Devla News : देवळा तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची दाहकता शिगेला पोहोचली असून, पाणीटंचाईचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. ४० अंशांवर गेलेले तापमान आणि पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्याने तालुक्यातील २५ गावे, ३७ वाड्या-वस्त्यांवर ३३ टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी लोहोणेर, महालपाटणे व इतर गावांतील ३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तालुक्यातील लघुपाटबंधारे कोरडेठाक झाले आहेत. त्यामुळे त्यांवर आधारित असलेल्या पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात गतवर्षी ८०० मिमी पाऊस पडला होता. यंदा ३०५ मिमी पाऊस झाला.
यामुळे भूजलपातळी १०० फूट इतक्या खोलवर गेली आहे. तालुक्यातील पूर्व व दक्षिण भागातील गावांत पाणीटंचाईची भीषणता अधिक आहे. त्यामुळे ३३ टँकरच्या साहाय्याने पाण्याच्या खेपा केल्या जात आहेत. जनावरांचाही चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यावर्षीचा उन्हाळा वाढते तापमान आणि पाणीटंचाईमुळे असह्य झाल्याचे चित्र आहे.
टॅंकरने पाणीपुरवठा होणारी गावे
गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे, मेशी, चिंचवे, भिलवाड, डोंगरगाव, सांगवी, वराळे, दहिवड, वाखारी, तिसगाव, शेरी, कणकापूर, कांचने, पिंपळगाव, गुंजाळनगर, उमराणे, महात्मा फुले नगर, खर्डा, श्रीरामपूर, खुंटेवाडी, मुलूकवाडी, खडकतळे, वाजगाव, सुभाषनगर यांसह इतर वाड्यावस्त्या.
रामेश्वर पूर्ण भरणार का?
चणकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर लघुपाटबंधारा भरण्यासाठी गेल्या १०-१२ दिवसांपासून पाणी सोडण्यात आले आहे. परंतु या बंधाऱ्यात आतापर्यंत केवळ १५ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा कालवा २० मे पर्यंतच चालणार असल्याने पुरेसा पाणीसाठा होणार नसल्याने बंधारा किमान ५० टक्के भरण्यासाठी कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.