Tomato Rates : टोमॅटो दरवाढ वस्तुस्थिती अन् विपर्यास

Tomato Market : मागील दोन हंगाम तोट्यात काढल्यानंतर आता टोमॅटोला चांगला दर मिळत असताना केंद्र सरकारचा दर पाडण्यासाठीचा बाजारातील हस्तक्षेप अत्यंत दुर्दैवी म्हणावा लागेल.
Tomatoes
TomatoesAgrowon
Published on
Updated on

Tomato Bazar : टोमॅटोचे दर काय? ही एकच चर्चा सध्या सर्वत्र आहे. मागील काही आठवड्यांपासून किरकोळ बाजारातील टोमॅटोचे दर १५० रुपये प्रतिकिलोवर गेल्याने ग्राहकांवर जणू आता आभाळच कोसळले आहे, असे वातावरण काही माध्यमांनी निर्माण केले आहे. एक टमाटर (Tomato) की किमत तूम क्या जानो रमेश बाबू ते टोमॅटो १०० रुपये किलो,

परंतु टोमॅटोच्या गाड्यासोबत सेल्फी काढायचा असेल तर २५ रुपये अधिकचे पडतील, अशा मिम्सने अनेकांची चांगलीच करमणूक होतेय. कुठे शेतकऱ्यांच्या शेतातून टोमॅटो चोरी झाल्याचा, तर कुठे टोमॅटोने भरलेला ट्रक पळवून नेल्याच्या बातम्याही येत आहेत. यातील करमणुकीचा भाग जर सोडला, तर मागील वर्षभर शेतकऱ्यांना एक ते दोन रुपये किलो अशा मातीमोल दराने टोमॅटो विकावे लागले.

टोमॅटोची तोडणी करून बाजारापर्यंतचा वाहतूक खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी प्लॉटमध्ये गुरे सोडली तर काही शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून दिल्याने त्याचा लाल चिखल झालेला आपण पाहिला. त्या वेळी अडचणीतील शेतकऱ्यांच्या मिम्स कोणी केल्या नाहीत.

बहुतांश माध्यमांनी लाल चिखलाकडे दुर्लक्ष केले. केंद्र-राज्य सरकारने देखील अडचणीतील टोमॅटो उत्पादकांची दखल घेतली नाही. आता ग्राहक अडचणीत असताना मात्र खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून ते ग्राहकांना सवलतीच्या दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढल्याने लगेच शेतकरी मालामाल झाल्याचे चित्रही रंगविले जातेय. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो १५० रुपयांवर गेले असले, तरी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र ३५ ते ४० रुपयांच्या वर दर मिळत नाही.

त्यातही मागील दोन हंगाम तोट्यात काढल्यानंतर आता टोमॅटोला चांगला दर शेतकऱ्यांना मिळत असताना दर पाडण्यासाठी केंद्र सरकारचा बाजारात हस्तक्षेप सुरू झाला आहे. सध्या टोमॅटोला चांगला दर मिळत असला, तरी नैसर्गिक आपत्ती आणि कीड-रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने उत्पादन निम्म्यावर आले आहे. टोमॅटोचा उत्पादन खर्चही वाढला आहे.

ही वस्तुस्थितीदेखील ग्राहकांसह शासनाने लक्षात घ्यायला हवी. कांदा असो की टोमॅटो, ठरावीक काळासाठी त्यांचे दर वाढले की सर्वसामान्य ग्राहक ते खाण्याचे टाळतात. काही ग्राहकांनी कांदा-टोमॅटो खाणे टाळले नाही तरी या वाढीव दराने महिनाभरात त्यांच्यावर पाचशे ते सहाशे रुपयांच्या वर भुर्दंड बसणार नाही.

अर्थात, एवढ्या वाढीव खर्चाने ग्राहकांचे वर्षभराचे बजेट कोसळले म्हणण्यात कितपत तथ्य आहे, याचाही विचार झाला पाहिजेत. देशभरच टोमॅटोचा तुटवडा असून, दर वाढलेले आहेत. अशावेळी केवळ दिल्लीसह काही शहरांतील मोजक्याच ग्राहकांना सवलतीच्या दरात टोमॅटो पुरवून काय साध्य होणार? पेट्रोल, डिझेलसह सर्वच सेवा-वस्तूंच्या महागाईने देशभरातील जनता त्रस्त आहे.

अशावेळी आगामी काळातील काही राज्यांतील निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांसाठी आपण काही तरी करतोय हे दाखविण्याचा केंद्र सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मॅक्डोनाल्ड या पिझ्झा तसेच बर्गरसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कंपनीने पुढील काही दिवस बर्गर, पिझ्झासह त्यांच्या इतर उत्पादनांमध्ये टोमॅटो न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी त्यांनी टोमॅटोचा बाजारातील तुटवडा असे कारण दिले आहे. खरे तर हे अर्धसत्य आहे. टोमॅटोसाठी अधिक पैसे मोजले तर ते बाजारात उपलब्ध आहेत. परंतु काही काळ टोमॅटोसाठी अधिक पैसे मोजण्याची मॅक्डोनाल्डसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीची पण तयारी दिसत नाही. शेतीतून उत्पादित कच्च्या मालावरील प्रक्रियेतून मोठ्या झालेल्या या कंपन्यांनी उत्पादक टिकला तरच आपल्या कंपन्याही चालतील, हे लक्षात घेतले पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com