Agriculture Warehouse : विविध साहित्यांची गोदामात साठवणूक

Warehouse Management : प्री-इंजिनियर्ड वेअरहाउसचे स्ट्रक्चर गोदामाच्या फॅक्टरीमध्ये बनविले जाते. त्यानंतर ज्या ठिकाणी गोदाम उभारणी करावयाची आहे अशा ठिकाणी विविध भाग एकत्र करून गोदामाची उभारणी केली जाते. ही उभारणी कमी वेळेत अत्यंत जलद गतीने होत असल्याने वेळेची बचत होते.
विविध साहित्यांची गोदामात साठवणूक
Agriculture WarehouseAgrowon
Published on
Updated on

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Update : कृषिमूल्य साखळ्यांची निर्मिती होत असताना गोदाम उभारणी हा घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. गोदाम उभारणीचे विविध उद्देश असले, तरी त्यानुसार गोदामाची रचना करणे गरजेचे असून वैज्ञानिक पद्धतीने गोदामाची उभारणी आवश्यक असते.

गोदामाची रचना

बांधकामाच्या पद्धतीनुसार गोदाम उभारणीचे प्रकार

छत नसलेले गोदाम /मोकळ्या जागेवर करण्यात येणारी साठवणूक

कव्हर अँड प्लिन्थ गोदाम (कॅप)

पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येणारी गोदामे

प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस-(पीईबी वेअरहाउस)

बहुमजली गोदाम

मागील काही लेखांमध्ये गोदामांच्या पाच प्रकारांपैकी आपण पहिले तीन प्रकार पाहिले आहेत. आजच्या लेखामध्ये प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस(पिईबी वेअरहाउस) आणि बहुमजली गोदामाची माहिती घेत आहोत.

विविध साहित्यांची गोदामात साठवणूक
Warehouse Construction : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस

प्री-इंजिनियर्ड बिल्डिंग (पीईबी स्ट्रक्चर) या प्रकारच्या पद्धतीमुळे वेळ, पैसा यात बचत होऊन साठवणुकीचे सर्व उद्देश साध्य होतात. वास्तविकपणे पारंपरिक गोदाम पद्धतीच्या पुढे जाऊन प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस(पिईबी वेअरहाउस) पद्धती विकसित करण्यात आली असली तर उद्योजक किंवा शेतकरी यांची या पद्धतीबाबत वेगवेगळी मतमतांतरे आहेत. जसे काहींना पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आलेली गोदाम उत्तम व टिकाऊ वाटतात तर काहींना प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस(पिईबी वेअरहाउस) उत्तम व टिकाऊ वाटतात. शेवटी प्रत्येक उद्योजकाचा गोदाम उभारणीचा उद्देश महत्त्वाचा आहे.

पारंपारिक गोदाम उभारणी पद्धतीमध्ये सांगाडा हा लोखंडी अँगल, चॅनेल्स, बीम व एमएस फ्लॅट या साहित्यापासून बनविलेला असतो. पारंपरिक गोदामामध्ये प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस (पिईबी वेअरहाउस) प्रकाराच्या तुलनेत गोदामाची उंची व मजबूत राहण्याचा कालावधी मर्यादित असतो. त्यामुळे पारंपरिक गोदाम प्री-इंजिनियर्ड वेअरहाउसच्या तुलनेत वजनाने जड व आर्थिकदृष्टया महाग असते.

प्री-इंजिनियर्ड वेअरहाउसचे स्ट्रक्चर गोदामाच्या फॅक्टरीमध्ये बनविले जाते. त्यानंतर ज्या ठिकाणी गोदाम उभारणी करावयाची आहे अशा ठिकाणी विविध भाग एकत्र करून गोदामाची उभारणी केली जाते.

प्री-इंजिनियर्ड वेअरहाउस उभारणी कमी वेळेत अत्यंत जलद गतीने होत असल्याने वेळेची बचत होते. त्यामुळे पारंपरिक गोदामाच्या तुलनेत गोदाम उभारणीकरिता कमी पैसा लागतो.

बहुमजली गोदाम

मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, सुरत इत्यादी शहरांमध्ये जमिनीच्या किमती वाढल्या आहेत. या शहरात व्यवसाय विकासाठी प्रचंड वाव आहे. अशा ठिकाणी बहुमजली गोदामे उभारून जागेचा जास्तीत वापर करता येऊ शकतो.

कृषी क्षेत्रात अन्नधान्याचे उत्पादन वाढल्याने आणि शेतकरी वर्गात धान्य साठवणुकीबाबत जागृती निर्माण झाल्याने व्यापारी वर्गाची संख्या वाढणे, वाहतुकीच्या साधनांमध्ये वाढ होणे, दूरच्या बाजारपेठेतील अन्नधान्याचे दर इंटरनेटच्या सुविधेमुळे कमी वेळेत समजणे या सर्व बदलांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यापार करण्यास आणि गोदामांची उभारणी करण्यास जागेची कमतरता जाणवत आहे.

विविध उत्पादनांची मुख्य बाजारपेठेतील उत्पादने जसे, की रेडिमेड कपडे व इतर उत्पादने, गाड्यांचे सुटे भाग, पॅकिंग स्वरूपातील किराणा माल, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, विविध क्रिडाप्रकारातील खेळणी, रोजच्या वापरातील वस्तू, औषधे, ग्राहकांच्या दैनंदिन वापरातील वस्तू (एफएमसीजी) या उत्पादनांसाठी बहुमजली गोदाम फायद्याचे ठरते.

विविध साहित्यांची गोदामात साठवणूक
Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षिततेचे उपाय

उत्पादनाच्या जास्त थप्प्या लागल्याने गोदामाची साठवणूक क्षमता असूनही गोदामात क्षमतेपेक्षा कमी उत्पादनाची साठवणूक होते. त्याचप्रमाणे साठवणूक करण्यात येणारे उत्पादन हलके असल्याने त्याचे कमी प्रमाणात थर लावले जातात. उत्पादनाचे जास्त थर लावल्याने गोदामाची साठवणूक क्षमता असूनही क्षमतेपेक्षा कमी उत्पादनाची साठवणूक होते.

सिमेंट व युरिया सारख्या उत्पादनांची बारांपेक्षा जास्त थप्पी लावून साठविल्यामुळे पायातील २ ते ४ थरातील सिमेंटचे अति दाबामुळे दगडात रूपांतर होते. युरियाचे पाण्यात रूपांतर होण्यास सुरवात होते. सोयाबीनचे बियाण्याच्या पोत्यांचे ८ ते १० पेक्षा जास्त थर लावले तर सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता कमी होते अथवा उगवण क्षमता नष्ट होते.

विविध जड व हलक्या वजनाच्या उत्पादनांच्या साठवणुकीचा विचार केला तर अशा उत्पादनांच्या साठवणूक उद्योगास वाव आहे.

बहुमजली गोदामाच्या उभारणीबाबत

बहुमजली गोदाम शक्यतो कमीतकमी दोन मजली असतात, परंतु पुढे व्यवसायाच्या गरजेनुसार मजल्यांची संख्या वाढविता येते. वैज्ञानिक आडाखे बांधून अचूक प्लॅन व एस्टिमेटच्या आधारे आरसीसी प्रकारात बहुमजली गोदाम उभारणीचे नियोजन करता येते.

बहुमजली गोदाम प्रकारात छोट्या व मोठ्या वाहनांसाठी रॅम्पची सुविधा आणि अवजड व हलक्या प्रकारच्या वस्तूंची ने आण व उचल ठेव इत्यादींकरिता इलेक्ट्रॉनिक इलेव्हेटरची (सामान उचल ठेव करण्यासाठी यंत्र सुविधा) आवश्यकता असते.

बहुमजली गोदामांमध्ये सामानाची उचल ठेव सोपी होण्यासाठी तळमजल्यावर डॉक लेव्हलिंग प्लॅटफॉर्मची सुविधा करावी.

(माहितीचा स्रोत: भारतीय अन्न महामंडळ माहिती पुस्तिका व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सनदी अभियंता यांची गोदाम उभारणी विषयक माहिती पुस्तिका)

शास्त्रीय पद्धतीने बांधकाम साहित्याची गोदामात साठवणूक

गोदाम व्यवसायात बांधकाम साहित्याची साठवणूक हा सुद्धा एक स्वतंत्र व्यवसाय करण्यात येतो. दगड, खडी, स्टीलचे बार, पाइप, सिमेंटचे पाइप, विट्रिफाइड टाइल्स इत्यादी साहित्याची साठवणूक वैज्ञानिक पद्धतीने करणे आवश्यक असते.

दगड, खडीची साठवणूक

दगड, खडी इत्यादी बांधकाम साहित्याची साठवणूक केली जाते. ४० मिमी, २० मिमी, १० मिमी खडीची साठवणूक करण्यात येते.

अशाप्रकारची साठवणूक पक्क्या सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर सिमेंटचा गुळगुळीत मुलामा केलेल्या जागेवर करावी. साहित्याचे व्यवस्थित थर लावण्याच्या अनुषंगाने स्वतंत्र कप्पे बनविण्यात यावे, जेणेकरून साहित्य व्यवस्थित रचून ठेवता येऊ शकेल, ते साहित्य एकमेकात एकत्रित होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसात तपमान योग्य ठेवण्यासाठी गरजेनुसार दगडांवर पाण्याची फवारणी करावी.

स्टीलचे बार, पाइपची साठवणूक

स्टीलचे बार, पाइप इत्यादी साहित्य थरावर थर लावून साठविण्यापूर्वी लाकडाचे मोठे ठोकळे किंवा तत्सम लाकडाचे मटेरिअल तयार करून त्यावर अशा साहित्याची साठवणूक करावी. यामुळे साहित्य, गोदामाच्या पायाचे असे दोघांचे संरक्षण होते.

सिमेंटचे पाइप साठवणूक

सिमेंटचे पाइप पक्क्या प्लॅटफॉर्मवर साठवावेत. पाईपच्या थरांची उंची जास्तीत जास्त चार किंवा पाईपच्या व्यासाच्या चौपट असावी.

विट्रिफाइड टाइल्सची साठवणूक

घरात बसविण्यात येणाऱ्या विट्रिफाइड टाइल्स सपाट ठेवून साठविण्यापेक्षा उभ्या ठेवून साठविण्यात याव्यात. अशा टाइल्स सपाट अथवा आडव्या साठवून ठेवल्या तर टाइल्सवर दाब पडून तुटून नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. परंतु टाइल्स उभी रचून ठेवल्याने त्यांची दबाव सहन करण्याची क्षमता वाढून नुकसान टळते.

टाईल्सने भरलेले बॉक्स शक्यतो सावलीत, ओलावा नसलेल्या जागेत ठेवावेत. उत्पादकाने दिलेल्या लॉट नंबरच्या क्रमाने शक्यतो साहित्याची मांडणी करावी.

टाइल्सच्या बॉक्स कव्हरवर दिलेल्या बाणाच्या दिशेने शक्यतो बॉक्स उभे करावेत. टाईल्सच्या आकारानुसार व रंगानुसार टाइल्सची मांडणी करावी.

अॅसबेसटॉस सिमेंटच्या पत्र्यांची साठवणूक

अॅसबेसटॉस सिमेंटच्या पत्र्यांची साठवणूक वाळू, भाताचा भुसा अंथरूण त्यावर करावी. एका अॅसबेसटॉस सिमेंटच्या पत्र्यांच्या थराची उंची १.५० मीटरपेक्षा जास्त नसावी. खराब झालेले अथवा तुटलेले पत्रे शक्यतो स्वतंत्ररीत्या साठवावेत.

जीआय (गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे) शीट अशाचप्रकारे साठवणूक करावी.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com