कांचन परुळेकर
Industrial Development : ज्याला उद्योग, व्यवसाय करायचा त्याला उद्योग व्यवसायासंबंधी विविध बाबींची माहिती असावी. उद्योगाची व्याख्या, उद्योग व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण, आवश्यक कौशल्ये, उद्योग योजना बनविण्याचे महत्त्व, रोजगार निर्मितीची प्रक्रिया, स्वयंरोजगार इत्यादीची माहिती करून घ्यावी.
पैसा किंवा नाव कमाविण्यासाठी केलेले शिस्तबद्ध, नैतिक प्रयत्न म्हणजे उद्योग. सतत नव्याचा ध्यास घेत नफा कमाविण्यासाठी उद्योग व्यवसाय सुरु करतो, चालू ठेवतो अन त्याची संपूर्ण जबाबदारी पेलतो तो उद्योजक. उद्योग व्यवसाय करायचा तर खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
नफा कमावण्याचा उद्देश हवा.
पैसा अन इतर साधने गुंतवणुकीचा परतावा मिळायला हवा.
ग्राहक, पुरवठादार, कामगार यांच्यासह संघटितपणे काम करता आले पाहिजे.
वेळेचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. योग्य वेळी, योग्य काळात योग्य वस्तू बाजारात यायला हवी.
हिशेबी जोखीम पत्करायला हवी. जुगार नको.
व्यवसाय, उद्योगाचा निश्चित आराखडा बनवायला हवा. पैसा सातत्याने फिरत राहिला पाहिजे.
सतत नव्याचा शोध घेऊन वाढीचा मार्ग शोधला पाहिजे.
अभ्यास महत्त्वाचा
नवा उद्योग सुरु करणे किंवा सुरु असणारा विकत घेणे यासाठी प्रथम अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना भेट द्याव्यात. उत्पादन, बाजारपेठ, कच्चा माल खरेदी, लोकांना ग्राहकांना, कर्मचाऱ्यांना हाताळणे याची माहिती घ्यायला हवी. इतरांनी उद्योग सुरु करून यश कसे प्राप्त केले अशा यशकथा बरोबरच अपयश कथाही समजाऊन घेतली पाहिजे. त्यासाठी पुढील गुणांची जोपासना आवश्यक आहे.
माहिती घेण्यास उत्सुक. पुढाकार घेणे.
होकारार्थी मानसिकता. संधीचा शोध घेणे.
साध्य करण्यास उत्सुक. उत्तम नेतृत्व. चिकाटीने काम. प्रचंड आत्मविश्वास. सामाजिक भान.
पृथ:करण करणे. उत्तम व्यवस्थापन. सतत पुढे जाण्याची ऊर्मी. पाठपुरावा करणे. स्व ची जाणीव.
वेळेचे भान. जोखीम पत्करणे.
अवगुण टाळा
ऐकून घेण्याची व सहन करण्याची क्षमता कमी असणे.
अविश्वासार्हता. उतावीळपणा. भावनाशुन्यता.
निर्दयीपणा. अधिकार गाजविण्याचा अट्टहास.
गटात/संघात काम करण्यास असमर्थ.
उत्पादन, व्यापार व सेवा असे उद्योगाचे प्रकार आहेत. नवीन वस्तू किंवा कल्पना तयार करून ती विकणे म्हणजे उत्पादन. दुसऱ्यांनी तयार केलेल्या वस्तू वा कल्पना आपण विकणे म्हणजे व्यापार. लोकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे उदा. केटरिंग, मंडप डेकोरेशन, इव्हेंट मॅनेजमेंट याला सेवा उद्योगात गणले जाते.
उद्योग पद्धती
प्रोप्रायटरशिप ः एकच मालक
पार्टनरशिप ः एकापेक्षा अधिक मालक
प्रायव्हेट लिमिटेड ः एकापेक्षा जास्त मालक. घटना , कायदा, बंधन वेगळे.
पब्लिक लिमिटेड ः खूप मालक, जनतेकडून शेअर्स स्वरूपात भांडवल जमा केले जाते.
सहकारी संस्था ः अनेक समविचारी एकत्र येऊन प्रारंभ. सहकार कायद्यानुसार उद्योग.
उद्योग व्यवसायाचा शोध
कोणताही उद्योग, व्यवसाय शोधताना प्रथम पुढील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांना काय लागते?
प्रत्येक सणाला लोक काय खरेदी करतात?
प्रत्येक मोसमात लोकांना कोणत्या विशिष्ट गोष्टी, सेवा लागतात?
आपल्या आजूबाजूला शैक्षणिक संस्था, दवाखाने, मंदिरे, शासकीय कार्यालये हे सातत्याने कशाची खरेदी करतात? त्यांना कोणत्या सेवा हव्या असतात?
नव्या तंत्रज्ञानानुसार व आपल्याकडील उपलब्ध कौशल्यानुसार आपण कशाची निर्मिती करू शकतो? कोणत्या सेवा पुरवू शकतो. ?
उद्योग सूची
उद्योग निश्चित करताना खालील प्रमाणे उद्योग सूची तयार करून निर्णय घ्यावा.
ग्राहकाला सतत लागणाऱ्या वस्तू. हस्तकला वस्तू.
उत्पादन ः कच्चा माल वापरून/अन्य कल्पना वापरून नवीन वस्तू/सेवा निर्मिती.
सेवा उद्योग ः कॉम्प्युटर सेवा, सेवा केंद्र, इस्त्री, मळणी, साधने भाड्याने देणे, बुकिंग, कुरिअर, रंगकाम, फवारणी, ड्रोन सेवा इत्यादी.
व्यापार ः धान्य, भाजी, फळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बियाणे, औषधे,इत्यादी.
जमिनीसंबंधी उद्योगः शेती, वनीकरण, रोपवाटिका, शेततळे, फळबाग लागवड.इ.
पूरक उद्योग ः डेअरी, पोल्ट्री, मधमाशी पालन, शेळीपालन, श्वानपालन, रेशीम इत्यादी. अशा अनेक विषयावर यादी बनवून त्यातील योग्य व्यवसाय निवडावा.
लक्षात घ्या वस्तुस्थिती
बाजारपेठ, तंत्रज्ञान, कच्चा माल उपलब्धता, कौशल्य, स्वतःची मानसिकता, स्वाभाविक कल, साधनांचा पाया याबाबी लक्षात घेऊन आपल्याला उद्योग निश्चित करायचा आहे.
समज
उद्योग शोधणे, चालविणे खूप कटकटीचे आहे.
उद्योजकाच्या कुटुंबात जन्मलेल्यांना उद्योग चालविणे जमते.
महिला कमी अनुभवी, कमी व्यावहारिक बुद्धीच्या असल्याने परिणामकारक उद्योग चालविणे त्यांना जमत नाही.
वस्तुस्थिती
वस्तुस्थिती आणि मूलतत्त्वे जाणून घेतली तर उद्योग चालविणे सोपे आहे.
प्रेरणा आणि आत्मविश्वास प्राप्त केलेली कोणतीही व्यक्ती उद्योग उभा करू शकते.
महिला उत्तम तयारीने उद्योगात शिरकाव करून उत्तम उद्योग व्यवस्थापक बनू शकतात
टीप ः वरील बाबी लक्षात घेऊन महिलांनी कृती करण्यास सुरवात करावी.
प्रथम काही व्यवसाय केंद्रांना भेटी द्याव्यात. उद्योग सुरु केल्यानंतरही अभ्यास भेटी चालू ठेवाव्यात.
अनेक लोकांशी चर्चा करावी. मित्र, कुटुंबीय, यशस्वी उद्योजक, सहकारी, विक्रेते, ग्राहक, बँकर्स, सल्लागार, इत्यादी.
उद्योगासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या असतात या संदर्भात वाचन करावे. त्या बाबी नीट समजून घ्याव्यात.
दुकानाला प्रदर्शनांना, बाजारांना भेट द्याव्यात.
संशोधन संस्थांशी संपर्क साधावा.
बुद्धीला चालना देण्यासाठी रिकाम्या वेळात उद्योगासंदर्भात खेळ खेळावेत. उदा. सुचलेले शब्द व त्यावरून उद्योगाचा शोध घ्यावा. उदाहरणार्थ... डास हा शब्द वाचताच मच्छरदाणी, डास निर्मूलन अगरबत्ती, लिक्विड, रॅकेट, फवारणी पंप अशी यादी बनेल. कागद शब्द ऐकताच कागदी बँग, लिफाफे, ओरिगामी, पेंटिंग्ज, कागदी लगद्याच्या वस्तू, सुरळीच्या वस्तू अशी मोठी यादी बनेल.
तंत्रज्ञानावर आधारित उदा. शेतीतंत्र, फोर इन वन मशिन, पाणी शुद्धीकरण इत्यादी.
वस्तू वा सेवा समोर येताच काय? का? कोठे? केव्हा? कोण? कसे? हे मूलभूत प्रश्न विचारा. त्यामुळे भूतकाळात लोकांनी किती व कसे उद्योग सुरु केले त्याचा उलगडा होईल. व्यवसाय निवड करण्यापूर्वी करील गोष्टी आवर्जून कराव्यात. घाईने व्यवसायात उडी घेण्यापूर्वी व्यवसाय कसा हे समजून घेण्यास पुरेसा वेळ द्यावा.
अंदाजाने कोणतेही काम करू नका, ते धोकादायक ठरते. नीट माहिती घेऊन कार्यरत व्हावे. माहितीची पडताळणी महत्त्वाची असते, एकाच माहितीवर विसंबून नका. त्यामुळे पूर्वग्रह दुषितता निर्माण होईल.
-------
०२३१- २५२५१२९
(लेखिका कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा
संस्थेच्या संचालिका आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.