Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ६ लाख ४९ हजार ७३० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्ताविक केले आहे. सरासरीपेक्षा जवळपास सत्तर हजार हेक्टर क्षेत्र जास्त आहे. बाजरीचे क्षेत्र कमी तर कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
यंदा खरिपासाठी नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ८० हजार ५०७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी खरिपात ६ लाख ४० हजार ५८३ हेक्टरवर पेरणी झाली होती. नगर जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक क्षेत्र बाजरीचे असते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजरीऐवजी सोयाबीन, मका, तूर, मूग, उडदासह कापसाचे क्षेत्र वाढत आहे. यंदा सरासरीपेक्षा मूग, उडीद, तूर, सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र अधिक असेल असा कृषी विभाागाचा अंदाज असून त्यानुसार खते व बियाण्यांचे नियोजन केले आहे.
खरीप ज्वारीची पेरणी होणार नाही, असा अंदाज आहे. यंदा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असला तरी गतवर्षी झालेले नुकसान आणि दरात झालेले नुकसान पाहता कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची फारशी दिसत नाही.
खरिपात एक गाव एक वाण, घरचे बियाणे आदींचाही नियोजनात वापर होणार असल्याचे दिसते आहे. खरिपात शेतकऱ्यांना कोणत्याही निविष्ठांबाबत अडचणी येऊ नयेत आणि आल्यात तर त्यावर कार्यवाही करण्यासाठी पंधरा पथके व तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.
वाढत्या क्षेत्रानुसार बियाण्यांची मागणी
नगर जिल्ह्यात खरिपात सर्वाधिक क्षेत्र बाजरीचे होते. मात्र आता बाजरीचे क्षेत्र कमी होत आहे. यंदा केंद्र सरकार तृणधान्य वर्ष साजरे करत असले तरी बाजरीचे क्षेत्र कमी होत आहे.
बाजरीच्या क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी जनजागृती केली जात आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. बाजरीऐवजी खरिपात सोयाबीन मका, तुरीचे क्षेत्र वाढत असल्याचे सांगण्यात आले. या वाढत्या क्षेत्रानुसार बियाणांची मागणी केली आहे.
प्रस्तावीत क्षेत्र (हेक्टरमध्ये)
(कंसात सरासरी क्षेत्र)
भात - १६,००० (१७२७६)
खरीप ज्वारी- ० (५७२)
बाजरी - ९१,००० (१५०१८३)
रागी- २०० (२५४)
मका - ७१००० (६०,७९९)
इतर तृणधान्य- १०० (६७८)
तूर - ५६,००० (३६,१०५)
मूग - ४८,००० (४७,०३६)
उडीद- ६८,००० (४०,४०६)
इतर कडधान्य- ९८०० (७५४७)
भुईमूग - ५००० (७६४९)
तीळ - १३० (१४०)
कारळे - ३०० (३३३)
सूर्यफूल - २०० (३१२)
सोयाबीन - १,५२,००० (८८,३३०)
कापूस - १,३२,००० (१,२२,२८७)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.