
सचिन आढे, राहुल वडघुले
Agriculture Tips: भाजीपाला, फळे व इतर पिकांमध्ये बदलत्या वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बऱ्याच वेळा रासायनिक कीटकनाशकांचा फवारणी करून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे मोठे नुकसान होते. यामागील सर्वांत मुख्य कारण हे किडींमध्ये रासायनिक कीटकनाशकांप्रती तयार झालेली प्रतिकारशक्ती होय.
मागील काही वर्षांपूर्वी रसशोषक किडी व पाने खाणाऱ्या किडीचे नियंत्रण करणे सोपे होते. शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर त्याचे प्रभावी परिणाम मिळत होते. मात्र अलीकडच्या काळात नावीन्यपूर्ण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून सुद्धा किडींवर नियंत्रण मिळविता येत नाही. कारण रासायनिक फवारणी करताना किडीची प्रादुर्भाव, तीव्रता, शत्रू कीड किंवा मित्रकीड यांची माहिती न घेता त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी वारंवार एकाच घटकाच्या रासायनिक फवारण्या घेतल्या जातात.
त्यामुळे फवारणीवरील खर्च वाढतो, मात्र अपेक्षित कीड नियंत्रण होत नाही. एकाच कीडनाशकाची वारंवार फवारणी केल्यामुळे त्या कीडनाशकाप्रती किडींमध्ये प्रतिकारशक्ती तयार होते. शिवाय फवारणीद्वारे कीड नियंत्रण करताना ९९ टक्के द्रावण हे हवेद्वारे उडून जाते. त्यामुळे उत्पादन खर्च देखील वाढतो. प्रभावी नियंत्रण न झाल्यास एकूण उत्पादनात कमालीची घट येते.
प्रामुख्याने मिरचीवरील फुलकिडे, कपाशीवरील बोंड अळी व वांग्यावरील फळ व शेंडा पोखरणारी अळी यासह अनेक प्रमुख किडींमध्ये रासायनिक कीडनाशकाप्रती रोगप्रतिकाशक्ती वाढलेली आहे. त्यामुळे या समस्येचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
मार्गदर्शक तत्त्वे
फवारणी साहित्याची निवड, वापर
कायम शिफारस केलेली रासायनिक कीटकनाशके लेबलक्लेम नुसार घ्यावीत. त्यानुसार फवारणीयोग्य साहित्याची निवड करून फवारणी करावी.
शिफारशीत कीटकनाशक कमी किंवा जास्त मात्रेत घेऊन फवारणी केल्यास किडींमध्ये प्रतिकारक्षमता वाढण्याची शक्यता असते. तसेच त्याचे मित्रकीटक, जीव, जंतू व पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.
सर्व फवारणीचे उपकरणे, नोझल, फिल्टर इत्यादी फवारणीचे साहित्याची वापर करण्यापूर्वी तपासणी करावी. फवारणीचे साहित्य योग्यरीत्या कार्य करत नसेल तर फवारणी केल्यानंतर त्याचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
फवारणी करताना किडीची सर्वांत संवेदनाक्षम अवस्था लक्षात घेऊन फवारणी करावी. जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळतील.
रासायनिक कीटकनाशकांची फेरपालट
वेगवेगळी कार्यपद्धती असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा फवारणीसाठी वापर करताना फेरपालट केल्यास किडीमधील प्रतिकारशक्ती टाळता येते.
किडीमधील प्रतिकारक्षमता टाळण्यासाठी पिकाच्या विविध अवस्थेत एकच कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकाची फवारणी करणे टाळावे. त्याऐवजी वेगवेगळी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकाची निवड करावी. त्यामुळे किडींमधील प्रतिकारशक्ती टाळता येते.
एकाच गटातील एकसारखी कार्यपद्धती असणाऱ्या कीटकनाशकाची किडीच्या एकाच अवस्थेत फवारणी करावी. साधारणपणे किडीची एक पिढी १५ ते ३० दिवसांची असते.
पिकांच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यावर, किडीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकाची फवारणीसाठी निवड केल्यास किडीची प्रतिकारशक्ती कमी करण्यास मदत मिळते. शक्य असल्यास किडीच्या एकाच अवस्थेमध्ये दोनपेक्षा जास्त कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
पिकाच्या व किडीच्या वेगवेगळ्या अवस्थेत फवारणी करताना वेगवेगळी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकाची ३ पेक्षा जास्त वेळा फवारणी करू नये.
फवारणीसाठी एकाच गटातील एकसारखे कार्यपद्धती असलेल्या नोंदणीकृत कीटकनाशकाचा पर्याय उपलब्ध नसेल तर फवारणीसाठी ते कीटकनाशक वापरू नये.
एकाच पिकात वेगवेगळ्या किडींवर एकसारखी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकांचा वापर
एकाच पिकामध्ये एकापेक्षा जास्त किडीसाठी कीटकनाशकांचा वापर एकापेक्षा जास्त वेळा करता येतो. परंतु त्यासाठी स्थानिक गरजेनुसार कीटकनाशक प्रतिकार व्यवस्थापनाचे पालन करणे, किडींच्या दोन पिढ्यांमध्ये होणारे बदल ओळखून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे अतिरिक्त कीटकनाशकाची फवारणी करणे टाळता येईल.
पिकांच्या कोणत्याही एका अवस्थेत कीड व्यवस्थापनासाठी एकापेक्षा जास्त किडीविरुद्ध वेगवेगळी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकांची फवारणी फेरपालट पद्धतीने केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.
काही वेळा एकाच पिकामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकार नुकसान करणाऱ्या किडी दिसून येतात. त्यावर नियंत्रण मिळविणे अधिक कठीण असते. अशावेळी कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाची शिफारशीपेक्षा जास्त मात्र फवारणीसाठी वापरली जाते. मात्र त्यामुळे किडीची प्रतिकारशक्ती वाढण्याची शक्यता असते.
सक्रिय घटकानुसार वापर
जमिनीत आणि बीजप्रकियेसाठी उपयोगात येणारी उत्पादने आंतरप्रवाही असल्याची खात्री करणे:
आंतरप्रवाही सक्रिय घटक असलेल्या उत्पादनांचा थेट जमिनीवर, बीजप्रक्रिया म्हणून किंवा पिकांच्या पानावर फवारणीद्वारे वापर करता येतो. आंतरप्रवाही कीटकनाशकांच्या दोन फवारणीतील अंतर वाढवून किडींमधील प्रतिकारशक्ती व्यवस्थापन साधता येते.
बीजप्रक्रियाद्वारे तसेच दाणेदार कीटकनाशके जमिनीतून दिल्यानंतरही कीड व्यवस्थापनाची गरज पडली, तर वेगवेगळी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकाची कीड नियंत्रणाकरिता निवड करावी. (उदा ः बीजप्रक्रिया किंवा आळवणी करताना आंतरप्रवाही कीटकनाशके वापरली असल्यास, फवारणीसाठी स्पर्शजन्य गुणधर्म असलेल्या कीटकनाशकाची निवड करावी.)
रोपांची पुनर्लागवड
रोपे खरेदी करताना रोप निर्मितीवेळी रोपवाटिकेत वापरलेल्या कीटकनाशकाच्या वापराबाबत माहिती घ्यावी. जेणेकरून रोपांची पुनर्लागवड केल्यावर एकसारखी कार्यपद्धती असलेल्या कीटकनाशकांचा पुनर्वापर टाळता येईल. तसेच रोपवाटिकाधारकांनी पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रात प्रतिकारशक्ती वाढलेल्या किडींचा इतर ठिकाणी प्रसार होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
संपूर्ण कव्हरेज आवश्यक
प्रभावी कीड नियंत्रणासाठी फवारणीवेळी कीटकनाशक द्रावणापासून संपूर्ण कव्हरेज मिळेल अशी फवारणी करावी. रसशोषक कीड बऱ्याच वेळा झाडाच्या अत्यंत दाट भागात, पानांच्या खालील बाजूला, झाडाच्या बुडाजवळ किंवा फुलांमध्ये लपून बसते. काहीवेळा फवारणी केलेले द्रावण त्या जागेपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. आणि कीटकनाशकाचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी चांगले फवारणी कव्हरेजसाठी दिलेल्या लेबलक्लेमनुसार सूचनांचे पालन करावे.
संवेदनशील अवस्थेत कीटकनाशकाचा वापर
निवड केलेल्या कीटकनाशकाची कार्यपद्धती किडीच्या केवळ एका विशिष्ट अवस्थेत चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविण्यास उपयुक्त असते. किडीच्या इतर कोणत्याही अवस्थेत कीटकनाशक वापरल्यास अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे किडीच्या सर्वांत संवेदनशील अवस्थेत फवारणी करणे योग्य राहते.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकावरील माहिती काळजीपूर्वक वाचून सूचनांचे पालन करावे. फवारणी करण्यापूर्वी त्याच किडींसाठी ते कीटकनाशक शिफारशीत आहे का याची खात्री करावी. आवश्यकता भासल्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
काही किडींची एका ठराविक अवस्थेत प्रतिकारशक्ती वाढलेली असते. अशा अवस्थेत फवारणी करणे टाळावी. (उदा. तंबाखूवरील पांढरी माशीची (बेमिसिया टॅबॅकी) प्रौढ व कोष अवस्था ‘निओनीकोटीनॉइड’ या कीटकनाशकाला संवेदनशील असते. तसेच पिलू अवस्थेत प्रतिकारशक्ती जास्त असते). निओनीकोटीनॉइड कीटकनाशक हे किडीच्या सर्वांत संवेदनशील अवस्थेत चांगले परिणाम देऊ शकतात.
मित्र कीटकांचे संवर्धन महत्त्वाचे
मित्र कीटकांचे संरक्षण केल्यास परभक्षी, परजीवी किडीद्वारे शत्रू किडीचे नियंत्रण होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल.
रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे मित्र किडीवर विपरीत परिणाम होतात. ते टाळण्यासाठी फवारणी करताना केवळ शत्रू कीड किंवा पिकांना नुकसान करणारे किडींवर परिणाम होईल अशा कीटकनाशकांची निवड करावी. पिकांवर एकापेक्षा जास्त किडी असतील तर ब्रॉड स्पेक्ट्रम गुणधर्म असलेल्या कीटकनाशक वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती
पिकांना नुकसान करणाऱ्या किडींपासून संरक्षण करण्यासाठी व किडींमधील प्रतिकारशक्तीच्या कमी करण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. या पद्धतीमध्ये किडीमधील प्रतिकारशक्ती वाढण्याचा धोका कमी केला जातो.
यामध्ये मशागतीय पद्धत, जैविक पद्धत, भौतिक पद्धत आणि रासायनिक पद्धतीचा समावेश होतो. त्यामुळे नैसर्गिक मित्र किडींवर विपरीत परिणाम होत नाही.
रसशोषक किडीमधील कीटकनाशक प्रतिकार व्यवस्थापन
शिफारशीत व सतत वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशक कार्यपद्धती विरुद्ध रसशोषक किडींमध्ये होणारे बदल किंवा कीटकनाशकाचा वापर करून देखील रसशोषक किडींवर न होणारे परिणाम म्हणजे किडींची कीटकनाशक प्रतिकार क्षमता होय.
एकाच गटातील व एकसारख्या मोड ऑफ ॲक्शन (क्रियेची पद्धत) असलेल्या रासायनिक कीटकनाशकाचा वारंवार वापर केल्यास किडीवर अपेक्षित परिणाम होत नाहीत. आकृती क्र. १ दाखविल्याप्रमाणे एकच क्रियाशील घटक वापरलेले हिरवा रंग पहिली फवारणी करताना ९० टक्के नियंत्रण दर्शविते, तर पिवळा रंग ४ थी फवारणी करताना केवळ ५ टक्के किडीची नियंत्रण दर्शवते.
- सचिन आढे, ९०११८४२०८४
(लेखक कृषी कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.