Unseasonal Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Problems : अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या रोगसमस्या, उपाययोजना

Crop Damage : अलीकडील काही दिवसांत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे विशेषतः सांगली विभागातील द्राक्ष बागांमध्ये घडातील द्राक्षमणी तडकून मोठे नुकसान झाले. त्यातून वाचलेल्या बागांमध्येही मण्यांवर काळ्या डाग येण्याची समस्या तयार झाली.

Team Agrowon

डॉ सुजॉय साहा, डॉ. रत्ना ठोसर

मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सांगली विभागातील मणेराजुरी, कवलापूर, सोनी या भागांमध्ये घडातील द्राक्षमणी तडकून खूप नुकसान झाले आहे.

परंतु यानंतरही त्यातून वाचलेल्या बागांमध्ये द्राक्षमण्यांवर काळ्या डाग ही समस्या तयार झाली आहे. काळे व तपकिरी रंगाचे पसरणारे ठिपके अशा प्रकारचे हे डाग आहेत. सुरुवातीला काळ्या रंगाचे ठिपके तयार होऊन ते एकत्र झाले, की तपकिरी रंगाचा करप्यासारखा डाग द्राक्षघडांवर दिसून येत आहे.

ज्या बागांमध्ये छाटणी उशिरा आली आहे, अशा बागांमध्ये त्याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सुरुवातीला या डागांना आळा घालण्यासाठी या भागातील बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात फवारण्या केल्या. परंतु तरीही याचे प्रमाण कमी झाले नाही. त्यानंतर केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर पुढील काही गोष्टी निदर्शनास आल्या.

अवकाळी झालेल्या पावसामुळे जमिनीतील व हवेतील आर्द्रतेमध्ये वाढ होऊन रोगास पोषक वातावरण तयार झाले. काही बागांतील जमिनी काळ्या आहेत. अशा जमिनींमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे जास्त काळ ओलावा टिकून राहिला.

याचबरोबर ज्या बागांमध्ये दाट कॅनॉपी आहे, अशा बागांमध्ये जास्त फवारण्या केल्यामुळे आर्द्रता वाढून रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले.मण्यांच्या आकारात वाढ होण्यासाठी संजीवकांचा होणारा अतिवापरही मणी तडकण्यास कारणीभूत ठरतो.

मण्यांवरील डाग

मण्यांवरील डाग हे सुरुवातीला जरी बुरशीनाशकांच्या वापरामुळे वाटले. मात्र असे असले तरी द्राक्ष नमुन्यांच्या प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासावरून याचे कारण स्पष्ट झाले आहे. मण्यांवरील हे डाग बुरशीजन्य करपा (ॲन्थ्रॅकनोज) व जिवाणूजन्य करपा (बॅक्टेरियल स्पॉट) यामुळे असल्याचे आढळले आहे. अशा एकत्रित प्रादुर्भावामुळे द्राक्षामणी पूर्णपणे तपकिरी रंगाचे दिसून आले.

रोगांविषयी माहिती

बुरशीजन्य करपा हा रोग कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होतो. ही बुरशी पावसाळी, दमट व उष्ण वातावरणात वाढते. साधारणपणे महाराष्ट्रात हा रोग फळधारणेच्या आधीच्या अवस्थेत दिसून येतो. मात्र या वर्षी फळधारणेनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे अनुकूल वातावरण मिळाल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव द्राक्षघडांवर मोठ्या प्रमाणात दिसून आला. हिरव्या काडीवर प्रादुर्भाव असल्यास या रोगाचे बीजाणू हळूहळू परिपक्व काडीमध्ये प्रवेश करतात. पुढील काळात ते घडांवर प्रादुर्भाव करतात.

जिवाणूजन्य करपा झान्थोमोनास या जिवाणूमुळे होतो. बागेत ओलावा आणि उबदार वातावरण असल्यास रोगाची लक्षणे पानावर दिसून येतात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे बुरशीजन्य करपा रोगाच्या लक्षणांप्रमाणेच पानांच्या खालील बाजूस डाग येतात. कालांतराने हे डाग मोठे होऊन फुटीची वाढ खुंटते किंवा थांबते. हे जिवाणू रोगग्रस्त वेलींच्या गाभ्यामध्ये जिवंत राहतात.

गाभ्यातून वाहणाऱ्या अन्नरसाबरोबर ते नवीन निरोगी फांद्या, फुटी व घडांमध्ये जातात. या रोगामध्ये डागांभोवती पिवळसर रंगाची रिंग तयार होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरूपात असेल तर मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. प्रामुख्याने खोडाला भेग पडते. वेलींमध्ये जिवाणूंचा प्रवेश छाटणी, शेंडा मारणे, काडी विरळणी तसेच ‘गर्डलिंग’च्या वेळी झालेल्या जखमेमधून होतो.

उपाययोजना

जास्त खराब झालेले घड काढून टाकावेत. उर्वरित घडातील खराब मणी काढून फवारणी घ्यावी.

काढलेले घड, मणी शक्यतो बागेच्या बाहेर पुरून टाकावेत. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव करणाऱ्या घटकांची संख्या बागेत कमी होईल.

द्राक्ष बागेतील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी बागेतील आर्द्रतेचे प्रमाण कसे कमी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दाट कॅनॉपी असलेल्या बागांमध्ये त्वरित कॅनॉपी विरळ करणे अत्यावश्यक आहे. यामुळे बागेत खेळती हवा राहून रोगाच्या वाढीला आळा बसेल.

ज्या भागांमध्ये सकाळच्या वेळेस दव पडते अशा बागांमध्ये आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या पानांचा पृष्ठभाग कोरडा करणाऱ्या विशिष्ट रसायनांचा वापर करावा.

उशिराच्या बागांमध्ये जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. जर बागेत लेखाच्या वरील भागात सांगितल्याप्रमाणे एखादे जरी लक्षण दिसून आले तर अशा वेळी कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर किंवा थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) ०.७१ ते ०.९५ ग्रॅम प्रति लिटर या बुरशीनाशकाची एक फवारणी घ्यावी.

त्यानंतर मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे एक अशी सलग फवारणी घ्यावी. याचबरोबर प्रादुर्भाव झालेल्या बागांमध्ये बॅसिलस सबटिलिस या जैविक नियंत्रकाची २ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे ३ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

बॅसिलस सबटिलिसच्या दोन फवारण्यांमध्ये एक फवारणी थायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) या बुरशीनाशकाची ०.७१ ते ०.९५ ग्रॅम प्रति लिटर अधिक मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी २ ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर या बुरशीनाशकांची एक फवारणी करावी.

जिवाणूजन्य करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कासुगामायसिन (५ टक्के) अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड (४५ डब्ल्यूपी) यांचा वापर  ७५० ग्रॅम प्रति हेक्टर व पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस या घटकाचा वापर ४ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात करावा.

निर्यातक्षम बागांमध्ये कोणत्याही बुरशीनाशकांची अथवा रसायनांची फवारणी करू नये. सद्यःस्थितीत रोगनियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलिस २ ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायकोडर्मा प्रजातीचा वापर २ ग्रॅम किंवा मिलि प्रति लिटर या प्रमाणात करावा. स्ट्रेप्टोमायसिनवर आधारित घटकाचा वापर करू नये.   

ज्या बागा अजूनही निरोगी व स्वच्छ आहेत, अशा बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा, अँपिलोमायसिस या जैविक बुरशीनाशकांची ३ दिवसांच्या अंतराने ३ ते ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

काही भागांमध्ये सकाळी पडणाऱ्या दवामुळे वेलीच्या वरच्या बाजूच्या पानांवर केवडा (डाऊनीमिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. तो रोखण्यासाठी कॅनॉपीचे योग्य नियोजन करून प्रादुर्भाव झालेली पाने काढून टाकावीत. यानंतर मॅन्कोझेबची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी घ्यावी.

प्रयोगशाळेत आलेल्या द्राक्षनमुन्यांचे ‘मोइस्ट चेंबर ॲनॅलिसिस केल्यानंतर असे निदर्शनास आले,

की कोलेटोट्रिकम व झान्थोमोनास या व्यतिरिक्त कोणत्याच रोगांचा प्रादुर्भाव द्राक्षघडांवर नाही.

ताम्रयुक्त बुरशीनाशक किंवा प्रतिजैविकांच्या (ॲण्टिबायोटिक्स) फवारण्या कटाक्षाने टाळाव्यात.अशा जास्त फवारणींमुळे वेली कमकुवत होतात.

थंडीच्या दिवसांत भुरीचा धोका जास्त असतो. उशिराच्या बागांमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी ट्रायअझोल गटातील (हेक्झाकॉनॅझोल किंवा तत्सम) बुरशीनाशकांची फवारणी केल्यास भुरीच्या बरोबरीने कोलेटोट्रिकम देखील नियंत्रणात येईल.

सद्यःस्थितीत कोणत्याही संजीवकांचे (पीजीआर) व वाढीच्या ‘टॉनिक्स’चे टाकीत मिश्रण करून वापर करू नये.

पुढील हंगामासाठी एप्रिल छाटणीदरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे.

पुढील फळधारणेच्या रोगांचे असे आक्रमण टाळण्यासाठी सामुदायिकपणे स्वच्छ लागवडीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT