Agrowon
ॲग्रो विशेष

Village Life : सुट्टीतलं गाव आठवतं का?

म्हस दुभती असायची तोवर ठिकाय. कित्येकदा पोटूशी एकुलती एक म्हस गोठ्यात बांधलेली असायची. मग घरात दुभतं जनावर म्हणजे शेळी. लाडक्या नातवाला शेळीचं दूध क्स चालेल म्हणून आज्जी रुपया किंवा दोन दिऊन दुकानात पाठवायची.

Team Agrowon

- आशिष शिंदे

चंद्र भाकरीसारखा वगैरे मला वाटत नाही. तुला वाटत असेल तर काय बोलू? चंद्र प्रेमळ, शीतल किंवा मामा, प्रियकर अश्या स्वरूपात मला दिसत नाही. प्रेयसी चंद्रासारखी किंवा उलट चंद्र प्रेयसीसारखा आहे किंवा असावा असं सुद्धा मला वाटत नाही. माझ्या रोमँटिसिझमच्या संकल्पना तुझ्यापेक्षा वेगळ्यायत.

लहानपणी चुकून कधी आजोळी गेलोच तर मिरजेच्या झोपडपट्टीतल्या एका झोपडीच्या दाराच्या समोर बाजल्याजवळ मला आणि दादाला झोपायला जागा असायची. शेजारी म्हशीच्या आणि शेरड्यांच्या शेणामुताचा वास असायचा तेंव्हा तो घाण वाटायचा नाही. आज वाटेल का नाही माहीत नाही. म्हशीच्या शेणाचा आणि शेळीच्या लेंड्याचा मिक्स वास गोडसर असतो. त्याचा त्रास होत नाही. एखादी वाळली शेनी घ्यायची, तिच्यावर धूप टाकून ती शेनी जाळून गोठ्याभोवती फिरवून आपल्या पायथ्याला ठेवलं की डास जास्त चावत नाहीत हे माहितीय मला. किंवा तेंव्हा डास लावण्याची अनुभूती शून्य होती. कुणास ठाऊक.

म्हस दुभती असायची तोवर ठिकाय. कित्येकदा पोटूशी एकुलती एक म्हस गोठ्यात बांधलेली असायची. मग घरात दुभतं जनावर म्हणजे शेळी. लाडक्या नातवाला शेळीचं दूध क्स चालेल म्हणून आज्जी रुपया किंवा दोन दिऊन दुकानात पाठवायची. तेवढ्यात चारण्याची कॉफी पावडर आणि उरलेलं दूध आणायचं. दीड रुपयात केवढं दूध येत असेल? जरा करा विचार मालक, लगेच काय हात टेकताय? तुमच्या तांब्यावर उपड्या ठेवलेल्या फुलपात्रात पुरेल तेवढं. तेवढ्यात माझा, दादाचा आणि आजोबांचा थोडा चहा व्हायचा. कधी एकदम भगुलं भरून दूध यायचं. शेजारच्या दुसऱ्या गोठ्यात एखादी दुभती म्हस असायचीच.

रातचं भुका लागल्यावर आज्जीनं दुकानदाराला उठवून पार्ले दिलेला कायम आठवतो. मी अंथरुणातून खांद्याला टोचणाऱ्या दगडाला वैतागून उठायचो कधीतरी. एखादी लेंडी घरंगळुन नेमकी तोंडाजवळ आलेली असायची. नशीब शेळीचं मुत जायला वघळ होती. मगाशीच हावऱ्यासारखं दोन मोठ्या मोठ्या चपात्या खाल्लेल्या असायच्या. आज्जीच्या चपात्या ताटाएवढ्या व्हायच्या. खरपूस भाजलेल्या. चुलीवरच्या. मला भाकरी आवडायच्या नाहीत. अजून आवडत नाहीत. तर आज्जीनं केलेल्या मोठ्या मोठ्या चपात्या कधी वांग्याच्या काळलवणात कधी दुधात कधी रश्यात चुरून खाल्लेल्यात कायम. त्यानंतर माठातलं पाणी तांब्याभर पिलं की पोटाला तडस लागायची.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मग आजोबा कावून झोपाय लावायचं. मी वाकळीत तोंड दाबून घ्यायचो. वारा जसा वाढायचा तशी डोळ्यावर दगड ठेवल्यासारखी पेंग वाढायची. कधीतरी रात्री तीन वाजता जाग यायची. चंद्र तवा डोळ्यात भरायचा. चंद्र अश्यावेळी भयानक वाटतो. अक्ख्या झोपडपट्टीत एकही रॉकेलची चिमणी, कंदील, तेलाचा दिवा जळत नसतो. आणि चंद्र काळासारखा एकटा फिरतो. आपला माग काढत. चंद्र म्हणजे मोठा राक्षस आहे ह्येची मला आजही गॅरंटी वाटते कारण, मी भीतीनं थरथर कापू लागलो की आजोबा मला उचलून त्यांच्याबरोबर खाटेवर घ्यायचे आणि चंद्र एकदम गायब व्हायचा. माझ्या आजोबांना मोठ्या पिळदार मिश्या होत्या. मिलिटरीतून रिटायर झालेले आमचे आजोबा. भरदार, वजनदार आणि उंच धिप्पाड. एखाद्या सिनेमात दाखवलेल्या मावळ्यासारखे.

त्यांना चंद्र नक्की घाबरत असणारे. मला आजही नक्की माहित्ये हे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing : ‘छत्रपती’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Millet Rate : दौंड बाजार समितीत बाजरीच्या दरात सुधारणा

Natural Industries Group : नॅचरल शुगर सात लाख टन ऊस गाळप करणार

Global Warming : तापमान वाढ कसे कमी होणार; याचा अंदाज नाही

Narendra Modi : विकसित महाराष्ट्राचा शेतकरी सर्वांत मजबूत स्तंभ : मोदी

SCROLL FOR NEXT