Primary Education : हृदय तृप्त करणारे हवे शिक्षण

Education System : मुलांच्या भाषिक विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमताच खुंटत आहे. बुद्धीबरोबरच हृदयाला तृप्त करणारे शिक्षण देण्यासाठी मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण हवे.
Education
EducationAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Education in Mothertongue : एक प्रसिद्ध वीणावादक होता. तो वीणावादनात अत्यंत प्रवीण होता. मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबात वीणावादन कुणीच शिकले नाही. एक-दोन पिढ्यांनंतर कुटुंबातील सदस्य वीणेचा उपयोग कशासाठी होतो हे देखील विसरले. ती वीणा बिनकामाची वस्तू म्हणून खुंटीला टांगून ठेवण्यात आली. ती वीणा मुलांकडून खेळताना खाली पडायची, झणझण आवाजाने घरातील शांती भंग व्हायची. घरातील माणसाची झोपमोड व्हायची. ती वीणा त्या घरातील लोकांसाठी एक उपद्रवी वस्तू झाली होती.

ही वीणा आपण फेकून देऊ असे घरातील सदस्य ठरवतात आणि एकेदिवशी एका कचराकुंडीत फेकतात. तेवढ्यात तिथे एक भिकारी येतो आणि वीणा उचलून घेतो. वीणेची तार छेडतो. अत्यंत मंत्रमुग्ध करणारे सूर तो निर्माण करतो. सुरेख संगीत ऐकून आजूबाजूचे लोक तिथे जमा होतात. ज्याने वीणा फेकली होती तो पण तिथे येतो. तो भिकाऱ्‍याला म्हणतो, ‘‘ही वीणा माझी आहे, मला परत दे.’’ भिकारी म्हणतो, ‘‘ही वीणा त्याची आहे ज्याला वाजवता येते. तू वीणा घरी नेऊन काय करणार? मुलं त्याची तार छेडतील, घरातील शांतता भंग होईल आणि पुन्हा कचऱ्यात फेकली जाईल.’’

आपल्या कडील पूर्वजांचा असा अनमोल ठेवा आपण भिकाऱ्‍याकडे देऊ नये, असे त्या वीणामालकाला वाटले म्हणून तो वीणा घरी घेऊन जातो. वीणा वाजविण्याची कला मात्र तो शिकत नाही.

आता तो नित्यनियमाने त्या वीणेची पूजा करतो तिला हार चढवतो. अधूनमधून ‘आमच्या कुटुंबाचा अमूल्य ठेवा’ म्हणून समाजमाध्यमांवर फोटोदेखील टाकतो. वीणावादनाचे ज्ञान प्राप्त करण्याऐवजी तो दांभिक होऊन पूजाअर्चा आणि फोटोसेशन करतो. आजची शिक्षणव्यवस्था देखील अशीच काहीशी बालकेंद्री, ज्ञानकेंद्री होण्याऐवजी ऑनलाइन धार्जिणी झाली. फोटो, व्हिडिओ आणि ऑनलाइन माहिती यातून शिक्षणात कोरडेपणा वाढतोय.

Education
Indian Education : नागरिक घडविणारे ‘बुनियादी’ शिक्षण

उपक्रमांचा भडिमार

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या शिक्षणाचा पाया आहे. हा पाया भाषा व गणित या विषयांच्या मुळांवर उभा राहतो. भाषा ही जगण्याचे विचार करण्याचे, स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम आहे. तर गणित म्हणजे विज्ञानाची, सर्व शास्त्रांची भाषा. वाचण्याची, लिहिण्याची व संख्यांची मूलभूत क्रिया करण्याची क्षमता हा एक आवश्यक पाया आणि भविष्यातील सर्व शालेय शिक्षणासाठी आणि निरंतर अध्ययनासाठीची एक पूर्वअट आहे. सरकारी शाळांमध्ये राबवले जाणारे प्रचंड उपक्रम यांमुळे मुलांच्या मूलभूत क्षमता विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होताच वेगवेगळे अभियान, उत्सव, महोत्सव, सप्ताह, पंधरवडा या गोंडस नावाने वेगवेगळे उपक्रम सुरू झाले. शाळा म्हटले की उपक्रम आलेच. मात्र या उपक्रमांचा अतिरेक होतोय. उपक्रमाचे साध्य काय, तर ऑनलाइन माहिती भरा, फोटो व्हिडिओ अपलोड करा. बरेच उपक्रम मुलांच्या वयानुरूप नसतात. उपक्रम मुलांच्या क्षमता विकासापेक्षा ऑनलाइन माहितीवर भर देणारे असतात.

यात शिक्षकांचा बराच वेळ जातो. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत आहे. मुलांचा भाषा आणि गणितीय क्षमतांचा विकास योग्य प्रकारे झाला नाही, तर मुलांचे पुढील शैक्षणिक जीवनच अंधकारमय होऊन जाते. सध्याचे दिखाऊ उपक्रम एकप्रकारे शिक्षणाला त्या वीणेप्रमाणे सजविण्याचे काम करत आहे. शिक्षण म्हणजे सजावट नाही. मुलांची शिकण्याची तार तेव्हाच छेडली जाईल, जेव्हा मुलांचा उत्तम भाषिक आणि गणितीय क्षमतांचा विकास होईल. प्राथमिक शिक्षणातील ‘बेगडी’ उपक्रम तातडीने थांबवून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Education
Agriculture Education : कृषी शिक्षणात हवेत व्यापक बदल

संवेदनशील मनासाठी स्व-भाषा

मातृभाषेचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. कारण मातृभाषा नैसर्गिकपणे शिकली जाते. ती केवळ भाषा नसते तर मागील पिढीचे सारे संचित आपल्यापर्यंत घेऊन येते. आपण ज्या कुटुंबात, समाजात जन्मतो त्या कुटुंबाची, समाजाची कित्येक पिढ्यांची जोपासलेली संस्कृती, परंपरा आपण मातृभाषेद्वारा शिकत असतो. ज्ञानभाषा महत्त्वाची असली तरी मातृभाषाही त्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे. कारण परभाषा मेंदूपर्यंत पोहोचते, तर स्व-भाषा हृदयापर्यंत. एका तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची बायको काही कामानिमित्त बाहेर जाते.

आपल्या छोट्या बाळाला ती पतीजवळ सोडून जाते. थोड्या वेळाने ते बाळ रडायला लागते. प्राध्यापक महोदय बाळाला कडेवर घेऊन म्हणतात, ‘‘बाळ असं रडू नये, रडणे हे शरीरासाठी हानिकारक असते. रडणे हा शूरांचा धर्म नव्हे.’’ पण बाळ काही रडायचे थांबत नाही. तेवढ्यात शेजारची एक मुलगी येते ती बाळाला हृदयाशी धरते. ‘आलेले, ओओ ओओ, गुलू, गुलू काय झालं माझ्या बालाला,’ असे म्हणून खेळकर हावभाव करते. लगेच मूल शांत होते. कारण ती मुलगी बाळाच्या मनाची, हृद‌याची भाषा बोलते.

तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे पण लहान मुलांसाठी नाही. आज इंग्रजीच्या हट्टापायी आम्ही मुलांच्या मनाची, हृदयाची भाषाच हिरावली. कथा, गाणी, गोष्टी, चरित्र यांतून मुलांचे संस्कारक्षम व संवेदनशील मन तयार होते. आजच्या शिक्षण प्रणालीचे अंतिम ध्येय कोणते तर नीट, जेईई किंवा तत्सम परीक्षांसाठी मुलांची तयारी करून घेणे. केवळ यासाठी मग इंग्रजी, गणित आणि विज्ञानाची तयारी लहानपणापासून करून घ्यायची. भाषा ही सर्व विषयाचा आणि मुख्यत्वे विचारांचा मूलाधार आहे. मुलांच्या भाषिक विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमताच खुंटत आहे. बुद्धीबरोबरच हृदयाला तृप्त करणारे शिक्षण देण्यासाठी मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण हवे.

शिक्षण आणि शांती एका मित्राच्या घरी गेल्यावर त्याच्या मुलीशी गप्पा मारल्या. मुलगी म्हणाली मी सीनियर केजीत शिकते. संध्याकाळी ट्यूशनला पण जाते. तिची आई अभिमानाने म्हणाली, ‘‘नीट - जेईई’च्या दृष्टीने आतापासून आमची तयारी सुरू आहे.’ त्याच क्षणी मनोमन भिकारी आणि राजाची गोष्ट आठवली. राजाला एक भिकारी झोळीभर दान देण्याचे आव्हान देतो. राजाला गंमत वाटली. राजा भरपूर धन घेऊन झोळीत टाकतो. राजाचा महालभर असलेला खजिना संपतो, पण झोळी भरत नाही.

राजा भिकाऱ्‍याला झोळी न भरण्याचे रहस्य विचारतो. ‘ही झोळी मी माणसाच्या हृदयापासून बनवली आहे आणि माणसाचे हृदय कधीच तृप्त होत नाही,’ भिकाऱ्‍याने उत्तर दिले. ज्या शिक्षणाने माणसाच्या हृदयाचे पात्र तृप्त होते ते खरे शिक्षण. वीणा वाजवता आली नाही तर अशांती आणि वाजवता आली तर शांती निर्माण होते. आज शिकलेले तरुण अस्वस्थ, अशांत आणि संवेदनाशून्य होत आहेत. शिक्षणातून लाभदायी रोजगार निर्माण व्हावा त्याचबरोबर शिकणारे नीतिवान, तर्कशुद्ध, सहानुभूतीशील, सहृदयी, सुखी, समाधानी आणि आनंदी व्हावे. यातूनच शांततापूर्ण समाजाची निर्मिती होईल.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com