Amravati News : दर्जेदार संत्रा आणि मोसंबी रोपांचे उत्पादन आणि विक्रीसाठी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाटची ओळख आहे. दर वर्षी एक ते दीड कोटी संत्रा कलमांचे उत्पादन या ठिकाणी होते. मात्र मृगाच्या पावसाने जून महिन्यात दडी मारल्याने संत्रा कलम विक्रीला त्याचा फटका बसला आहे.
राजस्थान व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने टक्के संत्राकलमा विक्रीच्या प्रतीक्षेत असून मागणी घटल्याने भावही घसरले आहेत. दर वर्षी सुमारे ४५ ते ५० रुपये असा दर असलेल्या कलमांची विक्री त्यामुळेच यंदा अवघ्या २० ते ४५ रुपयांत केली जात आहे. यामुळे संत्रा कलम उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
वरुड तालुक्यातील संत्राकलमांचे माहेरघर असलेल्या शेंदूरजनाघाट येथे ७५ वर्षांपासून संत्राकलम निर्मितीचा पारंपरिक व्यवसाय शेतकरी करतात. वरुड तालुक्यात शेंदूरजनाघाटसह अधिकृत नर्सरी परवानाधारकांची संख्या २२० आहे. तर तेवढ्याच संख्येत विना परवानाधारक रोपवाटिका व्यावसायिक आहेत.
ईडलिंबूपासून काढलेल्या बियापासून नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये जंभेरीचे रोप तयार केले जाते. त्यावर संत्रा, मोसंबी, लिंबूची कलम (डोळा) चढविण्याची बडिंग प्रक्रिया केली जाते. महिने मशागत व जपवणूक करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात संत्रा, मोसंबी, लिंबूची कलम विक्रीकरिता उपलब्ध होतात.
येथे मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणासह पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी संत्रा व मोसंबीच्या कलमा खरेदीकरिता येतात. परंतु यावर्षी मृगाच्या पावसाने राज्यात दडी मारल्याने जून महिन्यात पाऊस आलाच नाही. तर राजस्थान आणि मध्य प्रदेशातून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संत्रा रोपे खरेदी करून नेल्याने येथील नर्सरीधारकांना काहीसा दिलासा मिळाला होता. यामुळे या भागातील बाजारात रेलचेल होती. परंतु पुन्हा पाऊस आला नसल्याने बाजारातील गर्दी ओसरली. त्यामुळेच दर वर्षी ४५ ते ५० रुपये प्रती कलम असा दर असताना यंदा मात्र २० रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत रोपांची विक्री होत आहे.
दर वर्षी एक ते दीड कोटी रोपे तयार केली जातात. त्यापैकी सुमारे ६५ ते ७० लाख रोपांची विक्री होते, असे नर्सरीधारकांनी सांगितले. विशेष म्हणजे नागपुरी संत्रा हा चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपणारा आहे. त्यामुळेच याच्या रोपांना मागणी राहते, असेही सांगण्यात आले.
देशभरातून या भागातील कलमांना मागणी असते. राजस्थान, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील शेतकरी एकाचवेळी खरेदीसाठी येतात. त्यामुळे एकाचवेळी मागणी वाढत दर तेजीत असतात यंदा मात्र राजस्थानमध्ये सुरुवातीला त्यानंतर मध्य प्रदेश आणि आता महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. संत्रा रोपांची खरेदी करण्यासाठी येणारा शेतकरी आता विखुरलेल्या स्वरूपात येत आहे. परिणामी दर दबावात आहेत. २० ते २८ रुपये प्रति कलम असा उत्पादकता खर्च आहे. आमच्या रोपवाटीकेतील दोन ते अडीच लाखावर रोपांची विक्री होते.उद्धव फुटाणे, नर्सरीधारक शेतकरी, वरुड, अमरावती
दर वर्षीपेक्षा यंदा पाऊस एक महिना उशिरा आला. तसेच आल्यावर सतत रिमझिम सुरूच असल्यामुळे संत्रालागवडीला शेतकऱ्यांना अडचणी तयार झाल्या. परिणामी संत्राकलमांची उचल कमी झाल्याने भाव घसरले.सुनील सावरकर, नर्सरीधारक, शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.