Indrjeet Bhalerao : प्राथमिक शाळेतील आठवणी!

एकदा आमचे वर्ग भरलेले असताना वर पत्रांना असलेल्या सागाच्या अडुतून एक साप रप्पकन् खाली पडला. तो पडला तिथे आजूबाजूला सगळी मुलं बसलेली होती. कदाचित पडल्यामुळे सापाला झांज वगैरे आली असावी.
Indrjeet Bhalerao
Indrjeet BhaleraoAgrowon

इंद्रजीत भालेराव

तिसरी, चौथीपासून पुढचे शाळेतले सगळे मला आठवते. त्या काळातले माझे विद्यार्थी मित्र, त्या काळात घडलेल्या गमतीजमती, सगळ्याच या निमित्ताने आठवतात. आमच्या चारही वर्गांसाठी एकच खोली होती. ती खूप उंच आणि मोठी होती, असे आम्हाला तेव्हा तरी वाटायचे. त्या एकाच खोलीत आमचे सगळे वर्ग गुरुजी बसवत असत. त्या एका खोलीचे चार कोपरे म्हणजे शाळेचे चार वर्ग होते. आम्हाला बसायला बेंच नव्हते.

आम्ही घरूनही काही बसायला आणित नसू. त्याची आम्हाला कधीच गरज वाटली नाही. शाळेत फरशी होती. ती फरशी आम्हाला बसायला खूप चांगली वाटायची. कारण तशी फरशी तोपर्यंत आमच्या गावात कोणाच्याही घरी नव्हती. त्यामुळे फरशी हेच आमच्यासाठी सगळ्यात भारी आसन होते. शिवाय रस्त्यावर जमिनीवर बसायची आम्हाला कायमच सवय होती. कधी कधी गुरुजी आमचे काही वर्ग शाळेबाहेर असलेल्या बाभळीच्या झाडाखाली किंवा लिंबाच्या झाडाखाली नेऊन बसवत. त्या झाडाखाली बसवलेल्या वर्गांना काही अभ्यास देऊन इतर वर्गांना शिकवण्याचे काम ते करीत. एकटेच गुरुजी काय काय करणार ? पण ते त्यांच्या पद्धतीने सगळे करीत असत.

का कुणास ठाऊक एकदा मला आई म्हणाली की, 'गुरुजीला म्हणावं मला नापास करू नका, पास करा' मीही भीत भीत गुरुजींना तसं म्हणालो. गुरुजी काहीही म्हणाले नाहीत. अर्थात मी पास झालो. पण मी नापास होईल किंवा मला गुरुजी नापास करतील असे आईला का वाटले असावे ? असा विचार आज माझ्या मनात येतो. कारण माझ्या वर्गात सगळ्यात हुशार मीच होतो. मग मला गुरुजी नापास कशाला करतील ? पण नंतर समज आल्यावर मला आई सांगायची की,

' शेजारची काही मुले दुसऱ्या गावात नातेवाईकांच्या घरी राहून चांगल्या शाळेत शिकत होती. मुलांना स्वतःकडे ठेवून घेऊन चांगल्या शाळेत शिकवू शकणारे कुणीही नातेवाईक आपणाला नाहीत, मग आपली मुलं अशीच रानावनात राबत राहतील, अशी काळजी आईला वाटायची'. असे आईने नंतर कधीतरी मला सांगितले. कदाचित त्यासाठीच एकदाची गावातली शाळा संपली की मग पुढचे पाहता येईल असा विचार करून आईने गुरुजींना तो संदेश दिला असावा.

एकदा आमचे वर्ग भरलेले असताना वर पत्रांना असलेल्या सागाच्या अडुतून एक साप रप्पकन् खाली पडला. तो पडला तिथे आजूबाजूला सगळी मुलं बसलेली होती. कदाचित पडल्यामुळे सापाला झांज वगैरे आली असावी. थोडा वेळ तो तसाच पडून राहिला. तोपर्यंत आम्हा सगळ्या मुलांना गुरुजींनी बाहेर काढलं. आमचा आरडाओरडा ऐकून शेजारच्या शेतातली माणसंही काय झालं म्हणून पळत आली. नेहमीच शेतातले साप मारणाऱ्या त्यातल्या एका जणाने तो साप मारून टाकला.

साप नेमका ज्याच्या मांडीजवळ पडला तो इंद्रजीत हा जावळेमामांचा एकुलता एक मुलगा होता. ना त्याला भाऊ होता ना त्याला बहीण होती. त्यामुळे तो अत्यंत लाडका होता. त्याच्या घरच्या श्रीमंतीचा तो एकुलता एक वारसदार होता. काही करता काही झालं असतं तर फारच वाईट घडलं असतं. त्यामुळे जावळे मामा आणि जावळे मामी धावतपळत शाळेत आले. इंद्रजीतला घरी घेऊन गेले. इतर आम्ही सगळी लेकरं खंडीवर पेंडी असलेले होतो. त्यामुळे आमच्यापैकी एखादे दगावले असते तर फारसा गहजब झाला नसता. शेतात साप चावून माणसे, जनावरे मरत होती.

एकदा आम्ही शाळेकडे जाणाऱ्या पांदणीत प्रचंड मोठा साप निघाला होता. सगळा गाव जमून त्याला पहात होता. पण त्याला मारण्यासाठी कुणी पुढे धजावत नव्हते. सगळेच घाबरत होते. तो सारखा इकडून तिकडे सळसळत होता. शेवटी तो कुपाटीवर चढला. कुपाटीवर वेली चढल्या होत्या. त्या वेलीच्या गचपणावर साप चढला आणि तिथून फणा काढून तो जमा झालेल्या पांदीतल्या दोन्ही बाजूंच्या लोकांकडे पहात होता. नंतर बराच वेळ असे आपले दर्शन देऊन तो कुपाटीवरून खाली उतरला आणि शेतात नाहीसा झाला. तेव्हापासून शाळेत जाताना आम्हाला सतत त्या पांदणित सतत भीती वाटायची. कुठून तरी तो येईल असे वाटायचे. त्यामुळे एकटेदुकटे त्या पांदीतून जाताना मनावर खूप दडपण असायचे. शाळा सुटल्यावर सगळीच मुले सोबत असतील तर काही वाटत नसे.

या शाळेत असताना पंधरा ऑगष्ट आणि सव्वीस जानेवारीला गुरुजी काही खेळांच्या स्पर्धा घ्यायचे. त्या सगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. ह्या स्पर्धा म्हणजे साध्यासाध्या हुशारीच्या स्पर्धा असायच्या. लंगडी, तीन पायाची दौड, चमच्यात लिंबू ठेवून न पडू देता धावणे, धावत धावत सुईत दोरा ओवून दाखवणे असल्या काहीतरी त्या स्पर्धा असायच्या. खरे तर हे सगळे मुलींचे खेळ. पण आमच्या शाळेत फार कमी मुली असल्यामुळे मुलेही ह्या खेळात भाग घेत. थोडी मोठी मुलं कबड्डी, आट्यापाट्या, खो-खो असले मर्दानी खेळ खेळायची. चौथीपर्यंतची मुले असून असून किती मोठी असणार ? पण त्यातलीच काही मुले निवडून गुरुजी त्यांना हे खेळ शिकवायचे. पण अशी मुले खूप थोडी असत. झेंडावंदनाच्या दिवशी चॉकलेटचे बक्षीस सगळ्यांनाच मिळायचे. कधी कधी पाटी, पेन्सिल, लेखनीही मिळायच्या.

झेंडावंदनाच्या दिवशी गुरूजी गावातून आमची मिरवणूक पण काढायचे. गुरुजी स्वतः हातात झेंडा घेऊन पुढे चालायचे. पाठीमागून आम्ही गुरुजींनी शिकवलेल्या घोषणा द्यायचो. महात्मा गांधी की जय, तिरंगी झेंडा कोणाचा तेहतीस कोटी लोकांचा, अशा काही घोषणा अजूनही आठवतात. नंतरच्या वर्षी गुरुजी म्हणाले, 'आता तिरंगी झेंडा कोणाचा, चाळीस कोटी लोकांचा असं म्हणा' कारण तोपर्यंत पुढच्या जनगणनेचा आकडा आलेला होता. आता तर आपल्या देशाच्या लोकसंख्येचा आकडा १४० कोटीवर गेलेला आहे. म्हणजे मागच्या ५० वर्षात देशाची लोकसंख्या १०० कोटीने वाढलेली आहे.'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा' हे गाणे त्या काळात आम्ही एकसुरात म्हणायचो. आमचा भाऊ पंडित नेहरूंच्या निधनावर एक गाणे म्हणायचा,

ब्रह्मा विष्णू पांडुरंगातुम्हाला कमी काय सांगा आमचे नेहरूजी काका आम्हाला वापस देऊन टाका

त्या काळात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात लोकप्रिय असलेल्या, 'गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा' या गाण्याच्या चालीवर वरील गाणे भाऊ म्हणायचा. ते खूप गोड वाटायचे. ते गाणे तेव्हा मलाही पाठ झालेले होते. गुरुजींनी काही गाणी पाठ करण्यासाठी आम्हाला एक पुस्तक दिले होते. शिक्षण विभागाने ते पुस्तक प्रकाशित केलेले होते. तेव्हाचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली होती. हे सगळे आता आठवते.

शिक्षण विभागाच्या वतीने लहान लहान गोष्टींची पुस्तकेही शाळेला भेट आलेली होती. माझी वाचनाची आवड पाहून चौथीला असताना गुरुजींनी मला घरी बोलावून रामायण आणि महाभारताच्या गोष्टींची पुस्तके दिली होती. ही पुस्तके गुरुजींनी घरीच ठेवलेली होती. कारण पुस्तके ठेवण्यासाठी शाळेत अलमारी किंवा कपाट नव्हते. त्यामुळे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर ठेवाव्या लागत. ते सरपंचांच्याच घरी राहत असल्यामुळे सरपंचाच्या अलमारीत या सगळ्या गोष्टी ते ठेवून द्यायचे. ती पुस्तके वाचून मला आणखीच वाचनाची गोडी लागली. त्यामुळे मी कुणाकुणाच्या घरी संदुकाच्या तळाला असलेली जुनी पुस्तके शोधू लागलो आणि वाचू लागलो. कुठलाही छापलेला कागद बाजारातल्या वस्तूसोबत घरात आला की मी तो सगळा वाचल्याशिवाय सोडायचो नाही. बाजारातून आणलेल्या वस्तूंच्या पॅकेजवरचाही सगळा मजकूर मी वाचायचो. डालड्याचे डबे, तेलाचे डबे यावरील मजकूरही मी वाचायचो. चहाच्या पत्तीची पुडी, साखरेची पुडी यावरील मजकूरही मी वाचायचो. तेव्हा अशा पॅकेजवर बहुतेक मजकूर मराठीत असायचा.

Indrjeet Bhalerao
Indrjeet Bhalerao: 'मायीहूनही मायाळू' असं सुनिलकुमार लवटेंचं व्यक्तिमत्त्व!

शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या काही घोषणा गुरुजींनी गावातील घरांच्या भिंतीवर लिहिलेल्या होत्या. त्यातली 'अडाणी आई, घर वाया जाई' ही घोषणा अजूनही आठवते. पण आमच्या गावात शिकलेल्या उच्चवर्णीय बायांना आडाण्यांच्या बाया असे म्हणायचे. त्यामुळे या घोषणेचा उलटाच अर्थ आमच्या गावातल्या लोकांनी घेतला. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण तेव्हातरी फारसे वाढले नाही.

पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा शाळेभोवतीचे शेतकरी पावसाच्या आणीबाणीच्या वेळेला तोडलेल्या मुगाच्या शेंगा भिजू नयेत म्हणून शाळेत आणून टाकीत असत. तीन-चार दिवस पाऊस उघडला नाही तर मुगाच्या शेंगांवर बसूनच आमची शाळा भरत असे. शाळेत एकदा वरून साप पडल्यामुळे गुरुजींना विचुकिड्याची भीती वाटायची. तेव्हापासून गुरुजी आधी आल्या आल्या शाळेचे दार उघडून सगळी शाळा कानाकोपऱ्यात पाहून घ्यायचे. शेंगा टाकलेल्या असतील तर त्याही सगळ्या हलवून पाहायचे. मगच मुलांना आत सोडायचे. शेतकऱ्यांच्या अडचणी असल्यामुळे गुरुजी त्यांनाही काही म्हणू शकत नसत. शेंगांवर मुले बसली तर शेतकऱ्यांची काही तक्रार नसे. उलट त्यामुळे शेंगा फुटून मूग आपोआपच खाली गळत असत. शाळेला फरशी असल्यामुळे त्याचे काही नुकसानही होत नसे.

कुणाच्याच घरात भिंतीवर किंवा हाताला घड्याळ नसल्यामुळे शाळा भरायला अजून किती वेळ आहे हे कुणालाही समजत नसे. घड्याळ फक्त गुरुजींच्या हातात होते. त्या घड्याळानुसार गुरुजी स्वतः जाऊन घंटी वाजवायचे. घंटी वाजली की सगळी मुले पळत शाळेकडे निघायची. त्याआधी सगळे उरकून तयार होऊन बसले पाहिजे असे कधी कुणाला वाटत नसे. काही मुले अंदाजाने आधीच शाळेजवळ येऊन थांबत असत. काही जणांच्या घरचे लोक दररोज घराच्या पत्रांची पडणारी सावली खून करून ठेवायचे आणि त्यावेळी आपल्या मुलांना शाळेत पाठवून द्यायचे. कारण तेव्हा सगळ्या गावाचे घड्याळ सूर्य हेच होते. सूर्यामुळे पडणाऱ्या सावल्या पायाने मोजून सगळे लोक आपला वेळ ठरवायचे.

लघवीसाठी शाळा सुटली की आम्ही जिकडे जायचो तिथे आमचे आम्ही एक उगवलेले रोपटे धरायचो. ते कधी बाभळीचे असे, कधी तरोट्याचे असे, कधी धोत्र्याचे असे किंवा कुठल्यातरी वनस्पतीचे असे. आपल्या झाडाला पाणी घालायचे म्हणून त्याच्या बुडाला लघवी करायचो. पण हळूहळू ते झाड वाळून जायचे. हा प्रकार गुरुजींच्या लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला नीट समजून सांगितले आणि आम्ही झाडांच्या बुडाला लघवी करणे थांबवले. आमच्या शाळेत मुतारी नावाचा प्रकार नव्हता. शाळेभोवतीचे सगळेच रान आमच्यासाठी मोकळे होते. शाळेच्या एका बाजूला मुले जायची आणि त्याच्या विरुद्ध दिशेला मुली जायच्या. अर्थात मुलींचे प्रमाण नगण्यच होते.

एकदा आमच्या घराशेजारचा माझा मित्र, अण्णासाहेबांचा शिवाजी, याने पेन स्वच्छ धुवायच्या म्हणून पातेल्यात टाकल्या, पातेलं चुलीवर ठेवले आणि खालून ढणाढणा जाळ लावला. त्याला वाटले आता आपल्या पेन उकळत्या पाण्यात स्वच्छ धुवून निघणार. त्याला हे कुणीतरी सांगितले होते. पण त्या प्लास्टिकच्या सगळ्या पेनचा एकत्रित गोळा होऊन बसला. शिवाजीचे फार मोठे नुकसान झाले होते. पण त्यामुळे दुःखी होईल तो शिवाजी कसला. दुःख झालेच तर मग एकट्याला का ? जास्तीत जास्त मुलांना झाले पाहिजे, म्हणजे मग आपले दुःख कमी होईल, असे त्याला वाटले असावे. त्याने त्याच्या ऐकण्यातल्या सगळ्या मुलांना सांगितले की मी अशा अशा प्रकारे उकळत्या पाण्यात पेनी टाकल्या आणि माझ्या पेनी फारच स्वच्छ निघाल्या. त्याचे ऐकून अनेक मुलांनी तो प्रयोग केला. आणि ते फसले. सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला अद्दल घडवायची असे ठरवले. पण तो जो लपून बसला तो कुणाला सापडलाच नाही.

मधे काही दिवस निघून गेल्यावर जे शिवाजीच्या या अटकलीला फसले त्यांनी त्याला फसवण्याचा डाव रचला. शिवाजीला वाकडा भांग पाडायची, भांगाला कोंबड्यासारखा उंच तुरा पाडायची फार हौस होती. आपल्या भांगाचे फुगे वर दिसावेत असे त्याला वाटायचे. आपल्या केसांना असे कप्पे पाडण्यासाठी शिवाजीने ज्यांना फसवले होते त्या मुलांनी शिवाजीला युक्ती सांगितली की पकड किंवा सराट्याचा दांडा गरम करून तो डोक्यावर ठेवावा म्हणजे केस कायमचे वळण घेतात. शिवाजीने तसा प्रकार केला आणि त्याच्या भांगाचे केस जळून गेले.

आम्ही सगळी मुले मिळून दुपारच्या मध्यंतरात रानात जातचो. बऱ्याचदा आजूबाजूच्या शेतातल्या बोरीच्या झुडपांकडे मुले धाव घ्यायची. आजूबाजूच्या सगळ्यांच्या शेतात धुऱ्यांबंधाऱ्यावर बोरीची झुडपे होती. तिथून बोरं काढण्यासाठी सगळी मुले पांगत. गंगुबाईच्या शेतात खारकी बोर होती. ते शेत जरा दूर होते. तिथे गेल्यावर शाळेची मध्यंतरानंतरची घंटी ऐकू येत नसे. बोरं गोड आणि खारकी असल्यामुळे मुले तिथेच खात बसत. त्या मुलांना शाळेत यायला उशीर होत असे. गुरुजींचा मार खावा लागत असे. असा मार बऱ्याचदा बरीच मुले खात असत. त्या काळात शाळेत खूप कमी मुली होत्या. मला वाटते तीन-चारच मुली असाव्यात. मला तर फक्त रावसाहेब या माझ्या मित्राची बहीण ताई तेवढीच आठवते. आणखी मुली शाळेत होत्या हे मला अजिबातच आठवत नाही. अर्थात गॅंगमनच्या प्रकाशची बहीण मनकर्णिका आणि दुकानदार मुंजाची मुलगी जना या दलित वस्तीतल्या मुली मात्र शाळेत होत्या, हे पक्के आठवते.

एकदा गुरुजींनी आमचा वर्ग दत्त मंदिराजवळच्या बाभळीखाली बसवला होता. गुरुजी शाळेत कुठल्यातरी वर्गाला शिकवत होते. आम्हा मुलांना खूप तहान लागलेली होती. शाळेत पाणी पिण्याची काहीच व्यवस्था नव्हती. मध्यंतरामध्ये घरी गेल्यावरच सगळी मुले पाणी पिऊन येत. गॅंगमनचा प्रकाश आणि त्याची बहीण सोबतच होते. त्यामुळे प्रकाशने जाऊन समोरच्या चारीतून त्यांच्या जवळचा ग्लास भरून आणला. मला इतकी तहान लागली होती की मी घाईघाईने तो ग्लास घेऊन तोंडाला लावणार इतक्यात माझा भाऊ भानुदास याने हात मारून तो ग्लास खाली पडला. म्हणाला, गाढवा महाराच्या हातचं पाणी पितोस काय ? हे सगळं मंदिराच्या ओट्यावर बसलेले खेडकर बाबा पहात होते. त्यांनी मला जवळ बोलावून घेतले आणि त्यांच्या जवळच्या तांब्यातले पाणी मला प्यायला दिले.

