Agricultural Scientist Dr. Prashantkumar Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Scientist: कापूस शेतीला दिशा देणारा शास्त्रज्ञ: डॉ. प्रशांतकुमार पाटील

Dr. Prashantkumar Patil: महात्मा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या अचानक अन् अकाली निधनाने शेतकरी बांधव, कृषीमधील शिक्षक, संशोधक, विस्तार कार्यकर्ते अशा सर्वांना ॲग्रीवीर हरपल्याचे अतोनात दुःख झाले आहे.

Team Agrowon

डॉ. चारुदत्त मायी

Cotton Farming Innovation: डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी कृषी संशोधनाची सुरुवात नागपूरमधून केली, त्या वेळी त्यांचा आणि माझा परिचय झाला. मी कापूस उत्पादनाचे तंत्रज्ञान विकसित करत होतो आणि डॉ. पाटील कापूस काढणीपश्चात तंत्रज्ञानात मग्न होते. त्यामुळे आमची मैत्री घट्ट झाली. त्याचे कारणही सबळ होते. दोघांनाही कापसाविषयी प्रेम व ओढा होता. कापसाच्या वेचणीनंतर त्या पिकाचे काय होते, हे असंख्य शेतकऱ्यांना शिकविण्याचे काम डॉ. पाटील यांनी केले.

नागपूरस्थित जिनिंग प्रशिक्षण केंद्राचे ते संचालक असताना त्यांनी या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यासाठी त्यांनी जिनिंग मशिनरी बनविणाऱ्या कंपन्यांसोबत करार केले. छोटे छोटे तसेच मोठे जिनिंग यंत्रणांत त्यांनी तांत्रिक सल्ला देऊन तशा प्रकारचे यंत्र तयार करून घेतले. त्यामधे स्वच्छ व गुणवत्तापूर्ण रुई निर्मिती करणे हा प्रमुख उद्देश होता.

विदर्भातील शेतकऱ्यांना कापसाच्या पऱ्हाटीतील फायदा होऊ शकतो, यासाठी एक प्रकल्प नागपूरमध्ये स्थापन केला. पऱ्हाटी तसेच कापसाचे देठ आदींपासून पार्टिकल बोर्ड तयार करण्याचा पायलट प्लॉट उभा केला. त्या अनुषंगाने बरेच उद्यमीदेखील यावर कारखाना उभारण्यास तयार झाले. कापसाच्या काढणीनंतर पऱ्हाटीचा वापर पॅलेट्स, ब्रिकेट्स अशा इंधनउपयुक्त वस्तूचे देखील कारखाने विकसित करण्यात मदत केली.

डॉ. पाटील यांनी एमटेकची पदवी खडकपूर येथील आयआयटीमधून, तर नागपूर येथील व्हीएनआयटीमधून पीएचडी मिळवली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी कृषी अभियांत्रिकी हा विषय उत्तम रीतीने शिकविला. परंतु त्यांची खरी रुची ही कापूसआधारित उद्यमशीलतेकडे असल्यामुळे ते भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई मधे शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.

त्यांनी केलेल्या उत्तम संशोधन आणि विस्तार शिक्षणाचा फायदा पुढे त्यांची निवड त्यांच संस्थेचा संचालक म्हणून २०१४ मध्ये झाली. संचालक म्हणून कार्यभार सांभाळतात त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व गुणाची चुणूक दिसू लागली. शंभर वर्षे जुन्या या संस्थेचा कायापालट करण्याचे काम डॉ. पाटील यांनी केले. या संस्थेच्या गेल्या दशकातील यशस्वी वाटचालीचे श्रेय मोठ्या प्रमाणात डॉ. पाटील यांना जाते. केवळ पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा नव्हे तर संशोधन, विस्तार, कापूस उत्पादकांचा सहभाग, कापड उद्यमी आणि कापूस व्यापार करणाऱ्या संस्था या सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर आणून भारतीय कापसाचा दर्जा कसा उंचावता येईल, याचा त्यांनी अथक प्रयत्न केला.

त्यांच्या या कामाची दखल, संयुक्त राष्ट्र संघाने (UN) घेऊन त्यांना ‘कृतज्ञता सर्टिफिकेट’ बहाल केले. एवढेच नव्हे तर अशा प्रकारचे कापूस साखळी मूल्यवर्धन अनेक आफ्रिकन देशात व्हावे, यासाठी त्यांचे दौरे आयोजित केले. डॉ. पाटील यांनी आफ्रिकेतील कापूस उत्पादक अनेक देशांना भेटी दिल्या तसेच तेथील उद्यमींना भारतात प्रशिक्षणासाठी बोलवून त्यांना जास्त शिक्षित केले. मुंबईच्या कापूस तंत्रज्ञान संस्थेमधे त्यांनी ‘स्टेट ऑफ आर्ट नॅनो तंत्रज्ञान’ प्रयोगशाळा स्थापन केली. त्याचप्रमाणे कापूस गुणवत्ता चाचणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा निर्माण केली. कापूस हा कल्पवृक्ष आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी रुई, कापसाच्या पऱ्हाट्या, कपाशीचे तेल,

बियाण्यावरील लिंटर, कापसाची ढेप अशा अनेक उपयुक्त वस्तूंचे भांडार असणाऱ्या कापसाची ओळख उत्पादकांना करून दिली. जेणेकरून कापूस उत्पादकांना सर्वांपासून काही आर्थिक लाभ मिळू शकेल. कापूस बियाण्यावरील लिंटरचा उपयोग भारतीय नोटा चलनामध्ये कसा होऊ शकतो, हे त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना समजावून दिले, ज्यामुळे करोडो रुपयांची लिंटर आयात करणे थांबवू शकेल. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांच्या संस्थेला ‘सरदार पटेल उत्कृष्ट संस्था ॲवॉर्ड’ देण्यात आला. त्यांना बरीच वैयक्तिक पारितोषिक मिळाली आहेत. परंतु त्यांनी सर्व श्रेय आपल्या सहकाऱ्यांना देऊन जास्तीत जास्त ‘टीम’ ॲवॉर्ड संपादन केले.

संचालक कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. पाटील! पुढे ते २०२१ मध्ये कुलगुरू झाले. कोरोना काळात त्यांनी धडाडीने कामाला सुरुवात केली. ‘ना झूकेंगे ना रुकेंगे’ हा त्यांचा बाणा त्यांनी विद्यापीठात देखील दाखवून दिला. त्यांच्या या स्पष्ट वागणुकीमुळे त्यांचा मित्र परिवार भरपूर वाढला. कुलगुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढविण्यात त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे देखील लक्ष दिले नाही. विद्यापीठाचा कायापालट करण्याचा अतोनात प्रयत्न केला.

कृषी विद्यापीठांच्या दुरवस्थेकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी ते भांडायला तयार असत. त्यांच्या अखत्यारीत काय करता येईल ते सर्व काही करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकरी विकासाच्या योजनांसह विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सोईस्कर पदस्थापना, अनुकंपा भरती, सेवानिवृत्त लाभ आणि सुधारित निवृत्तिवेतन, त्याचप्रमाणे देशी गायींसाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प अशा अनेक बाबींकडे लक्ष दिले.

विद्यापीठातील दुर्लक्षित शिक्षक भरती, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, तोकडा निधी कालबाह्य संस्थेचे स्टॅच्युट्स व अ‍ॅक्ट्स, शिक्षकाच्या पदोन्नतीतील घोळ, करिअर अडव्हान्स, पदोन्नतीसाठी जुनाट कायदे या विषयी ते खिन्न असत व माझ्याशी याबद्दल नेहमी बोलत असत. विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे अशी त्यांची मनीषा केवळ सरकारी उदासीनतेमुळे अतृप्त राहिल्यासारखे वाटते.

डॉ. पाटील यांनी प्रशासकीय अधिकाराची अपेक्षा कधीच बाळगली नाही. त्यांना ज्ञानातून प्राप्त होणारा अधिकार न मागता मिळाला आणि तो तसा शिक्षक, संशोधक, विस्तार कार्यकर्त्याला मिळावा, हीच त्यांची अपेक्षा होती. कापूस उत्पादक शेतकरी तसेच कापूस सोसायटीच्या अनेक सभासदांच्या व माझ्या वतीने, आज मी या लेखाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या जाण्याने कृषी वैज्ञानिकामध्ये निश्चितच कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

९९७०६१८०६६

(लेखक माजी कुलगुरू तसेच कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Death : रानडुकरासाठीच्या तारकुंपणातील विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Crop Loan : उद्दिष्टाच्या ५० टक्केच पीककर्ज वितरित

Soybean Pest Control: सोयाबीनवर हुमणी आणि पाने खाणाऱ्या अळीचा हल्ला! शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाय

Rain Update : जतमध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT