Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season 2023 : पेरणीची घाई नको

Team Agrowon

Pune News : ‘‘नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून (मॉन्सून) जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडेल. राज्यातील पूर्व आणि मध्य विदर्भ वगळता बहुतांश विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल.

कमी पावसाचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करू नये.

जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये,’’ असा सल्ला दक्षिण आशिया कृषी हवामान फोरमचे संस्थापक सदस्य, कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शुक्रवारी (ता. २) दिला.

डॉ. साबळे यांच्या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे. डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाज मॉडेलनुसार, संबंधित ठिकाणचे गेल्या ३० वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदविलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे.

२०२३ मधील उन्हाळी हंगामातील ठराविक कालावधीचे कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर हा अंदाज आधारित आहे.

डॉ. साबळे म्हणाले, ‘‘राज्यातील पूर्व आणि मध्य विदर्भ वगळता बहुतांश विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल. काही भागात, काही कालावधीत जोराचे पाऊस होणे शक्य आहे.

महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्याच्या काही भागात तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांमध्ये धुळे जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पेडगाव, सिंदेवाही येथे पावसात मोठे खंड पडतील.

तर दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनची शाखा जास्त सक्रिय होणे संकेत असून, अरबी समुद्रातील शाखा सर्वसाधारण राहील.’’

थोडक्यात महत्त्वाचे...

- राज्यात मॉन्सूनचे आगमन १० जूनपर्यंत

- जून, जुलैमध्ये काहीसा खंड

- ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस

- यंदा पावसाच्या वितरणातील फरकाबरोबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्ये ठरणार.

...असे करा पीक नियोजन

- पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी.

- मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करू नये. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये.

- या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत कमी पाण्यावर येणारी व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा, मूग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ, तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सूर्यफूल यांचा अवलंब करावा.

- पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धती बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तूर आंतरपीक पद्धती अवलंबावी.

- पाणी साठवणुकीच्या सर्व बाबींवर भर द्यावा. पाच किंवा सहा ओळीनंतर एक सरी पाडून त्यात पावसाचे पाणी मुरेल, यासाठी उतारास आडवी पेरणी करावी. पाणी मुरण्याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

- सोयाबीनची रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने लागवड करणे फायदेशीर राहील.

- शेतकऱ्यांनी मुख्य पिकाबरोबरच अंतर पीक पद्धतीवर भर द्यावा, कपाशीच्या कमी कालावधीच्या जातीची लागवड करावी.

- खरीप पिके काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ती काढून त्याची मळणी करणे व माल सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे राहील. त्यामुळे नुकसानीपासून बचाव होईल.

- कोकणात भात रोपांच्या रोपवाटिका दोन टप्प्यात कराव्यात. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार भात रोपांची पुनर्लागण करणे शक्य होईल. तसेच लागवडीच्या वेळी योग्य वयाची रोपे उपलब्ध होतील.

- कोकणातील रायगड, ठाणे व पालघर या भागात भात पिकात काटेकोर पाणी व्यवस्थापन आवश्यक राहील. हळव्या जातीच्या भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक काढणीच्या वेळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी.

- रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणाऱ्या करडई आणि हरभरा लागवड करावी.

यंदाच्या मॉन्सूनमधील (जून ते सप्टेंबर) पाऊस :

ठिकाण---सरासरी (मिमी)---अंदाज (मिमी)---टक्केवारी (+/- ५ टक्के)

अकोला---६८३---६३५---९३

नागपूर---९५८---९५८---१००

यवतमाळ---८८२---८८२---१००

सिंदेवाही(चंद्रपूर)---११९१---११९१---१००

परभणी---८१५---७५८---९३

दापोली---३३३९---३१३८---९४

निफाड(नाशिक)---४३२---४१२---९८

धुळे---४८१---४४७---९३

जळगाव---६४०---५९४---९३

कोल्हापूर---७०६---६७०---९५

कराड (सातारा)---५७०---५३०---९३

पाडेगाव (सातारा)---३६०---३३४---९३

सोलापूर---५४३---५०४---९३

राहुरी---४०६---३७७---९३

पुणे---५६६---५३२---९४

उन्हाळा हंगामात सूर्य प्रकाशाचा कालावधी, कमाल तापमान, वाऱ्याचा वेग सरासरीपेक्षा कमी राहिला. त्यामुळे जून, जुलैमध्ये पावसात खंड पडतील. मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये साधारण पावसाची शक्यता आहे. विभागानुसार दिलेल्या पावसाच्या अंदाजात जिल्हावार आणि तालुकानिहाय फरक पडणे शक्य आहे. यंदाचे वर्ष सावधानतेचे आहे. पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतील.
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT