Tomato Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Rate : टोमॅटो परवडत नसतील तर खाऊ नका, पण बोंबलता कशाला?

Tomato Latest News: गेल्या सहा महिन्यांतील टोमॅटोची काय स्थिती होती? आजची ही दरवाढ होण्यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते. ५० पैसे किलोने विकले जात होते, हे तुम्हाला आठवतंय का?

महारुद्र मंगनाळे

- महारुद्र मंगनाळे

खरंतर सोशल मिडियावरचे अर्धवट शहाणे विद्वान बघून शेतीबद्दल लिहायची इच्छा हळूहळू संपुष्टात येतेय. ते चांगलंच आहे. गेल्या १५ दिवसातील टोमॅटोवर चाललेला गदारोळ बघून, आज अगदीच असह्य झालं म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकली. पोस्ट साधी आहे.

टोमॅटो परवडत नसतील तर खाऊ नका, बोंबलता कशाला? हा अतिशय योग्य मुद्दा आहे. गेल्या नऊ वर्षांत किती वस्तुंचे भाव, किती वाढले त्याची यादी करा. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस ही महत्त्वाची उदाहरणे आहेत. या तिन्ही बाबी जीवनावश्यक आहेत. यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. या तिन्हींची एवढी मोठी दरवाढ झाली, याविरूध्द तुम्ही किती आरडाओरडा केला.

एकदा तरी रस्त्यावर उतरलात का? याचा सरकारला जाब विचारलात का? जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रचंड पिळवणूक करतेय, त्याविरूध्द कधी आंदोलन केलयं का? कोणत्या टी.व्ही.चॅनलने याविरूध्द मोहीम उघडली? याची उत्तरं नकारार्थी येतील.

पण वर्षभरात कधीतरी एकदा कांद्याचे भाव वाढतात, तेव्हा प्रचंड आरडाओरडा होते. टी.व्ही.वाले घरोघर बायकांच्या मुलाखती घेत फिरतात. कांदा भाववाढ हा राष्ट्रीय प्रश्न बनतो आणि देशभक्त सरकार पाकिस्तानमधून कांदा आयात करून देशातील कांद्याचे भाव पाडते. आठवा हे कितीवेळा झालयं. किती वर्षांपासून होतंय. हाच कांदा कवडीमोल दराने विकला जातो, रस्त्यावर फेकावा लागतो तेव्हा किती ग्राहक असं म्हणतात की, सरकारने हा कांदा खरेदी केला पाहिजे.

तेलाबाबतही नेहमी असंच होतं. तेलाच्या किमती वाढल्या की, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाववाढीची बोंब होते आणि राष्ट्रभक्त सरकार जगभरातून चढ्या किमतीने तेल आयात करते आणि भारतातील तेलबियांचे भाव पाडते. शेतकऱ्यांच्या पदरी पडू पाहणारे चार पैसे मध्यमवर्ग आणि सरकारमुळे हिरावून घेतले जातात.

शहरी विद्वानांनो याचा कधी तरी तुम्ही निषेध केला आहे काय? अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की, केवळ मध्यमवर्गीय मतदारांच्या या आरडाओरडीला घाबरून सरकार शेतकऱ्यांचा बळी देतं. हा विषय फार मोठा आहे. तो लांबवत नाही. मुळ टोमॅटोच्या मुद्यावर येतो.

गेल्या सहा महिन्यांतील टोमॅटोची काय स्थिती होती? आजची ही दरवाढ होण्यापूर्वी टोमॅटो रस्त्यावर फेकले जात होते. ५० पैसे किलोने विकले जात होते, हे तुम्हाला आठवतंय का? तेव्हा सरकारने हे टोमॅटो किफायतशीर भावात विकत घ्यावेत, किमान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, असं तुम्हाला वाटलं का? कितीतरी टोमॅटो उत्पादक टोमॅटोच्या या जुगारात बरबाद झालेत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर कशाला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने खडे फोडताय.

दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. बाजारात किरकोळ विक्रीमध्ये टोमॅटोला १५० ते १७० रुपये प्रति किलोचा भाव मिळत असला तरी, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना किती भाव मिळतोय. ४० रूपये किलो! अपवादात्मक ५० रूपये किलो! हा दर शेतकऱ्यांसाठी वाजवी असाच आहे. बाजार शेतकऱ्यांच्या ताब्यात नाही. बाजारावर शेतकऱ्यांचं कसलंच नियंत्रण नाही. त्यामुळे किरकोळ विक्रीचे दर काय असावेत, हे शेतकरी ठरवू शकत नाही.

टोमॅटो तिप्पट दराने विकले जात असले तरी, तो फायदा शेतकऱ्यांकडं येत नाही. तुम्हाला टोमॅटो कायम स्वस्तात मिळावे वाटत असतील तर, ते कसं शक्य आहे? टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळं उत्पादन मर्यादित झालं. मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला म्हणून भाव वाढले. एवढी साधी बाब कशी काय लक्षात येत नाही.

टोमॅटोचे दर परवडत नसतील तर खाऊ नका, असं कोणी म्हणत असेल तर, तुम्हाला का राग येतो. वीजेचे दर वाढले, ती महाग झाली, म्हणून तिचा वापर सांभाळून करता. पेट्रोल, गॅसबाबतही असंच करता. मग काही काळ टोमॅटोचा मर्यादित वापर करा किंवा टाळा, असं म्हटलं तर, तुम्हाला मिरची का लागते ? 'गरीब की जोरू,सबकी भाभी' असंच आहे ना हे!

ज्या सोशल मिडियावर तुमची नसलेली अक्कल पाजाळता, त्या डाटाचे दर बघत बघत किती वाढले. त्याबद्दल कधी तक्रार केलीत? कधी अंबानींच्या नावाने बोटं मोडलीत. तुम्ही तसं नाही करणार. तुम्ही भित्रे आहात.

तुमची सरकारच्या एकाधिकारशाही विरूद्ध, हडेलहप्पी धोरणांविरूध्द बोलायची हिंमत नाही. तुम्हाला दिसतो तो फक्त शेतकरी आणि शेतमाल. भाववाढ सगळी चालते फक्त शेतीमालाची नको!

मी तुम्हाला फार चांगलं ओळखून आहे. मला हे माहित आहे, इतक्या सहजासहजी शेतीचं महत्त्व तुम्हा बांडगुळांच्या लक्षात येणार नाही. ज्या दिवशी अन्नधान्यासाठी जगासमोर भीक मागण्याची पाळी सरकारवर येईल, तुम्ही धान्यासाठी रेशनच्या लाईनला उभे राहाल, तेव्हांच तुमचे डोळे उघडतील. तुमचा हलकटपणा आणि नीचपणा ओळखून आहे मी! मी त्या दिवसाची वाट बघतोय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT