शिवाजी काकडे ७८८७५४५५५७
Parental Involvement in Education : प्रसिद्ध झेन फकीर नानीन याने आपल्या आयुष्यातील एक संस्मरण लिहिले आहे ते असे. एके दिवशी नानीन एका माणसाकडे शिकण्यासाठी जातो. अभ्यास करताना रात्र होते. नानीनला घरी जायचे होते मात्र बाहेर काळाकुट्ट अंधार होता. नानीन त्या माणसाला मदत मागतो. तो व्यक्ती नानीनच्या हातात एक दिवा पेटवून देतो. नानीन घराची शिडी उतरण्यासाठी पहिले पाऊल ठेवताच तो व्यक्ती दिव्याला फुंकर घालून दिवा विझवतो.
नानीन त्या व्यक्तीला म्हणतो, ‘‘बाहेर खूप अंधार आहे. दिव्याशिवाय मला जाता येणार नाही. आपण मला दिवा तर दिला पण विझवून टाकला. तो दिवा आता माझ्या काय कामाचा?’’ तो व्यक्ती उत्तर देतो, ‘‘दुसऱ्याच्या दिव्याने जो प्रकाश मिळतो त्यापेक्षा आपला स्वतःचा अंधार अधिक चांगला. स्वतःचा रस्ता स्वतः शोध.
अंधारात रस्ता शोधल्याने तुझ्या आतला दिवा पेटेल. शोधताना धडपडशील, पडशील पण त्यातून तुझ्या आतला दिवा प्रज्ज्वलित होईल.’’ पुढे नानीन आयुष्यात खूप मोठा होतो. तो व्यक्ती म्हणजे नानीनचा गुरु होता. नानीन आपल्या गुरूच्या स्मरणात लिहितो, ‘‘मी त्या माणसाला आयुष्यात कधीच विसरलो नाही ज्याने माझ्या हातातला दिवा विझवून मला अंधारात ढकलले आणि माझ्या आतला दिवा पेटवला. आजही माझ्या आतला दिवा तेवत आहे त्यासाठी माझ्या गुरूला धन्यवाद!’
चाकोरीबद्ध शिक्षण
शिक्षण म्हणजे काय? जे विचार करायला शिकवते ते शिक्षण. शिक्षण म्हणजे शोध घेणे. आज झपाट्याने वाढत जाणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि कोचींग क्लासेसमध्ये मुलांना स्पून फीडिंग सुरू आहे. शिक्षणाची व्याख्याच केवळ विशिष्ट परीक्षांची तयारी करून घेणे, अशी झाली आहे. या शाळा आणि क्लास मुलांना केवळ प्रश्नांची अपेक्षित उत्तरे लिहायला शिकवतात. मुलांच्या गरजा, आवड आणि शिकण्याची क्षमता, अध्ययन - अध्यापनशास्त्र, सर्वांगीण विकास यांकडे दुर्लक्ष करून मुलांना परीक्षाकेंद्री बनवले जात आहे.
भरपूर अभ्यास आणि परीक्षांच्या ओझ्याखाली मुले दबली जात आहेत. मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य पालक आणि व्यवस्थेने हिरावून घेतले आहे. घरी पालकांनी आणि शाळा, क्लासेसमध्ये शिक्षकांनी सांगितलेले ऐकायचे हेच मुलांचे कर्तव्य ठरवून दिले गेले आहे. या साऱ्या गोष्टी पालक मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी करीत असतात. मात्र यातून शिक्षणात कमालीची चाकोरीबद्धता आली. मुलांचा शिकण्यातील सहजपणा, शोधकवृत्ती लोप पावत आहे.
मुलांना शिकण्याचे आव्हान देणे
शिकण्यासाठी भरपूर साधने आहेत, शाळा, क्लास आहेत पण मुले आनंदाने शिकत नाहीत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. मुलांना शिकवायचे कसे यापेक्षा मुले शिकतात कशी, हे शिक्षक आणि पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. शिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक मूल स्वतः शिकू शकते. शिक्षक आणि पालकांनी केवळ सुलभक म्हणून मुलांना योग्य ती मदत करणे अपेक्षित असते. मुलांची शिकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातील एक महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना
शिकण्यास आव्हान देणे. मुले घरी दिलेला अभ्यास करण्यास कंटाळा करतात, नाखुशीने अभ्यास करतात किंवा त्यात ते मनापासून स्वतःहून सहभागी होत नाहीत. याचे कारण म्हणजे मुलांना अभ्यासात आव्हान वाटत नाही. मुलांना आव्हाने स्वीकारायला आवडतात. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आव्हान देणे ही कमालीची प्रभावी प्रक्रिया आहे. आव्हानातून मुलांची चेतना जागृती होऊन त्यांना स्व-निर्मितीचा आनंद मिळतो.
तेच काम नानीन च्या गुरूने केले होते. अशाप्रकारे शिक्षकांनी वेगवेगळी आव्हाने मुलांना दिली... स्वतः गोष्ट तयार करा, व्यावसायिकाची मुलाखत घ्या, स्वतः गणिताची शाब्दिक उदाहरणे तयार करा... या प्रकारे प्रत्येक विषयांची वेगवेगळी आव्हाने शिक्षकांनी मुलांना दिली. मुलांनी ही आव्हाने स्वीकारून ती जिद्दीने आणि आनंदाने पूर्ण केली. यातून मुलांची शिकण्याची गती वाढली. मुलांनी आपल्या सर्व क्षमता वापरल्या. मुलांचा विचार करण्याची क्षमता, शोधक वृत्तीचा यातून विकास झाला. शिकणे सहज आणि आनंदी झाले.
मुलांना कला, क्रीडा, खेळ, व्यायाम, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, वाचन, उपक्रम, प्रकल्प याद्वारे कल्पक आव्हाने देऊन माहिती गोळा करण्याची, अभिव्यक्त होण्याची आणि नवनिर्मितीचे आव्हान दिल्याने मुले स्व-प्रयत्नाने शिकण्याचा आनंद अनुभवतात. तसेच मुलांमध्ये आव्हान स्वीकारण्याची सवय व वृत्ती वाढीस लागते.
आयुष्यात येणाऱ्या आव्हानांकडे समस्या म्हणून न पाहता आव्हान म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण होण्याचे काम आव्हाने करतात. शिक्षण म्हणजे केवळ काही परीक्षा उत्तीर्ण होऊन उदरनिर्वाह चालवणे नव्हे. शिक्षण रोजगारक्षम असावेच पण शिक्षणातून संपूर्ण जीवनप्रक्रिया आपल्याला समजावी. शिक्षणातून जीवनाचा बोध व्हावा. मुलांना केवळ घोकंपट्टी स्वरूपाचा अभ्यास न देता त्यांना विचार करायला लावणारे, शोधवृत्ती, चिकित्सक व सर्जनशील स्वरूपाची आव्हाने दिल्यास त्यातून खरे जीवनशिक्षण मिळते.
अमेरिकेचा प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड यांची मुले त्याच्या कारखान्यासमोर बूटपॉलिशचे काम करीत असत. कुणीतरी त्याला विचारले तुम्ही एवढे जगप्रसिद्ध उद्योगपती आहात आणि आपली मुले असे बूटपॉलिशचे काम का करतात. हेन्री फोर्ड म्हणाला, ‘‘एकेकाळी मी पण तेच काम करत होतो. ते करता-करता मी उद्योगपती हेन्री फोर्ड झालो. माझी मुलं आजच हेन्री फोर्ड झाली तर एक दिवस त्यांच्यावर बूटपॉलिश करण्याची वेळ येईल. आयुष्यात कष्ट करण्याची सवय, आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती माणसाला यशस्वी बनवते. मुलांनाही वेगवेगळी आव्हाने स्वीकारायला आवडतात. मुलांना त्यांची क्षमता, आवड पाहून शिक्षकांनी, पालकांनी वेगवेगळी अभ्यासाची आव्हाने द्यावीत.
आज मध्यमवर्गीय मुलांचं जगणं कमालीच कृत्रिम बनलं आहे. त्यांना ना कुठले कष्ट ना शरीरश्रम. पाहिजे ते वेळेवर आणि आयतं मिळत आहे. सुखासीन आणि चैनी आयुष्य ते जगतात. त्यांना अभ्यासाबरोबरच काही कौशल्ये शिकणे गरजेचे आहे. कामातून, कष्टातून त्यांना कामातला आनंद कळणं, निर्मितीतील गंमत कळणं आणि त्यातून स्वतःबद्दलचा विश्वास वाढवणे आवश्यक आहे.
सध्या शिक्षणक्षेत्रात अभूतपूर्व असा गोंधळ आहे. केवळ शासनाने चांगली धोरणे आखून उपयोग नाही. धोरणांचा चांगला परिणाम येण्यासाठी पालकांना पालकत्वाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांना शाळेत आणि घरीही वेगवेगळी आव्हाने दिल्यास त्यांच्या आतला दिवा तेवून मुलांची स्व-जागृती होऊन मुले समीक्षात्मक विचारसरणीचे, समस्या निराकरण करणारे, निर्णयक्षम, सर्जनशील आणि कर्तबगार नागरिक बनतील.
(लेखक सहायक शिक्षक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.