Health
Health  Agrowon
ॲग्रो विशेष

Health : आपलं घर विषागार होऊ देऊ नका...

- डॉ. सतीलाल पाटील,

‘‘अहो, घरात झुरळं (cockroaches) खूप झालीयेत, पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवावं लागेल?’’ बायको म्हणाली आणि घरफवारणीवाल्याला मी फोन लावला. दुसऱ्या दिवशी तो आला. आम्हाला सर्व भांडीकुंडी बाजूला काढून ठेवायला सांगितली. जादूगाराने आपल्या पिशवीतून सामान काढावं तसं लेबल नसलेल्या बाटल्या, झुरळांची जेलची डबी, फवाऱ्याचा पंप अशा वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढल्या.

औषध पंपात टाकून घरभर भरगच्च फवारलं. किचनमध्ये तर त्याचा फवारा जरा जास्तच तेज होता. झुरळांचं आमीष म्हणून पिठाच्या (की जेलच्या) गोळ्या घरभर चिकटवल्या. ‘‘हे कसलं औषध आहे हो भाऊ?’’ असं विचारल्यावर ‘‘सेंद्रिय आहे सर!’’ असं चेहऱ्यावर सेंद्रिय हसू आणून उत्तर दिलं. हे खरंच सेंद्रिय आहे का? याचा तपास मात्र लागू शकला नाही.

पेस्ट कंट्रोलसाठी मोजकी रसायनं वापरली जातात. इमिडाक्लोप्रिड, सायपरमेथ्रीन, फिप्रोनील इत्यादी. तीच लेबलं काढून, पिठाच्या किंवा आमीष जेलमध्ये मिसळून ती सेंद्रिय म्हणून फवारली जातात. पेस्ट कंट्रोलमध्ये आता रसायनं अनकंट्रोलेबल झालेत. पण या रासायनिक कीटकनाशकांमुळे कित्येक अपघात झाल्याचे आपण ऐकतो. सर्वांत जास्त अपघात उंदीर मारायच्या औषधाने होतात. ब्रोमोडिओलोन, झिंक फॉस्फेट या रसायनांनी बरेच जीव घेतले आहेत. उंदरांसाठी ठेवलेलं रसायन लहान मुलं किंवा पाळीव प्राणी चुकून खातात आणि त्यांना विषबाधा होते.

विषबाधेच्या बाबतीत दुसरा नंबर लागतो तो ‘फ्युमीगंट’ म्हणजे वासाने मारणाऱ्या कीटकनाशकांचा. या प्रकारात, फवारल्यावर कीटकनाशकाचा वास घरात भरून राहतो. या वासाने किडे मरतात. पण घरात हा रसायनी वास भरलेला असताना घरात झोपलेले कुटुंबातील सदस्य संपल्याची उदाहरणं भरपूर आहेत.

ही झाली त्वरित होणारी विषबाधा. पण या कीटकनाशकांचे दीर्घ दुष्परिणाम देखील आहेत. डोळ्यांची जळजळ होणं, कमजोरी, गरगरणं, डोकं दुखणं, त्वचेवर पुरळ उठणं यांसारख्या अल्पावधीच्या लक्षणांबरोबरच ते चरबीत साठून राहतात. किडनी, लिव्हरसारख्या अवयवांना इजा होऊ शकते आणि मोठ्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.

जमिनीवर, हवेत, भिंतीवर आणि किचन ओट्यावर त्यांचे अंश पडलेले असतात. बऱ्याचदा ते धुळीच्या कानांना चिकटून हवेत येतात आणि श्‍वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्या जागेला आपला स्पर्श झाल्यास ते आपल्या शरीराला चिकटतात. अमेरिकन पर्यावरण संशोधन संस्थेच्या अहवालानुसार घरामध्ये लक्षणीयरीत्या कीटकनाशकांचं प्रमाण सापडतं. या रसायनांचा संसर्ग घरातील लोकांना सतत होत असतो.

आजमितीला घरातील किड्यांना मारण्यासाठी ११३ कीटकनाशकं केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने मंजूर केलेल्या यादीत आहेत. त्यापैकी डेल्टामेथ्रीन, मॅलॅथिऑन, प्रोपॉक्सर, इमिडाक्लोप्रिड, फिफ्रोनील, क्लोरपायरिफॉस यांसारखी कीटकनाशके सर्रास वापरली जातात.

कीटकनाशकांचा ‘हाफ लाइफ पीरियड’ महत्त्वाचा असतो. हाफ लाइफ पीरियड म्हणजे अर्धायुषी काळ. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपण जेवढं कीटकनाशक फवारलं होतं, त्यांच्यापैकी ५० टक्के कीटकनाशक विघटित व्हायला जेवढे दिवस लागतील तो वेळ. फवारल्यानंतर मातीतील जिवाणू, पाणी, सूर्यप्रकाश यामुळे कीटकनाशकाचं विघटन होतं.

कीटकनाशनकांच्या हाफ लाइफ म्हणजे अर्धायुष्याच्या काळासाठी या तीन घटकांचा मोठा सहभाग आहे. पण घरात माती नसते, जिवाणू अगोदरच डिसइन्फेक्टन्टने आणि साबणाने सकाळी सकाळी धुऊन पुसून काढलेले असतात आणि पाण्याचा काही संबंध नाही, गॅलरी सोडल्यास सूर्यप्रकाशाचा संबंध दूरदूरपर्यंत नाही.

अशा वातावरणात घरात वापरलेल्या कीटकनाशकांचं हाफ लाइफ किती आहे, याचा अभ्यास करायच्या भानगडीत कोणी पडलं नाही. जी माहिती आपल्याकडे आहे ती सगळी हे कीटकनाशक नदीनाल्याच्या पाण्यात गेल्यावर, मातीत मिसळल्यावर काय होईल, यावर आधारित आहे. किचनच्या ओट्यावर आज कीटकनाशक फवारले तर किती दिवस त्याचे अंश तिथं राहतील, याचा अभ्यास कुणाकडे सापडत नाही.

आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा हाफ लाइफ पीरियड किती आहे ते पाहूया. मातीमध्ये फिफ्रोनील १२५ दिवसांत अर्ध विघटित होतं. काही शोधनिबंधांच्या मते तो ३६ तासांपासून सात महिन्यांपर्यंत असतो. म्हणजे झुरळाच्या दोनेक पिढ्या घरात नांदून जातात, पण फवारलेलं फिफ्रोनील संपत नाही. त्याचबरोबर डेल्टामेथ्रीनचा हाफ लाइफ पीरियड साधारणतः सहा दिवसांपासून ते २०९ दिवसांपर्यंत आहे.

मॅलॅथिऑनचा १७३ दिवस आहे, इमिडाक्लोप्रिडचा चाळीस दिवसांपासून १२४ दिवसांपर्यंत आहे. म्हणजे वर दिलेला काळ हा या कीटकनाशकांचा अर्धा ऱ्हास व्हायला लागणार वेळ आहे. त्याचा १०० टक्के निःपात व्हायला किती वेळ लागेल हे रामच जाणे. कारण तशी माहिती कुठे सापडत नाही. थोडक्यात, ही रासायनिक कीटकनाशकं आपल्या घरात लांबचा मुक्काम ठोकून राहतात.

या रसायनांच्या अतिवापराने कीटकनाशकांप्रती किड्यांमध्ये पचनक्षमता तयार झालीये. एक कीटकनाशक सलग तीन-चार वेळा फवारले की त्याला झुरळं पचवतात आणि बेअसर करून टाकतात. मग एकतर डोस वाढवला जातो किंवा दोन-तीन कीटकनाशकांचं कॉकटेल करून झुरळाला ‘किक’ देण्याचा प्रयत्न होतो

मला कळतं तसं लहानपणी गावातील घरात झुरळ झाल्याचे कधी आठवत नाही, की पेस्ट कंट्रोल केल्याचं देखील स्मरत नाही. लाकडी छत होतं त्यात जीवसृष्टीचं चक्र फिरत राहायचं. फोटोखाली, मीटरच्या मागे चिमण्यांचा संसार फुललेला असायचा. पालीचा निवांत मुक्काम भिंतीवर असायचा.

झुरळ, किड्यामुंग्यांचा ते फडशा पडायचे. पण चिमण्या, कबूतर, पाल, मुंग्यांचा कधी त्रास झालाच नाही. शहरात सिमेंटची जंगलं झाली आणि घरातील किड्यांचं जीवनचक्र बिघडलं. मग ते बेलगाम वाढू लागले आणि फवाऱ्याची गरज भासू लागली. विकसित देशात घरातील किड्यांचा त्रास सर्वांत जास्त आहे. म्हणून पेस्ट कंट्रोलची मागणी तिकडे जास्त आहे.

म्हणजे पर्यावरणाशी किडे करणारी आधुनिक जीवनशैली घरातील किडे वाढवते, असा याचा अर्थ घ्यायचा का? ढेकणाच्या बाबतीत तर अमेरिकेत जगातील सर्वांत जास्त ढेकणांचा प्रादुर्भाव आहे आणि पर्यायाने ढेकणांच्या औषधाचा वापर देखील तिकडे जास्त आहे. ढेकणांना वैतागलेली इथली लोकं चक्क घर, फर्निचर जाळून टाकतात. जगाचं रक्त शोषणाऱ्यांचं देखील रक्त शोषणारा पाश्‍चिमात्य ढेकूण पाहून मला ‘हॅट्स ऑफ’ व्हावंसं वाटतं.

घरातील रसायनांच्या बाबतीत उपाय कोण करेल? या बाबतीत सरकार उदासीन आहे. मनेका गांधींसारख्या व्यक्तींचा उंदीर मारण्याला, चिकट सापळ्यात पकडण्याला विरोध आहे. काही राज्यांत तर त्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आलीय. मग या गणेशाच्या वाहनाला ‘बाबा, आमच्या घरात येऊ नको’ असं समुपदेशन तरी कसं करायचं आणि होणारं नुकसान तरी कसं टाळायचं? केंद्रीय कीटकनाशक मंडळाने ११३ कीटकनाशकांचा घरातील कीडनियंत्रणासाठी समावेश केलाय. पण त्यात पायरेथ्रीन सोडल्यास एकाही जैविक/सेंद्रिय कीटकनाशकाचा समावेश नाहीये.

सरकार पुढे सरकेल तेव्हा सरकेल. पण आपण मात्र घरात पेस्ट कंट्रोल करताना काही काळजी घेऊ शकतो. आपल्या घरात फवारल्या गेलेल्या कीटकनाशकाचं लेबल तपासा. लेबलवर लाल, पिवळे, निळे आणि हिरवे त्रिकोण छापलेले असतात. शक्यतोवर हिरव्या किंवा निळ्या त्रिकोणाच्या कीटकनाशकाची निवड करा.

ते सेंद्रिय असल्याचं फवारणी करणारा म्हणत असेल तर त्यावरील सेंद्रिय असल्याचा लोगो पाहा. सेंद्रिय प्रमाणपत्राची मागणी करा. त्या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन उत्पादनाची माहिती घ्या. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्या उत्पादनाची ‘मटेरियल सेफ्टी डेटा शीट (एमएसडीएस)’ वाचा. त्यामध्ये त्या घटकांचे काय विषारी दुष्परिणाम होतात आणि ते कसे हाताळावेत ते लिहिलेलं असतं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अतिवापर टाळा.

सेंद्रिय अन्नाचा अट्टहास धरणाऱ्या लोकांच्या स्वयंपाकघरात रासायनिक कीटकनाशके वास करतात, हे नग्नसत्य आहे. अन्नाच्या, शेतातील कीडनियंत्रणाच्या बाबतीत आपण जेवढी सजगता बाळगतो तेवढीच घरातील कीडनियंत्रणात बाळगावी आणि सेंद्रिय घर या संकल्पनेचा नारळ फोडावा. ही वाट सोपी नाहीये पण अशक्यही नाही. आपलं घर विषागार होऊ नये ही अपेक्षा!

(लेखक ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस

प्रा.लि.चे संचालक आणि ड्रीमर अॅंड डुअर्स या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT