Diwali Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Diwali 2024 : सगळं काही रेडिमेड शोधायच्या नादात सणावारातले, पर्यायानं जगण्यातले सेंद्रिय तत्त्व (नैसर्गिकता) हरपले असून दिवाळीसारखे सण इव्हेंट किंवा उपचार होत चाललेत. अर्थात स्मरणरंजनातून नाराजीचा राग आळवण्यात आता काही हशील नाही. संचितातलं सत्त्व गमावू न देता नवे बदल स्वीकारत पुढे जायला लागेल.

Team Agrowon

Indian Festival : कृषी संस्कृतीत सण आणि उत्सव यांचं अनन्यसाधारण महत्त्व होतं आणि आहे. हंगामामागून येणाऱ्या हंगामाचे स्वागत केलं जात असे तसं एकामागून येणाऱ्या सणासुदीचंही मोठं अप्रूप असायचं. महिनाभर आधी दिवाळीचे वेध लागलेले असायचे. कधी एकदाची सहामाही परीक्षा संपते असे होऊन जाई. परीक्षा संपली की दिवाळीची लगबग सुरु होई. शेतातली कामं वेळेत आवरून घेतली जात. सगळ्यात पहिले काम भुई घेणे असायचे. घर, ओसरी खोदायची. पाणी शिंपून माती भिजवायची. चिखल करायचा. चोपणीने चोप द्यायचा. सकाळ, दुपार, संध्याकाळ हलकं पाणी शिंपडून चोपणीने भुई बडवायची.

बाभळीच्या शेंगांमधल्या बिया(याला आमच्या भागात दामुके म्हणतात) दरवाजापाशी जमिनीत चिखलात रुतवून नक्षी तयार केली जात असे. भुई चोपण्याचा दिनक्रम चार आठ दिवस सुरू असायचा. जवळपास सगळीच घरं भेंड्यात बांधलेली, दोन पाखी कौलारू घरं असायची. मातीच्या भिंती असल्याने त्या सारवायला लागत. ''सारव भिंती म्हणं कोनाडे किती?'' ही म्हण ग्रामीण भागात यातून रूढ झाली. आधी भुई घेतली की चिकन मातीने भिंतीवर पडलेली टिचरं लिंपून घेतली जात. मग पोचाऱ्यानं भिंती सारवायच्या. भिंती सारवायला खास भुरकट माती चाळून आणायला लागायची. भुई घेतल्यावर शेणानं सारवलं की सुंदर दिसायची. पुढं काही महिने उद गळत नसे. काही महिने उलटले की शेण पोपडे धरायचं. म्हणून भुई घ्यायला लागायची. काही हौशी लोक घरांच्या भिंतींना चुन्यात मोरपंखी रंग मिसळून देत असत.

गोधड्या धुणे हा एक दिवसभराचा जंगी कार्यक्रम असायचा. बैलगाडीत घालून गोधड्या नदीला किंवा ओढ्याला घेऊन जायच्या. भिजलेल्या जड गोधड्या धुवायला एकमेकींची मदत होई. धुतलेल्या गोधड्या नदीकाठी वाळायला घातल्या की ते रंगीबेरंगी कोलाज मनोहर दिसत असे. या सगळ्यात आम्हा पोरांची लुडबूड सुरू असायची.

बांबूच्या काड्या बांधून त्याला पेपर चिकटवून भलामोठा आकाशकंदील (तेव्हा त्याला आम्ही आगलदिवा म्हणत असू) तयार करत असू. वसुबारसेच्या दिवशी ''दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी...'' असं गाणं म्हणत घरोघरी जाऊन आम्ही मुलं तेल मागत असू. बहिणींना मुऱ्हाळी जाणे हा एक महत्त्वाचा हिस्सा असायचा. ग्रामीण भागात सगळीकडे हेच चित्र दिसत असे.

दिवाळीत बनवलेले लाडू आणि करंज्यांसारखे गोडधोड फराळ म्हणजे केवढा मोठा आकर्षणबिंदू! आई बेसन पिठाच्या चानक्या तळून त्या चुरून त्यात सगळी साखर टाकून लाडू बनवायची. हे फराळ मर्यादित असले तरी त्यांची लज्जत काही औरच होती. टेस्ट दीर्घ काळ जिभेवर रेंगाळत असे. खेरीज वर्षभरात एकदाच खायला मिळत म्हणून त्याची नवलाई, अपूर्वाई असायची. दिवाळीत बनवलेल्या रव्याच्या लाडवाच्या अनेकानेक सुरस कथा आहेत. काही दिवसांनंतर हे लाडू फोडण्यासाठी ''खास व्यवस्था'' करावी लागायची.

