Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Farming: प्रयोगशीलतेतून सोयाबीन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न

Agriculture Innovation: वाशीम जिल्ह्यातील वरूड तोफा येथील मदन व्यवहारे यांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत बेड व टोकण पद्धतीचा अवलंब करून सोयाबीन उत्पादनात क्रांती घडवली आहे. आज ते प्रयोगशीलतेच्या जोरावर १५ क्विंटल एकरी उत्पादन घेत आहेत.

 गोपाल हागे

Soybean Farming Management:

शेतकरी नियोजन

सोयाबीन

शेतकरी : मदन गंगाराम व्यवहारे

गाव : वरूड तोफा, ता. रिसोड, जि. वाशीम

एकूण शेती : ४२ एकर

सोयाबीन क्षेत्र : ३० एकर

वाशीम जिल्ह्यातील वरूड तोफा (ता. रिसोड) येथील मदन गंगाराम व्यवहारे हे प्रयोगशीलता जोपासत सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेत आहेत. वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व स्वअनुभवातून त्यांनी सोयाबीन पिकात हातखंडा तयार केला आहे. तीन भावांचे व्यवहारे कुटुंब एकत्रितपणे ४२ एकर शेती करत आहेत. त्यापैकी ३० एकरांत सोयाबीन लागवड असते. तर उर्वरित क्षेत्रामध्ये हळद लागवड केली जाते. मदन व्यवहारे यांचे लहान बंधू अभिमान हे वाशीम येथे शिक्षक आहेत. तर दुसरे बंधू संजय आणि मदन हे दोघेही शेती करतात. त्यांचा सोबत मोठा मुलगा गजानन हे देखील शिक्षक असून सुट्टीच्या दिवशी शेतीकामांमध्ये हातभार लावतात.

लागवडीचे विविध प्रयोग

मदन व्यवहारे यांनी काही वर्षे नोकरी तसेच कृषी सेवा केंद्र करून कुटुंबाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी घरची शेती कसण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी शेतीमध्ये मूग, उडीद या पिकांची लागवड होती. गावपरिसरात त्यावेळी सोयाबीन लागवड होत नव्हती. मदन व्यवहारे यांनी २०२१ मध्ये गावात सोयाबीन टोकण पद्धतीने लागवडीचा प्रयोग केला. त्यात यशही आले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रयोगशीलतेला प्राधान्य देत पुढे सोयाबीन लागवडीत सातत्य राखले. आज वयाच्या ६२ व्या वर्षी देखील मदन व्यवहारे स्वतः शेतीकामे करतात.

पारंपरिक पेरणी पद्धतीने २०१९ मध्ये फक्त दोन एकर क्षेत्रावर चार फूट अंतरावर सरी काढून साडेपाच इंचावर पेरणी करण्यात आली. गादीवाफ्याचा माथा दोन फूट रुंद ठेवला. त्यासाठी एकरी ३० किलो बियाणे लागले. या लागवडीतून एकरी १३ क्विंटल उत्पादन हाती आले. त्यानंतर २०२१ मध्ये टोकण पद्धतीने सोयाबीन पेरणीचा प्रयोग केला. दोन बेडमध्ये साडेतीन फूट अंतर राखत बियाणांची टोकण करण्यात आली. सोयाबीन अधिक तूर अशी आंतरपीक पद्धती अवलंबिण्यात आली. दोन ओळी सोयाबीन तर एक ओळ तूर लागवड करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाला. तेव्हापासून संपूर्ण सोयाबीन लागवड ही बेडवर टोकण पद्धतीने करण्यास सुरुवात केली. त्यातून एकरी साधारणपणे १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. दरवर्षी दर्जेदार उत्पादन घेत सोयाबीन महामंडळाला बियाणे दिले जाते. त्यामुळे बाजारभावापेक्षा जास्त दर मिळण्यास मदत झाली, असे श्री. व्यवहारे सांगतात.

पीक संरक्षणावर भर

दरवर्षी सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणास थायरम, रायझोबिअम, पीएसबी याची बीजप्रक्रिया केली जाते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात रोगांचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे शक्य होते. त्यानंतर एका जागी १ ते २ बी या प्रमाणे टोकण केली जाते. पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी शिफारशीनुसार तणनाशक फवारणी केली जाते. उन्हाळ्यात पेरणी करण्यापूर्वी रान तयार करण्यावर भर दिला जातो. जैविक कीडनियंत्रणासाठी शेतात विविध ठिकाणी पक्षिथांबे तयार केले जातात. याशिवाय निळे व पिवळे चिकट सापळे शेतात वापरतात. मित्र किडींसाठी सोयाबीनमध्ये विविध सापळा पिकेही घेतली जातात. जसे की झेंडू, एरंड, ज्वारी, कोथिंबीर आदी पिके घेतली जातात.

केवळ सोयाबीन पेरणीस प्राधान्य

आज बहुतांश सर्व शेतकरी सोयाबीन पेरणीसोबत खते देतात. मात्र, व्यवहारे यांनी या पद्धतीला फाटा दिला आहे. केवळ सोयाबीन पेरणी करून पीक २० दिवसांचे झाल्यानंतर खतमात्रा दिली जाते. त्यातही फक्त डीएपी खत एकरी ४० किलो प्रमाणे दिले जाते. सोबत गंधक व गरजेनुसार फवारणीद्वारे मिश्र खते दिली जातात. तसेच पीक परिपक्व झाल्यानंतर काढणीच्या वेळेस शेतामध्ये जास्त दिवस न ठेवता, कापणी करून वाळविले जाते. यामुळे दाणे चांगले तयार होऊन, दाण्याला चांगली चमकसुद्धा मिळते, असा त्यांचा अनुभव आहे. पेरणीनंतर खोडमाशीसाठी रासायनिक कीटकनाशक फवारणी घेतली जाते. पिकाच्या फुलोरा अवस्थेत शक्यतो रासायनिक कीटकनाशकाचा वापर टाळला जातो. पिकाचे निरिक्षण करून प्रादुर्भाव पाहून योग्य वेळी आवश्यकता असेल तरच फवारणी घेतली जाते.

बेड पद्धतीचे फायदे

एकरी बियाण्याचे प्रमाण कमी.  उत्पादन जास्त, खर्च कमी.

जास्त पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास मदत.

पावसाचे प्रमाण कमी असेल तेव्हा पीक तग धरून राहते.

बेडवरील सोयाबीनच्या मुळ्या लांब व खोल जातात. त्यांची तग धरून राहण्याची क्षमता वाढते.

या पद्धतीत पावसामध्ये खंड पडला तरी पिकावर परिणाम होत नाही.

रासायनिक फवारणी करण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. फवारणी काम सोपे होते.

हवा खेळती राहिल्यामुळे कीड-रोगांचे प्रमाण तुलनेने कमी.

मदन व्यवहारे, ९९२३५३७३९०

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT