Cauliflower Farming : फ्लॉवर पिकाची संस्कृती रुजलेले वडखा

Agriculture Success Story : सुमारे २५ वर्षांपूर्वी वडखा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) गावात फ्लॉवर पिकाची संस्कृती रुजली. आज या पिकात हातखंडा निर्माण करीत त्यातून येथील शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती साधली आहे.
Cauliflower Farming
Cauliflower FarmingAgrowon
Published on
Updated on

Cauliflower Production Story : चहूबाजूंनी डोंगरदऱ्या आणि लाहुकी नदीच्या तीरावर वसलेले गाव म्हणजे वडखा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) गावाची ओळख आहे. आज या गावाने फ्लॉवर पिकात आपली ख्याती निर्माण केली आहे. तत्कालीन आमदार व राजस्थानचे विद्यमान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या कार्यकाळात गाव शिवारात १२ पाझर तलाव व २० नाला बंडिंगची निर्मिती झाली आहे.

घरटी होतो फ्लॉवर

सुमारे २५ वर्षांपूर्वी वडखा गावात फ्लॉवर घेण्याची संस्कृती रुजू लागली. त्यापूर्वी पारंपरिक बाजरी, मका कपाशी अशी पिके शेतकरी घ्यायचे. आज सुमारे ६०० हेक्टरच्या आसपास लागवडीयोग्य क्षेत्र असलेल्या गावशिवारात सुमारे ४० टक्के फ्लॉवरचे क्षेत्र असावे. सुमारे २०० उंबराच्या गावात असं कुटुंब नसेल की ज्याकडे हे पीक नसेल.

दहा गुंठ्यांपासून ते तीन एकरांपर्यंत हे पीक घेणारे शेतकरी शिवारात पाहायला मिळतात. सुमारे दोनशे एकरांवर मागील वर्षापर्यंत कांदा असायचा. तो आता निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. तो फक्त त्यावर आलेल्या पीळ रोगामुळे. मका, कपाशी, टोमॅटो, भेंडी, भोपळा, काकडी अशी पिकेही गावात पाहण्यास मिळतात.

...अशी होते फ्लॉवरची शेती

जून ते डिसेंबर, फार तर जानेवारीपर्यंत गावात फ्लॉवरची रेलचेल सुरू असते. या संपूर्ण काळात दररोज फ्लॉवर उपलब्ध राहावा यासाठी ८ ते १५ दिवसांच्या अंतराने लागवडीचे टप्पे शेतकरी घेतात.

गावातील फ्लॉवरचे पंचवीस वर्षे अनुभवी शेतकरी बद्रीनाथ काकडे सांगतात की जून ते ऑगस्ट व त्यानंतर ऑगस्ट ते डिसेंबर अशा दोन हंगामांत येथील शेतकरी फ्लॉवर घेतात. सुमारे ८ प्रकारचे वाण शेतकरी वापरतात.

मेच्या सुमारास पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडीचे नियोजन असते. एक महिन्याच्या अवधीत रोप पुनर्लागवडीसाठी सज्ज होतं. शंभर ग्रॅम बियाण्याचे पाकीट ८०० ते १००० रुपयांना मिळतं. शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार तीन ते चार पाकिटांमध्ये एक एकर साठी लागणारी रोपे तयार होतात.

Cauliflower Farming
Farmer Success Story : देशसेवेचे समाधान मिळतेय आता गावच्या मातीतही

एकरी उत्पादन

गावात पंचवीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव तयार झालेले फ्लॉवर उत्पादक पाहण्यास मिळतात. ते एकरी १५ टनांपासून ते १८ टनांपर्यंत उत्पादन घेतात. एकरी सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत उत्पादन खर्च येतो. हवामान अनुकूल असेल तर फवारणीच्या खर्चांत थोडी बचत होते.

किमान चार फवारण्या किडी-रोगांच्या नियंत्रणासाठी होतात. प्रति फवारणीला २५०० ते ३००० रुपये खर्च येतो. एकरी चार ते पाच मजूर पाचशे रुपये प्रति रोजाप्रमाणे काढणी करण्यासाठी लागतात. कुटुंबातील सदस्य काढणीच्या कामात असले तर हा खर्च बराच कमी होतो.

बाजारपेठ शोध थांबला

पूर्वी गावातील शेतकरी एकत्रित गाडी करून त्यात दहा टनांपर्यंत माल भरून सुरत, नागपूर, चंद्रपूर, भिलाई, वाशी आदी बाजारपेठांमध्ये जायचे. दररोज तीन ते चार तर कधी सहा ते आठपर्यंत गाड्या भरून जायच्या. त्या वेळी परवडेल असा दर मिळण्यासाठी बाजारपेठा शोधण्याचा संघर्ष असायचा.

हळूहळू राज्यातील व राज्याबाहेरील व्यापाऱ्यांना गावातील फ्लॉवरची गुणवत्ता व एकाचवेळी माल उपलब्ध होण्याची संधी कळाली. आता विविध ठिकाणचे पाच ते सहा व्यापारी गावात येतात. परिसरातील शेतकऱ्यांमधून देखील खरेदीदार तयार झाले आहेत. त्यांचा व्यापाऱ्यांशी संपर्क असतो. त्यातून थेट जागेवर खरेदी होते.

त्यामुळे बाजारपेठ शोधण्याचा संघर्षाला जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरील खुल्या जागेत किलोला सहा ते २० रुपये व काहीवेळा त्याहून अधिक दराने खरेदी होते.

नागपूर, रायपूर, जबलपूर आदी बाजारपेठांमध्ये दररोज वडखा, परदरी, नाथनगर, निपाणी, भालगाव आदी भागांतून सहा ते सात गाड्या फ्लॉवर जातो. वजन केल्यानंतरशेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित किंवा सायंकाळपर्यंत पेमेंट जमा होते.

Cauliflower Farming
Vegetable Farming : फ्लॉवर पिकातून मिरवडीची बनतेय ओळख

आर्थिक प्रगती करणारे पीक

फ्लॉवर पिकात पंचवीस वर्षांचा अनुभव असलेले बद्रीनाथ काकडे एकरी १८ ते २० टनांपर्यंत उत्पादन घेतात. सुमारे तीन महिन्यात पैसे मोकळे करून देणारे फ्लॉवरसारखे दुसरे पीक नाही असे ते सांगतात. किलोला सरासरी १० रुपये व १८ ते २० रुपयांपर्यंत दर मिळतो.

खर्च वजा जाता एकरी एक ते दीड लाख रुपये नफा शेतकऱ्यांच्या हाती येतो असे ते सांगतात. प्रत्येकाकडे किमान दोन ते तीन एकर क्षेत्र असतेच. याच पिकातून गावची आर्थिक प्रगती झाली आहे. गावात सिमेंटची घरे आहेत. दोनशे- तीनशे मोटारसायकल्स असतील.

काकडे आपला अनुभव सांगतात की पूर्वी पाच चुलत्यांचे आमचे कुटुंब होते. राहायला घर नव्हते. सर्व चुलत्यांमध्ये मिळून दीड एकरापेक्षा जास्त फ्लॉवर करण्याची ताकद नव्हती. आज सर्व जण विभक्त झाले आहेत. प्रत्येकाकडेतीन एकरांपर्यंत फ्लॉवर आहे. सर्वांनी त्यातून आर्थिक प्रगती साधली आहे.

काढणी झाली सोपी

तसे पाहता फ्लॉवरची काढणी करताना एका कट्टा (पोते) भरण्यासाठी तीन व्यक्तींची गरज पडते. दोघे कट्टा धरतात तर एक जण काढणी केलेला फ्लॉवर त्यामध्ये भरतो. परंतु गावातील एका ‘फॅब्रिकेटर’ने शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन चार पायांची खुर्चीच तयार केली.

ज्यामुळे एकच व्यक्ती त्या खुर्चीत कट्टा अडकवून फ्लॉवरची काढणी करू शकतो. एकाहून अधिक व्यक्ती असल्यास त्यांनाही जलदगतीने काढणी शक्य होते. शिवाय मजुरीतही बचत शक्य झाली.

‘ट्रॅव्हल्स’च्या गाड्या यायच्या शिवारात

एकेकाळी फ्लॉवरसाठी बाजारपेठ शोधावी लागण्याची वेळ होती. त्या वेळी प्रत्येक गाडीसोबत चार ते पाच शेतकरी मालाचा पैसा घेण्यासाठी जायचे. कधी कधी तर ही संख्या इतकी व्हायची की त्या वेळी मुंबई-नागपूर दरम्यान धावणाऱ्या ‘ट्रॅव्हल्स’ बसेस आमच्या गावापर्यंत यायच्या. कारण निम्मी किंवा प्रसंगी पूर्ण प्रवासी भरती आमच्याच गावातील शेतकऱ्यांचीच असायची असा किस्सा वडखा येथील शेतकऱ्यांनी सांगितला.

बद्रीनाथ काकडे ९५४५९६१२९१

पंडित काकडे ८०१०७९८११२

विठ्ठल काकडे ९१५८१७७८९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com