेस अपवादा‍त्मक परिस्थिती वगळता नेहमी कमीच असतात. मागणी पुरवठ्याच्या सूत्रानुसार शेतीमाल काढणीच्या काळात सर्वच पिकांचे बाजारभाव पडतात. सद्यःस्थितीचा विचार केला तर असे लक्षात येईल, की सर्व कृषी उत्पादनांच्या किमती किमान आधारभूत किमतीच्या जवळपास आहेत. त्यामुळे योग्य बाजारभाव प्राप्त करून घेण्यासाठी शेतकरी वर्गाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या साठवणूक व्यवस्थेचा उपयोग करून धान्य लगेच न विकता किमान पुढील सहा महिन्यांसाठी वैज्ञानिक पद्धतीने साठविणे आवश्यक आहे.

गोदामात पोत्यांच्या थरांची उंची आणि मर्यादा

गोदाम उभारणीचा उद्देश, गोदाम उभारणीचे स्थान, गोदामात ठेवण्यात येणारी उत्पादने या सर्वांचा विचार करणे अत्यंत आवश्यक असते. गोदामाच्या रचनेनुसार त्यामध्ये उत्पादनांची साठवणूक करताना त्याच्या थरांची उंचीसुद्धा मर्यादित असणे अत्यंत आवश्यक असते.

मुंबई, इंदूर, अहमदाबाद यासारख्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्टीलचे साहित्य, झिंक बिलेट्स, विविध प्रकारचे लोखंडी साहित्य अशा अत्यंत जड वस्तूंना देशभरात मोठी मागणी असते. अशा वस्तू या बाजारपेठांमधून वाहतूक व्यवस्थेद्वारे विविध भागांत मागणीनुसार पुरविण्यात येतात. परंतु याकरिता व्यापारी किंवा उत्पादक यांच्याकडे बहुमजली गोदामे असणे आवश्यक असते.

वाळविलेल्या मिरच्या, गूळ, औषधे इत्यादी हलक्या वजनाच्या उत्पादनांच्या थरांची उंची मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याने अशा उत्पादनांसाठी बहुमजली गोदाम किंवा गोदामामध्ये अंतर्गत भागात स्टील किंवा सिमेंटचे रॅक बनविणे आवश्यक असते. कॉर्पोरेट जगतात एखाद्या कंपनीच्या मुख्यालयाची इमारत असेल तर संपूर्ण कंपनीची महत्त्वाची कागदपत्रे साठविण्यासाठी बहुमजली गोदाम किंवा बहुमजली साठवणूक व्यवस्था महत्त्वाची ठरते.

थराच्या प्रकारानुसार गोदामाच्या उंचीचे नियोजन

गोदामात उत्पादनांची साठवणूक करताना उत्पादनाच्या प्रकारानुसार त्याचे थर लावणे आवश्यक असते.

सिमेंटच्या पोत्यांची साठवणूक करताना एका थरात जास्तीत जास्त १० ते १२ पोती असावी किंवा खालील थरातील २ ते ३ पोत्यांचे वरील पोत्यांच्या दबावामुळे सिमेंटचे दगडात रूपांतर होते. त्यामुळे त्यातील सिमेंटचे नुकसान होते. अशाच प्रकारे हे सूत्र वह्या, पुस्तके, इतर स्टेशनरी, काचेचे साहित्य यांची साठवणूक करताना उपयोगात आणावे लागते.

ज्या परिसरात कापसाचे उत्पादन होते, कापसापासून गाठी बनविल्या जातात किंवा वाळविलेल्या मिरचीचे सुद्धा उत्पादन होते. अशा ठिकाणी गोदामांमध्ये बहुमजली व्यवस्था करणे फायद्याची ठरते. धुळे, नंदुरबार, चंद्रपूर, नागपूर अशा ठिकाणी ही रचना उपयुक्त ठरते. या ठिकाणी गोदामात जमिनीवर कापूस गाठी सारखी जड वजनाची कृषी उत्पादने साठविली जातात.

वाळविलेल्या मिरचीसारखी हलकी उत्पादने साठविण्यासाठी गोदामातील आतील भागात बहुमजली साठवणूक यंत्रणा उभारलेली असते. ज्या गोदामात स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, अशा गोदामात यंत्रांची उंची किमान ७.६० मीटरपर्यंत असते. त्याप्रमाणात गोदाम उभारणी करताना नियोजन करावे.

गोदामात चढ-उतार करण्यासाठी प्लॅटफॉर्मची रचना, संख्या आणि स्थान

गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनांची साठवणूक, ने-आण, चढ- उतार इत्यादी कारणांच्या अनुषंगाने गोदामास दरवाजा, खिडक्यांची योग्य रचना करणे आवश्यक असते.

साधारणपणे १८०० टन क्षमतेच्या प्रत्येक गोदामास दोन मोठ्या लांबीच्या भिंतींना प्रत्येकी दोन रोलिंग शटर म्हणजेच एकूण चार रोलिंग शटर गोदामातून मालाची ने-आण करण्यासाठी असावेत.

आगीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी आगरोधक यंत्रणा गोदामात बसवावी. ही यंत्रणा गोदामात बसविण्याच्या दृष्टीने दोन रोलिंग शटरचे एकमेकांपासूनचे अंतर ४५ मीटरपेक्षा जास्त नसावे. अशाच प्रकारे ३००० टन क्षमतेच्या गोदाम उभारणीच्या बाबतीत सुद्धा हेच सूत्र वापरून सहा रोलिंग शटरची तरतूद करण्यात यावी.

गोदाम उभारणीत गोदामाच्या प्लॅटफॉर्मची म्हणजेच गोदामाच्या उंबऱ्याची रचना साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनाच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावते. चांगला रस्ता असणाऱ्या जागेत गोदामाची उभारणी करताना प्लॅटफॉर्मची उंची रस्त्याच्या स्तरापासून किमान ०.८ मीटर उंच असावी.

रस्ता व्यवस्थित बांधलेला नसेल तर गोदामाच्या प्लॅटफॉर्मची उंची १.२ मीटर पर्यन्त वाढविण्यात यावी. परंतु ही उंची साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनांची गोदामातून ने आण करताना त्रासदायक होऊ शकते. परंतु रस्ता दुरुस्तीमुळे ही उंची भविष्यात दगड मातीची भर पडल्यामुळे कमी होत असल्याने ती पुन्हा ०.८ मीटरवर येऊ शकते. तसेच दोन गोदामे शेजारी शेजारी बांधताना दोन्ही गोदामांच्या प्लॅटफॉर्मच्या स्तरामध्ये ०.३० ते ०.५० मीटरचा फरक असावा. म्हणजेच एका गोदामाचा प्लॅटफॉर्म १.२ मीटर उंचीचा असेल तर दुसऱ्या गोदामाचा प्लॅटफॉर्म ०.८० मीटरचा असावा.

बऱ्याच जुन्या गोदामांची रस्त्यापासूनच्या उंचीचे निरीक्षण केले तर ही सर्व गोदामे ५० ते ६० वर्षे जुनी असून, त्यांची उंची जमिनीलगत आहे. राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या बाबतीत असे दृश्य दिसून येते. परंतु अशा परिस्थितीमुळे गोदामात पाणी शिरू शकते. उंदीर, घुशी गोदामाचे नुकसान करू शकतात. यामुळे गोदामात साठवणूक केलेल्या शेतीमालाचे नुकसान होऊ शकते.

गोदामाच्या प्लॅटफॉर्मच्या उंचीची रचना करताना उंदीर, घुशींपासून संरक्षण करणे आणि गोदामानजीक विकसित केलेले रस्ते अथवा रस्त्याच्या परिस्थितीनुसार प्लॅटफॉर्मची रचना करावी.

उंदीर, घुशी जमिनीपासून ६५० मिलिमीटर म्हणजेच ०.६५ मीटर पर्यन्त उडी मारू शकतात. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने गोदामाच्या प्लॅटफॉर्मची उंची सुधारित रस्त्यापासून ०.८० मीटर असते.

ट्रकची मागील डेकची उंची १ ते १.१५ मीटरपर्यंत असते. त्यामुळे गोदामामध्ये माल उतरविताना ट्रक गोदामाच्या प्लॅटफॉर्मला व्यवस्थित लावता यावा याकरिता प्लॅटफॉर्मची जास्तीत जास्त उंची १.२ मीटरपर्यंत असावी. अत्यंत क्लिष्ट परिस्थितीत गरजेनुसार १.५० मीटरपर्यन्त प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यास हरकत नाही, परंतु यासाठी ०.१५ मीटरच्या २ पायऱ्या बनविण्यात याव्यात. गोदामाच्या प्लॅटफॉर्मला शक्यतो कायमच्या पायऱ्यांची तरतूद नसावी. गरजेनुसार लोखंडी पायऱ्या बनवून वापरण्यात याव्यात.

दोन शेजारी शेजारी असणाऱ्या जुळ्या गोदामांच्या प्लॅटफॉर्मची उभारणी करताना दुसऱ्या गोदामाच्या प्लॅटफॉर्मची उंची ०.१० ते ०.३० मीटरने जास्त असावी. म्हणजेच पहिल्या गोदामाचा प्लॅटफॉर्म १.१० मीटर असेल तर दुसऱ्या गोदामाचा प्लॅटफॉर्म १.५० मीटर उंच असावा. याकरिता दुसऱ्या गोदामाची प्लिन्थ लेव्हल (पायाचा स्तर) पहिल्या गोदामाच्या तुलनेत ०.३० मीटर ने कमी ठेवावी.

गोदामाच्या रोलिंग शटरची उंची गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असते. उदाहरणादाखल साखरेच्या पोत्यांच्या ऑटोमॅटिक थर लावण्याच्या पद्धतीबाबत विचार केला तर असे लक्षात येईल की, साखरेची पोती कन्वेयर बेल्टद्वारे गोदामात साठविताना रोलिंग शटरची उंची ३ मीटरपेक्षा जास्त असू नये. औद्योगिक प्रकारचे उत्पादन गोदामात साठविताना रोलिंग शटरची उंची किमान ३.५ मीटरपर्यंत असावी.

गोदाम उभारणी करताना जमिनीपासून गोदामाच्या छतापर्यंत लोखंडी खांब व भिंती यांची रचना योग्य असणे आवश्यक असते.

गोदामातील ट्रसची रचना

गोदामाच्या भिंतीची उभारणी झाल्यापासून पुढे छताची उंची लोखंडी खांबांच्या साह्याने त्रिकोणी आकारात तयार होणाऱ्या रचनेस ट्रस अथवा कमान असे म्हणतात. या ट्रसमुळे संपूर्ण गोदामाचा डोलारा व गोदामाचा संपूर्ण सांगडा याचा अंदाज बांधता येतो.

ट्रसची उंची १८०० टन क्षमतेच्या गोदामासाठी ३.७५ मीटर पर्यंत आणि ३००० टन क्षमतेच्या गोदामासाठी ४.७५ मीटर पर्यन्त असावी. ट्रस / कमानीचा विस्तार १८०० टन गोदामासाठी २२ मीटर आणि ३००० टन गोदामासाठी २८ मीटर असावा.

(माहितीचा स्रोत : भारतीय अन्न महामंडळ माहिती पुस्तिका व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सनदी अभियंता यांची गोदाम उभारणी विषयक माहिती पुस्तिका)

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट,

साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT