
डॉ. सुमंत पांडे
मागील लेखात आपण शाश्वत विकासाची ध्येये (Sustainable Development Aim) ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Bodies) माध्यमातून कशी प्रत्यक्षात आणण्यात येतील याबाबत चर्चा केली. एकूण सतरा ध्येयांपैकी स्थानिक शाश्वत विकासाची नऊ ध्येय निर्धारित केलेली आहेत.
स्थानिक शाश्वत विकासाची ध्येये
गरिबीमुक्त गाव
निरोगी गाव
बालस्नेही गाव
पाणीदार गाव
स्वच्छ आणि हरित गाव
स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेले गाव
सामाजिकदृष्ट्या सुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या न्याय्य गाव
सुशासन असलेले गाव
महिला अनुकूल गाव
ही शाश्वत विकासाची ध्येये ही आपल्या गावचा आरसा आहेत. पुढील विकासाचे दिशादर्शन आहे. गावच्या लोकांच्या गरजा अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंतच्या गरजांची परिपूर्ती करण्याची संधी आता ग्रामपंचायतीकडे आहेत.
आखणी आणि प्राधान्य क्रम
नऊ शाश्वत विकासाचे ध्येयांचा आराखडा करत असताना ग्रामपंचायतींना नियोजनासाठी आपला प्राधान्यक्रम ठरवता येईल. महाराष्ट्रातील मॉन्सूनची स्थिती आणि कृषी हवामान प्रदेश पाहता पाणीदार गाव हा पहिला प्राधान्यक्रम राहू शकेल (कदाचित कोकणासाठी बदलू शकेल)
स्वच्छ आणि हरित गाव
स्वच्छ आणि हरित गाव असेल तर गावामध्ये समृद्धी, चैतन्य, आनंद, सदाचार या गोष्टी आपसूकच येतात. गाव पाणीदार असेल तर स्वच्छ आणि हरित ठेवण्यास अधिक सोयीचे जाते. यासाठी स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
आज ग्रामीण आणि निमशहरी भागात घन आणि द्रव कचरा या अत्यंत गंभीर समस्या झाल्या आहेत. कचऱ्याचे स्रोत, त्याचे नियोजन अनेक ग्रामपंचायतीच्या क्षमतेच्या बाहेर असल्याचे जाणवते. राज्यात अनेक गावांतून घंटागाडी असल्याचे दिसते. तथापि, सगळा कचरा एकत्र करून तो नियमितपणे नदी किंवा नाल्याचा काठी टाकत असल्याचे निदर्शनात येते. याचेही योग्य नियोजन करणे सहज शक्य आहे. अनेक गावांचे आपल्यासमोर उदाहरण आहे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये वृक्षतोड थांबलीच पाहिजे आणि नवीन झाडांची लागवड सातत्याने होत राहिली पाहिजे. वृक्ष लावणे आणि ते जगवणे खरे तर जीवन शैलीचा भाग व्हावा. अनेक लोकांनी यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. यामध्ये लोकसहभागाचे सातत्य असावे. कोणताही उत्सवाची किंवा उपक्रमाचे स्वरूप आणण्याचे ऐवजी प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून त्यावर वार्षिक आराखडा ठेवून काम करणे गरजेचे ठरते. अगदी गवतापासून ते अजान वृक्षापर्यंत सर्वांच्या यामध्ये समावेश आहे. ‘मग्रारोहयो‘मध्ये यात भरीव तरतूद करता येते.
गरिबीमुक्त गाव आणि निरोगी गाव
मागील काही लेखांमधून आपण ग्राम दारिद्र्यनिर्मूलन आराखड्याबाबत माहिती घेतली होती. स्थानिक शाश्वत विकास ध्येयाच्या अनुरूप गावाचा दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा महिला स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून तयार करावा. तो ग्रामविकास आराखड्याची संलग्न करणे क्रमप्राप्त आहे.
गाव दारिद्र्य निर्मूलन आराखड्याकडे ग्रामपंचायत विकास आराखडा जीपीडीपी याचा एक उप आराखडा म्हणून पाहावे. महिला गटांच्या माध्यमातून याचे नियोजन सध्या चालू आहे. महिलांच्या माध्यमातून ज्या बाबी सामोर येतील, ज्या मागण्या येतील, ज्या गरजा समोर प्रक्षेपित होतील, त्यावर आधारित उपलब्ध निधीतून टप्पेनिहाय निधी उपलब्ध करून दिल्यास ते काम शाश्वत पद्धतीने उभे राहील या शंका नाही.
पाणीदार गाव
२९ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तानमध्ये सरासरीपेक्षा सुमारे साडेसातशे पट अधिक पाऊस पडला आणि महापूर आला. साडेतीन कोटी जनता या तीव्र पुरामुळे हतबल झाली आहे. सिंधू नदीच्या पर्वतीय नद्यांच्या लाभक्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्यामुळे मागील शतकातील मोठा पूर असेही त्याचे वर्णन करतात. दुसरे उदाहरण चीनचे; चीन हा देश खरा तर पाण्यासाठी समृद्ध समजला जातो. तथापि, या देशाची समृद्ध नदी यांग्झी कोरडी पडली आहे. चीनच्या एक तृतीयांश भागामध्ये आज प्रचंड दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम विद्युत निर्मिती, व्यवसाय, लोकांच्या उपजीविका, देशाची आर्थिक प्रगती यावर होतो आहे. दुष्काळाबाबत आपल्या देशाला अधिक अनुभव आहे. कदाचित ही स्थिती आपल्यावर पण येऊ शकते. म्हणून पाणीदार गाव हे प्रथम प्राधान्य असावे.
मागील काही लेखांमध्ये आपण पाणीदार गावांची दिशा धोरण आणि अंमलबजावणी याबाबत विस्तार आणि चर्चा केली आहे. ग्रामपंचायत शासकांनी आपल्या गावाच्या पाणलोटाचा योग्य अभ्यास करून तिथल्या सर्व जलस्रोतांचे आणि पाण्याचे नियोजन केल्यास भविष्यामध्ये येणाऱ्या हवामान बदलाच्या संकटास सामोरे जाण्याची पूर्वतयारी करता येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.