Mosambi Orchard : कहाणी वाळलेल्या मोसंबी बागेची

Mosambi Farming : महिनाभरापूर्वी जालना - घनसावंगी रस्त्यावरील वाळून गेलेली एक मोसंबीची बाग जवळून पाहावयास मिळाली. संपूर्ण बाग वाळलेली असूनही एका कोपऱ्‍यात मोसंबीचे एक लहान झाड तेवढेच हिरवागार दिसत होते. हा एकुलता एक जीव काय संदेश देत होता, हे त्या शेतकऱ्‍यांच्या मात्र लक्षात येत नव्हते.
Mosambi Orchard
Mosambi OrchardAgrowon

Mosambi Farming Management : साधारण १९७०-७२ मधील घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुका आणि त्यामधील बनोटी हे गाव. या गावामध्ये माझ्या मित्राची महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात इंजिनिअर म्हणून नेमणूक झाली होती. त्याचा पत्राद्वारे मला निरोप आला, ‘‘येथील मोसंबीच्या उत्कृष्ट बागा पाहावयास ये, झाडावरील प्रत्येक मोसंबी दोन हातात बसणार नाही एवढी मोठी आणि तेवढीच गोड, रसदार आहे.’’ तेथील मोसंबीच्या बागा पाहणे, मोसंब्याची चव चाखणे मला जमले नाही.

मात्र, जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी जालना धनसावंगी रस्त्यावरील वाळून गेलेली एक मोसंबीची बाग मात्र जवळून पाहावयास मिळाली. संपूर्ण बाग वाळलेली असूनही एका कोपऱ्‍यात मोसंबीचे एक लहान झाड तेवढेच हिरवेगार, तरतरीत दिसत होते आणि कारण साधेच होते, ते म्हणजे आजूबाजूचा सर्व शेतातील कचरा त्याच्या भोवती साचलेला होता, बाजूलाच गोठा सुद्धा होता.

बाकीची मोसंबी बाग पूर्ण वाळलेली आणि रान आरशासारखे निर्मळ होते. हा एकुलता एक जीव काय संदेश देत होता, हे त्या शेतकऱ्‍यांच्या लक्षात येत नव्हते. कारण दोन-तीन दिवसांतच जेसीबी त्याच्या शेतात मोसंबी बाग भुईसपाट करण्यास येणार होते. काही दिवसांपूर्वी हजार एक मोसंबी उत्पादक शेतकऱ्‍यांचा मोर्चा त्यांच्या वाळलेल्या मोसंबी बागांच्या पंचनाम्याच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा एकेकाळी मोसंबी बागांनी समृद्ध होता आणि त्यास कारण होते ते जमिनीमधील कर्बाचे उत्कृष्ट प्रमाण आणि उन्हाळ्यातही बागेमध्ये कायम असणारा नैसर्गिक ओलावा. हवामान बदलाचा चटका भारतास बसू लागला आणि महाराष्ट्रामधील विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सर्वांत जास्त भाजून निघू लागले. जालना जिल्ह्यामधील बदनापूर भागात अनेक गावांमधील शेतकऱ्‍यांनी त्यांच्या शेकडो मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवली.

Mosambi Orchard
Mosambi Management : मोसंबीसाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

या भागामधील दुधना, भोर्डी, सुरवना या सारख्या अनेक लहान मोठ्या नद्या पावसाळ्यानंतर पुन्हा कधी वाहिल्याच नाहीत. विहिरींनी तळ गाठला. बोअरवेलला पाणी नाही. विकतच्या टँकरवर लाख, दोन लाख रुपये खर्च करून कशी बाग जगविणार? त्यामुळे अनेक शेतकऱ्‍यांनी त्यांच्या १५-२० वर्षांच्या जिवापाड जपलेल्या पूर्ण उत्पादित बागा सरसकट भुईसपाट केल्या. कुऱ्हाडीने किती तोडणार? म्हणून जेसीबी तळपत्या उन्हाच्या काहिलीमध्ये या बागांना उध्वस्त करत शेकडो शेतकऱ्यांचे डोळे ओले करत होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ‘पाचोड’ हे मोसंबीचेच गाव आणि तेथील बाजारपेठ मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. याच पाचोडच्या बसस्टॅंडवर बस थांबली की आम्ही बसमधून खाली उतरत मोठ्या गोड मोसंबीचा फक्त चार आण्यात पोटभर आस्वाद घेत असूत. आज कुठल्याही फळ विक्रेत्याच्या दुकानावर जा, मोसंबी शोधुनही सापडणार नाही. या पाचोडमध्ये सर्वांत जास्त मोसंबी संहार झाला. वर्षाला चार ते पाच लाख रुपये नफा देणाऱ्‍या या बागा आता सरपण म्हणून सुद्धा कोणी घेण्यास तयार नाही.

मोसंबी बागा उध्वस्त करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मागील दोन वर्षांपासूनची दुष्काळाची दाहकता आणि पाण्याची कमतरता! लेखाच्या सुरुवातीस मी सोयगावचे उदाहरण दिले आहे, त्यावेळी म्हणजे ५० वर्षांपूर्वी तो भाग पाण्याने समृद्ध होता पण वातावरण बदलामुळे आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. पूर्वी नद्या बारमाही वाहत्या होत्या. त्यामुळे तुम्ही कोणतेही पीक सहज घेऊ शकत होता. आता दिवाळीपासूनच नद्या कोरड्या पडत आहेत. भूगर्भातील पाणी खोल गेले आहे. बोअरवेलची संख्या मोजण्यापलीकडे आहे. तलाव कुठे दिसत सुद्धा नाहीत. मग मोसंबीसारखे पीक आपण कसे घेणार? याचा सारासार विचार आम्ही केलाच नाही.

मोसंबी पिकास जेवढे योग्य संतुलित पाणी तेवढा फळांचा आकार मोठा, साल पातळ आणि रसामध्ये गोडवा असतो. जेव्हा या फळबागेस पाण्याचा ताण बसू लागतो तेव्हा फळांचा आकार लहान होऊ लागतो, साल जाड आणि आतील रसाचे प्रमाण कमी होऊ लागते. त्याचबरोबर गोडवा कमी होऊन आंबटपणा वाढू लागतो.

Mosambi Orchard
Mosambi Management : शास्त्रीय व्यवस्थापनानेच मोसंबीमध्ये परिवर्तन शक्य

हे सर्व गुणधर्म हे मोसंबी झाडाचा आणि त्यांच्या फळांचा वातावरण बदलाशी लढा असून त्यातून त्यांची स्वप्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न असतो. अर्थात हे समजण्यासाठी आपण सर्वप्रथम वृक्ष वाचन करून वृक्षास समजून घेणे गरजेचे असते. वृक्षाचा वातावरण बदलाशी लढा त्याच्या पद्धतीने सुरू असतो. आपण मात्र तो मृत होणार समजून सोडून देतो. ‘‘अंथरुण पाहून पाय पसरावे,’’ अशी म्हण फक्त पुस्तकापुरती नसून प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी आहे.

उसाप्रमाणे मोसंबी सुद्धा पाण्यावर प्रेम करणारे पीक आहे. आपल्या क्षेत्रात पाणी किती आहे? किती खोल जाणार आहे? मला टँकरने पाणी देणे परवडणार का? टँकरवाला आपल्या असाह्य परिस्थितीचा फायदा घेणार का? याचा आम्ही विचारच केला नाही. माझ्या जालना भेटीत त्या संपूर्ण वाळलेल्या बागेच्या कोपऱ्‍यामधील एकमेव हिरवे झाड मला मल्चिंगचे महत्त्व सांगून गेले.

रान निर्मळ करून मोसंबीला पाणी देण्यापेक्षा प्रत्येक झाडाभोवती खोल आळे करून त्यात गवताचे मल्चिंग केले असते तर जमिनीखाली मुळाभोवती ओलावा टिकला असता, झाडाची पाने गळून पडली असती तरी ते जिवंत राहू शकले असते. प्रत्येक वृक्षास आपणास जमेल तेवढी सावली देता आली असती तर ओलावा राखत झाडांचे उन्हापासून रक्षण झाले असते.

पावसाळ्याच्या तोंडावर एवढ्या परिपक्व मोसंबीच्या बागावर जेसीबी चालवणे जेवढे वेदनादायक त्यापेक्षाही लेकराप्रमाणे जपलेल्या प्रत्येक झाडाचा वेदनेसह होणारा मृत्यू जास्त क्लेशकारक आहे. कृषी अधिकारी आता या बागांचे पंचनामे करतील, शेतकऱ्‍यांना थोडी फार नुकसान भरपाई मिळेल सुद्धा. पण हवामान बदलात आणि वाढत्या उष्णतेमध्ये भाजलेल्या संभाजीनगर आणि जालन्यामधील मोसंबी या अतिशय गुणकारी औषधी आणि सुमधुर फळाचे क्षेत्र झपाट्याने कमी होणार त्याचे काय?

सध्याच्या वातावरण बदलाच्या कालखंडात असे फळबाग उत्पादन घेणे धोक्याचे आहे, असा नकारात्मक संदेश या मोसंबी उत्पादक पट्ट्यात जाणे योग्य नाही. आम्ही जमिनीचे तापमान आणि हवामान अंदाज यामध्ये ‘तू तू मैं मैं’ करत आहोत, पण मोसंबीसारख्या पाण्यासाठी संवेदनशील असलेल्या वृक्ष बागेस तेथील जमिनीचे तापमान किती महत्त्वाचे आहे याचा विचार आम्ही कधीच केला नाही.

अशा जमिनीत जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी जिवाणूंची संख्या जास्त आणि त्याप्रमाणात ओलावा धरून ठेवण्याची क्षमताही प्रचंड! या तीन सूत्रांचा प्रभाव नेहमीच जास्त असतो. भविष्यात जेव्हा अशा फळबागा वातावरण बदलाच्या तडाख्यात वाचवण्याची वेळ येईल तेव्हा या तीन सूत्रांबरोबर मल्चिंग आणि बांधावरील उंच वृक्षांची दाट सावली निश्चितच आपणास सकारात्मक पद्धतीने मदत करेन. हवामान बदलावर मात करण्यासाठी वृक्षांना काय हवे ते समजून घेणे जेवढे महत्त्वाचे त्यापेक्षाही ते आपण त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देऊ शकू का, हेही माहीत असणे जास्त गरजेचे आहे.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com