Chhatrapati Sambhaji Nagar News : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी (ता. १) खरीप पिकासाठी पाणीपाळी सुरू केली. आता उजव्या कालव्यातूनही सोमवारपासून (ता. ४) विसर्ग सुरू केला आहे. जवळपास २५ दिवस दोन्ही कालव्यातील विसर्ग सुरू राहील.
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. मराठवाडा विभागातील जायकवाडी व नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्पांतून पाटबंधारे विभागामार्फत कालव्यांद्वारे होणाऱ्या सिंचनाची माहिती या वेळी देण्यात आली. उपलब्ध पाण्यातून खरीप पिकांसाठी पाण्याची आवर्तने द्यावी, अशी भूमिका भुमरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मांडली.
खरिपाची पिके तरी हातात यावीत; या दृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली. जायकवाडीत उपलब्ध पाण्यात संपूर्ण वजावट करून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी २०२ एमएमक्यू पाणी उपलब्ध आहे. यानुसार १ सप्टेंबरपासून रोटेशननुसार स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार केलेल्या नियोजनातून १ सप्टेंबरला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून खरीप हंगाम २०२३-२४ साठी पाणीपाळी सुरू करण्यात आली. शुक्रवारी (ता. १) १०० क्युसेक विसर्ग सुरू करून कालव्याच्या मुखाशी स्थिर करण्यात आला. मंगळवारी (ता. ५) सकाळी हा विसर्ग ६०० क्युसेक कला गेला.
उजव्या कालव्यातून सोमवारी (ता. ४) १०० क्युसेकचा विसर्ग मंगळवारी सकाळी ६०० क्युसेक करण्यात आला. २०८ किलोमीटर लांबीच्या डाव्या कालव्यातून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील पिकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना उजव्या कालव्यातील विसर्गाचा लाभ होणे अपेक्षित आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराईतील दुष्काळी परिस्थितीमुळे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.