Nagar News : सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या भागांत पाहणी करून मुंबईकडे जाणारे पथक थांबले. त्यातील एका अधिकाऱ्यांला गावकऱ्यांनी ओळखले आणि दुष्काळाची पाहणी करणारे हे पथक असल्याचे कळताच गावकऱ्यांनी विनंती करून पथकासमोर व्यथा मांडल्या.
शेतीप्रश्नावर चर्चा केली, जाता जाता घाईघाईत मागण्याचे निवेदन देऊन सरकारने आमच्या दुष्काळी भागातील प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती केली. बैठकीत या भागातील दुष्काळाची स्थिती निदर्शनात आणून देऊ, असे सांगत पथक मुंबईकडे रवाना झाले.
राज्यात पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्या भागातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रातील निती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा मंत्रालय सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन मंत्रालयातील एच. आर. खन्ना, आयुक्त उपसचिव प्रदीपकुमार, राजेश के, मोताराम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दुष्काळीस्थितीची चार दिवस पाहणी केली.
त्यातील एका पथकात निती आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, केंद्राच्या ग्रामीण विभागाचे अतिरिक्त आयुक्त मोती राम व एमआयडीएच विभागाचे अतिरिक्त सचिव मनोज कुमार हे तीन वरिष्ठ अधिकारी होते. दुष्काळी भागात पाहणी करताना त्यांच्यासोबत कृषी विभागातील संवेदनशील अधिकारी व बीडमध्ये कार्यरत असललेले आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब नितनवरे होते. नितनवरे यांच्यावर पथकाचा दौरा पुर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत थांबण्याची जबाबदारी होती.
धाराशिव, बीडमधील पाहणी करुन पथकाने गुरुवारी (ता. १४) रात्री उशिरा नगरला येऊन मुक्काम केला. पथक शुक्रवारी (ता. १५) सकाळी मुंबईकडे निघाले होते. नगर-पुणे रस्त्यावरील कामरगाव येथे पथक चहासाठी थांबले. सोबत नितनवरे होते. नितनवरे यांनी या भागात काही वर्ष कृषी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. बांधावर जाऊन काम करणारा अधिकारी असल्याने नगर तालुक्यातील बहुतांश शेतकरी त्यांना ओळखतात.
त्यांना पाहिल्यावर काही शेतकऱ्यांनी विचारले आणि दुष्काळी पाहणी करणारे पथक असल्याचे कळले. नगर तालुक्यातील कामरगाव, चास व परिसरातही तीव्र दुष्काळ आहे. मात्र नंतरच्या टप्प्यात येथील मंडले दुष्काळात आल्याने पथकाने नगर जिल्ह्यात पाहणी केलेली नाही. थांबलेल्या अधिकाऱ्यांना येथील सरपंच व गावकऱ्यांनी निवेदन स्वीकारण्याची विनंती केली.
लगेच एका कागदावर व्यथा लिहून काढल्या. तो पर्यंत उपस्थित शेतकऱ्यांनी कांदा निर्यात तत्काळ सुरू करावी. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा, पीकविमा मंजूर होऊनदेखील शेतकऱ्यांना तो वेळेवर मिळत नाही व पीकपाहणी करताना मंडलनिहाय न करता गावनिहाय करावी, नियोजनात येथील पाहणी करण्याचे नियोजित नसले तरी या भागात आम्हाला दुष्काळ जाणवतेय. तुम्ही दिलेल्या निवेदनानुसार बैठकीत मुद्दा मांडू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुष्काळी भागाची पाहणी पथक मुंबईकडे चालले होते. कामरगावात थांबल्यावर त्यांच्यासोबत आमच्या भागात कृषी विभागात चांगले काम केलेले बाळासाहेब नितनवरे दिसल्यावर आम्ही चौकशी केली तर पथक असल्याचे कळले. जरी या भागातील पाहणी करण्याचे नियोजन नसले तरी किमान व्यथा तरी मांडू, असे म्हणत आम्ही शेतकऱ्यांसह त्यांच्याकडे दुष्काळीची आपबीती सांगितली व निवदेन दिले. पथकानेही आम्हाला दिलासा दिला.- तुकाराम कातोरे, सरपंच, कामरगाव (ता. जि. नगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.