अलीकडे मिठाईच्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या रेडिमेड खाद्यपदार्थांना त्या काळातल्या लाडू आणि करंज्यांची सर येणं कदापि शक्य नाही. नवे कपडे घालून आकडत मकडत पोरं उगीचच गल्लीतून दोन चक्कर टाकून यायची. पिस्तुलमध्ये टिकल्याचे रोल घालून आवाज काढणे अत्यानंदाचा विषय असे. सुरसुऱ्या आणि लवंगी फटाकड्या वाजवण्यातली मौज काही निराळीच होती...

त्यावेळी गरिबी होती, अभाव होता; संसाधने नव्हती. मात्र जगण्यात आनंद मोठा होता. हल्ली दिवाळी येते; पण वर्षातला एक मोठा सण म्हणून आता दिवाळीचे वेध लागत नाहीत. तितकं अप्रूप राहिलं नाही. दरवर्षी दिवाळी येते. खरं तर दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव. मात्र इथं तेल आणि वातीची गरज नसलेल्या मेणबत्तीसारख्या पणत्या आल्यात. चायनीज माळा घरांवर लावल्या जातात. प्लॅस्टिकचे रेडिमेड आकाश कंदील टांगले जातात. रंगीबेरंगी पणत्या आल्यात. दारात रांगोळी काढली जाते.

किराणा, सामान आणायचं. आचाऱ्याकडून काही गोडधोड खाद्यपदार्थ बनवून घ्यायचे. मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची. उपचार होत चाललाय सगळा... रोषणाईचा झगमगाट आहे, पक्वान्नांचा घमघमाट आहे. फोटो, व्हिडिओ, रिल्सचा तडका आहे.... मात्र तीन साडे दशकं आधी दिवाळी साजरी करण्यात होती ती गंमत आता उरली नाही... हे वास्तव नजरेआड करता येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींतला मोठा आनंद शोधणं, तो घेणं बंद होत चाललंय.

एक काळ होता की जेव्हा शेतकरी लोक दावणीच्या जनावरांना आपल्या कुटुंबातले सदस्य मानत असत. अलीकडे तर दावणीला जनावरंच उरलेली नाहीयेत. पोळ्याच्या दिवशी ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. कृषी संस्कृती हळूहळू लोप पावत चाललीय. सांस्कृतिक अंगांनं अंधानुकरण आणि ''सांस्कृतिक गुलामगिरी'' वाढत चाललीय. बहुजन समाजानं आपली संस्कृती आणि परंपरा सोडून देऊन टीव्ही, सिनेमे आणि युट्यूबवरले व्हिडिओ बघून त्या प्रभावाखाली येऊन इतर संस्कृतीतील नवनवीन सण-उत्सव आयात केलेत.

ते आनंदाने साजरे करू लागलेत. करवा चौथसारख्या काही नव्या गोष्टी आल्या आहेत. नवरात्रीत दांडियासारखे नवे उत्सव साजरे होऊ लागलेत. नवीन रीतिरिवाज, नवीन देव-देवकंसुद्धा स्वीकारलीत. त्याबद्दल तक्रार नाही. मात्र आपण कोणाचे वारस आहोत, याचाही शेतकऱ्यांच्या लेकरांना विसर पडलाय. याबद्दल मनात खंत आहे. बळीराजाला पाताळात घातलेला वामन आज मनामनावर राज्य करू लागलाय. शेवटी काळाचा महिमा अगाध असतो! शेताच्या बांधावरची मावलाई, म्हसोबा, मोठ्याबाबा, बिरोबा यांचा विसर पडत चाललाय. त्या ‘दगडांना‘ शेंदूर फासायला यांचे मन गुंतत नाही. दांडिया-रास खेळायला त्यांचे मन ओढ घेत धावत सुटते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

अर्थात जगभरातल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा अशाच बदलत जातात, याला इतिहास साक्षीदार असतो. समाजातील प्रबळ वर्गाची संस्कृती आणि भाषा इतरांना नाईलाजानं स्वीकारायला लागते. दिवाळी, बैलपोळ्यासारखे सण-उत्सव आता केवळ ठेवणीतल्या आठवणी बनून राहिलेत. काळाच्या उदरात सगळं कुठंतरी गुडुप झालंय.

पूर्वसंचित बनून राहिलंय. केवळ स्मरण रंजनापुरतं. हे सारं आठवलं की मन पाखरू होतं. भूतकाळात विहार करत राहतं. आई-बापाच्या आठवणी भोवतीनं फेर धरुन नाचू लागतात. काळजात वेदनेची कळ उठते. मन व्याकूळ होतं.

आजचा जमाना जागतिकीकरणाचा आहे. माहिती-तंत्रज्ञान आल्यानंतर झपाट्याने जगाचे ''सांस्कृतिक सपाटीकरण'' अत्यंत गतीनं होत आहे. जाहिरातींचा बेफाम मारा सुरु आहे. बाजार जगण्यावर प्रचंड प्रभाव टाकू लागलाय. मानवी समुदायाची जीवनशैली बदलत गेलीय. माणसाच्या आनंदाच्या परिकल्पना वेगानं बदलत गेल्यात. माणूस ग्राहक बनवला गेला. पैसा मोठा झाला. माणूसपण हरवत चाललंय. समाज आत्मकेंद्रित बनत चाललाय. सणावाराला एकत्र येणं, गुण्यागोविंदानं आनंद वाटून घेणं कमी होत गेलं.

त्यातलं अप्रूप संपलंय. पर्यावरणविषयक अघोषित आणीबाणी जाहीर झालेली असतानाच्या काळात ध्वनी आणि हवेचे प्रदूषण करणारे आवाजाचे फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात बेधुंद तरुणाई आनंद, धन्यता मानत आहे. बटबटीत प्रदर्शन सुरू आहे. चकचकीत मॉलमध्ये जाऊन कपडे, वस्तू आणि फराळ खरेदी करणं आणि त्या खरेदीतला आनंद लुटणं म्हणजे सेलिब्रेशन अशी नवी व्याख्या रूढ होत आहे. सगळं काही रेडिमेड शोधायच्या नादात सणावारातले, पर्यायानं जगण्यातले सेंद्रिय तत्त्व (नैसर्गिकता) हरपले असून दिवाळीसारखे सण इव्हेंट किंवा उपचार होत चाललेत. अर्थात स्मरणरंजनातून नाराजीचा राग आळवण्यात आता काही हशील नाही. संचितातलं सत्त्व गमावू न देता नवे बदल स्वीकारत पुढे जायला लागेल.

हल्ली दिवाळी येते; पण वर्षातला एक मोठा सण म्हणून आता दिवाळीचे वेध लागत नाहीत. तितकं अप्रूप राहिलं नाही. चायनीज माळा घरांवर लावल्या जातात. प्लॅस्टिकचे रेडिमेड आकाश कंदील टांगले जातात. रंगीबेरंगी पणत्या आल्यात. दारात रांगोळी काढली जाते. किराणा, सामान आणायचं. आचाऱ्याकडून काही गोडधोड खाद्यपदार्थ बनवून घ्यायचे.

मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची. उपचार होत चाललाय सगळा...सगळं काही रेडिमेड शोधायच्या नादात सणावारातले, पर्यायानं जगण्यातले सेंद्रिय तत्त्व (नैसर्गिकता) हरपले असून दिवाळीसारखे सण इव्हेंट किंवा उपचार होत चाललेत. अर्थात स्मरणरंजनातून नाराजीचा राग आळवण्यात आता काही हशील नाही. संचितातलं सत्त्व गमावू न देता नवे बदल स्वीकारत पुढे जायला लागेल.

९४२२८५५१५१

(लेखक प्रयोगशील शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

NCP ajit pawar Candidate : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही तिसरी यादी आली समोर! तिसऱ्या यादीत फक्त चौघांचा समावेश

E-Peek Pahanai : अकोला जिल्ह्यात ८२ टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी

Paddy Market : धानाला किमान चार हजार रुपये क्‍विंटलचा दर द्या

Rabi Season 2024 : मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

SCROLL FOR NEXT