Grapefruit  Agriculture
ॲग्रो विशेष

Grapefruit : मुरूडला पपनसाच्या उत्‍पादनात घट

Team Agrowon

Murud News : सण-उत्‍सवात पारंपरिक फळांना आवर्जून मागणी असते, त्‍यापैकीच एक पपनस. रायगड जिल्ह्यात मुरूड आणि नांदगावमध्ये पपनसाचे उत्‍पादन घेतले जात असले तरी वारंवार येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे सध्या पपनसाची झाडे मोठ्या प्रमाणात नष्‍ट होत आहेत. त्‍यामुळे पपनसाच्या उत्‍पादनात जवळपास १५ टक्‍के घट झाली आहे. पूर्वी पपनसाची झाडे प्रत्येक वाडीत दिसायची; मात्र आता अनेकांच्या बागांतून ही झाडे हद्दपार झाली आहेत.

कोकण किनारपट्टीवर काही वर्षांपूर्वी पपनसाच्या झाडांची संख्या मोठी होती. आता केवळ काकळघर आणि भोईघर येथील बागायतदारांनी ही झाडे ठेवली आहेत. संपूर्ण मुरूड तालुक्यात पपनसाची जेमतेम २५० ते ३०० झाडे असावीत. नवीन लागवडच होत नसल्‍याने दिवसेंदिवस हे प्रमाण कमी होत आहे. शिवाय, माकडांच्या उच्छादामुळे आलेल्‍या फळांची नासाडी होते.

पपनसाच्या एका झाडाला किमान ५० ते ६० फळे येतात तर एका फळासाठी ८० ते १०० रुपये बाजारभाव मिळतो. सण उत्‍सवात हा दर १५० ते २०० रुपयांपर्यंत जातो. एका झाडापासून सरासरी तीन ते चार हजारांचे उत्‍पन्न मिळते.

कोकणात कोकम, आंबा, फणस आदींवर प्रक्रिया करून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. पपनस या बहुगुणी फळावरही प्रक्रिया केल्‍यास चांगले उत्पन्न मिळू शकेल, असा विश्‍वास बागायतदारांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

बहुगुणी फळ

पपनस हे संत्र-मोसंबी असे लिंबूवर्गीय रसदार फळ आहे. प्रामुख्याने आशिया खंडात आढळते. तापात जसे मोसंबी, डाळिंब ही फळे पथ्य किंवा पौष्टिक म्हणून देतात, तसेच पपनसही आरोग्‍यवर्धक आहे. यात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व सी आणि बी-६, पोटॅशियम, पाचक फायबर, मॅग्नेशियम आदींचा समावेश आहे.

अतिवृष्‍टीमुळे फळगळती

वादळी पावसात होत असलेल्‍या फळगळतीचा परिणाम पपनसाच्या उत्‍पन्नावर होत असल्‍याचे शेतकरी सांगतात. नारळ-सुपारीच्या बागांमध्ये ज्‍याप्रमाणे आंतरपिके घेतली जातात, तशीच लागवड पपनसाच्या सुधारित जातीची होणे आवश्‍यक असल्‍याचा सल्‍ला कृषितज्‍ज्ञ देतात.

साधारण सप्टेंबरमध्ये ही फळे पिकून तयार होत असल्याने गणेशोत्‍सव त्‍यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्रोत्‍सवात मोठी मागणी असते. अलीकडेच कृषी विद्यापीठाने पपनसाची नवीन जात विकसित केली आहे. त्याची लागवड केल्यास उत्पन्न वाढू शकते.
-उल्हास वारगे, शेतकरी गटप्रमुख, मुरूड
सण-उत्‍सवात पपनसाला मागणी असते. आमच्या बागेत ४० वर्षांपासून तीन झाडे आहेत. झाडांसाठी सेंद्रिय खताचा वापर करतो. अनेक ग्राहक घरी येऊन फळांची खरेदी करतात. नवरात्रोत्‍सवात ओटी भरण्यासाठी पपनसाला विशेष मान आहे. त्‍यामुळे या काळात फळाला मागणी वाढते.
- विलास जोशी, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : एक लाखावर शेतकरी अर्थसाह्यासाठी पात्र

Crop Damage : पावसामुळे २४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Crop Damage : सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान

Rabi Season : रब्बी पेरणीसाठी ४७ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसानग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT