kolhapur Kharif Season Update : मॉन्सून पूर्व पावसाअभावी मशागती न झाल्याने यंदा रोहिणीचा पेरा सुनासुना गेला आहे. ‘रोहिणीचा पेरा, मोत्याचा तुरा’ या पारंपरिक म्हणी प्रमाणे शेतकरी उन्हातानाचा विचार न करता खाचरांची बांधबंधिस्ती करून राने तयार करून रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीसाठी आतुरतेने वाट पाहतो.
पण यंदा यासाठी पूरक असणारा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरण्यांकडे पाठ फिरवली आहे. प्रचंड उन्हामुळे जमिनीतील उष्मा कायम आहे. यातच पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करणेही शक्य झाले नाही. यामुळे पेरण्या रखडल्या आहेत.
रोहिणी नक्षत्र कोरडे गेल्याने यंदाच्या खरीप हंगामाच्या प्रारंभीच रसभंग झाला आहे. जिल्ह्यात भाताचे एकूण क्षेत्र ९२ हजार हेक्टर आहे. या पैकी भाताच्या सुमारे १५ हजार हजार हेक्टरपर्यंत धूळवाफ पेरण्या होतात.
आतापर्यंत केवळ ५०० हेक्टरवरच पेरण्या झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. प्रचंड उन्हामुळे झालेल्या पेरण्यांचे भवितव्यही अंधकारमय बनले आहे.
साधारणतः रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून पेरण्यास उत्साहात प्रारंभ केला जातो. प्रामुख्याने भाताची पेरणी केली जाते. रोहिणी नक्षत्रात पेरलेले भाताचे पीक शेतकऱ्याच्या दृष्टीने श्रेष्ठ असते.
जमीन तापलेली असते, हवेतही उष्मा असतो आणि अशा वेळी जर बी धूळवाफेवर पेरले तर ते पीक जोमाने उभे राहते. त्यामुळे रोहिणी नक्षत्राच्या पेरणीला शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असते. रोहिणी नक्षत्र निघण्याआधी वळवाचा जोरदार पाऊस झालेला असतो.
या पावसामुळे रानांच्या मशागतीही आटोपलेल्या असतात. रान चांगल्याप्रकारे तयार असते. रोहिणी नक्षत्र निघाले की पेरणीला सुरुवात करायची, अशी गणिते ठरलेली असतात. मे महिन्यात चांगला वळीव बरसला तर त्याच्या वाफशावर शेत तयार करून पेरणी केली जाते.
यानंतर मृगातील पावसाच्या भरवशावर या पिकांच्या वाढीची स्वप्ने पाहिली जातात. यंदा मात्र काही भाग वगळता या पावसाने दडी मारली. मे संपला तरी अजूनही ज्या भागांत भाताच्या धूळवाफ पेरण्या होतात त्या भागांत अद्याप पाऊस झाला नाही.
आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्या ठिकाणी थोडाफार पेरण्या झाल्या आहेत. अन्य ठिकाणी मात्र पेरणी झाल्याच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.