खेडकर बाबांचा मार्ग चातुर्मासाच्या निमित्ताने तेव्हा आमच्याच गावात होता. माझ्या शिक्षणात खेडकर बाबांचाही वाटा होता. पुस्तकातल्या बऱ्याच गोष्टी समोर बसवून मला ते समजून सांगायचे. त्यामुळे पहिली, दुसरीला शिकवायला गुरुजी नसूनही मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकलो होतो. इतकेच नाही तर खेडकर बाबांनी माझ्याकडून मोरोपंतांच्या काही प्रार्थनावजा आर्याही पाठ करून घेतल्या होत्या. त्यातली एक आर्या मला अजूनही पाठ आहे,

तू सागर करूणेचा, देवा तुजलाच दुःख सांगावे ।तुज वाचून ईतराते, दिनमुख पसरून काय मागावे ॥

Indrjeet Bhalerao
Indrjeet Bhalerao : स्वतःचा चेहरा शोधणारा माणूस

आमच्या शाळेत एकाच वर्गात आम्ही दोन इंद्रजीत होतो. दोघांच्याही वडिलांचे नाव नारायण असेच होते. त्यामुळे दुसरा इंद्रजीत कौसाबाई या त्याच्या आईच्या नावावरून ओळखला जायचा. त्यांचे कुटुंब शेतातच वस्ती करून राहायचे. तो नंतर त्याच्या मामाच्या गावी बळेगावला शिकायला गेला. त्यामुळे चौथीच्या वर्गात मी एकटाच इंद्रजीत राहिलो. आमच्या गावात आणखी एक इंद्रजीत होता. तो जावळे मामांचा इंद्रजीत माझ्यापेक्षा दोन वर्गांनी पुढे होता. फारसे कुठे न ठेवले जाणारे इंद्रजीत हे नाव तेव्हा आमच्या गावात असे तीन कुटुंबातल्या मुलांना ठेवलेले होते. पारावर श्रीधराचे भावार्थरामायण सुरू असताना आम्ही जन्मलो म्हणून त्यातल्या इंद्रजीतच्या नावावरून आमची नावे ठेवण्यात आली असे आमचे आई-वडील सांगत असत.

माझी शिक्षणातली गोडी लक्षात घेऊन तिसरीनंतर वडील माझ्या मागण्या पुरवू लागले. मी सांगितलेली पेन, कागद, रंगीत पेन्सिल मला आणून देऊ लागले. जून महिन्यात शाळा सुरू झाली की गुरुजींकडून लागणाऱ्या सर्व वस्तूंची एक यादीच ते करून घेत असत. धाकट्या प्रभाकरच्या आणि माझ्या पुस्तकांसाठी एक दिवस ते मला वसमतला घेऊन जात असत. वसमतला मामा चौकाजवळ विजय प्रिंटिंग प्रेस होती. त्या प्रेसचे मालक नाकोड हे बाबांचे खास मित्र होते. त्यांचेच विजय मार्ट नावाचे शालेय वस्तूंचे दुकान होते. तिथून वडील माझ्या पसंतीने सगळ्या वस्तू घेत असत. नारायणराव मुलाला त्याच्या पसंतीने वस्तू घेण्यासाठी घेऊन येतात याचे नाकोड साहेबांना कौतुक वाटायचे. ते स्वतः चांगल्या वस्तू काढून द्यायचे. त्यांनी काढून दिलेल्या वस्तू महाग असल्या तरी वडील त्या घ्यायचे. त्यामुळे आणखीच नीट शिकण्याची आपली जबाबदारी आहे असे मला वाटायचे. त्यामुळे मी मन लावून शिकत गेलो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com