Horticulture : बारमाही उत्पन्न देणारी फळबागकेंद्रित शेती

Fruit Production : जळगाव जिल्ह्यात वरणगाव (ता. भुसावळ) येथील विजय अरुण चौधरी यांची पूर्वी केवळ कापसावर आधारित शेती होती. मात्र वर्षभर उत्पन्नाचा स्रोत सुरू ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी चक्राकार पद्धतीने फळबागकेंद्रित शेतीचा अंगीकार केला.
Horticulture
Horticulture Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरापासून सुमारे सात किलोमीटरवर वरणगाव आहे. इथली शेती काळी कसदार, मध्यम प्रकारची असून भाजीपाला, भरीत वांगी, कांदे उत्पादनात गाव आघाडीवर आहे. आहे. गावास नदीचा मोठा स्रोत नाही. काही भागात जलसाठे मुबलक, तर काही भागात ते कमी आहेत.

गावातील विजय चौधरी यांची पाच एकर शेती आहे. ‘आयटीआय’चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नोकरी न करता वडिलोपार्जित शेतीतच राबवण्यास सुरवात केली. पाण्याची सोय म्हणून विहीर आहे. पशुधनात तीन गायी आहेत. पत्नी शारदा यांची भक्कम साथ असून, पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या शेती करतात. मुले शुभव व अथर्व शिक्षण घेत आहेत.

चौधरी यांची शेती

पूर्वी चौधरी यांची कापूस केंद्रित शेती होती. मात्र आर्थिकदृष्ट्या ती परवडत नव्हती. शिवाय त्यातून वर्षभराचा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येत नव्हता. अशावेळी वर्षभर ताज्या उत्पन्नाचा स्रोत सुरू राहील यादृष्टीने फळबागकेंद्रित शेतीचा त्यांनी अंगीकार केला. सध्या पाच एकरांपैकी दोन एकर तोंडली, सव्वा एकर ड्रॅगन फ्रूट व त्यात पेरूचे आंतरपीक आहे. सलग पद्धतीनेही पेरूचे काही क्षेत्र आहे. अलीकडे बोराची लागवड केली आहे. एक एकरात शेवगा पीक घेण्यात येते.

Horticulture
Agriculture Success Story : फळबागेने दिली आर्थिक समृद्धी...

ड्रॅगन फ्रूटविषयी

ड्रॅगन फ्रूटची १२ बाय आठ फूट अंतरावर लागवड केली आहे. सिमेंटचे खांब व प्लेट यांचा आधार रोपांच्या वाढीसाठी दिला आहे. एकूण सुमारे ५२५ खांब असून प्रति खांबावर चार रोपे आहेत. एकेदिवशी चौधरी सोलापूर- पंढरपूर परिसरात गेले असता तेथे या पिकाची लागवड त्यांना पाहण्यास मिळाली. त्यानंतर हा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले.

प्रति रोप २० रुपये दराने रोपे आणली.सुरुवातीला एकरी साडेतीन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागली. जळगाव भागात उन्हाला तीव्र असल्याने वाढीवर काहीसा परिणाम होत असल्याचे चौधरी सांगतात. तसे हे कमी पाण्याचे पीक आहे. हिवाळ्यात आठवड्यातून एकदा किंवा गरजेनुसार वाफसा ठेवण्यासाठी सिंचन केले जाते. पेरूच्या जंबो वाणाची लागवड १२ बाय पाच फूट अंतरावर केली आहे.

तोंडली व शेवगा उत्पादन

तोंडलीची १० बाय पाच फूट अंतरावर लागवड आहे. अलिबाग या नावाचा हा वाण असल्याचे चौधरी सांगतात. सध्या १६०० रोपे आहेत. पुणे जिल्ह्यातून २५ रुपये प्रति रोप या दरात ती आणली होती. सिमेंटचे खांब, तारा, प्लॅस्टिकच्या बारीक मजबूत दोरांचा मंडप आहे. वर्षभरात सुमारे नऊ महिने आठवड्याला दोन वेळेस या प्रमाणे तोंडली उत्पादन देते. दर काढणीस ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळते.

उन्हाळ्यात उत्पादन अधिक तर थंड वातावरणात ते कमी येते. ओडीसी या वाणाच्या शेवग्याची १० बाय पाच फूट अंतरावर लागवड केली असून सुमारे ८५० झाडे आहेत. या पिकासही पाणी कमी लागते. जुलै ते मे या काळात उत्पादन सुरू असते. सर्व पिकांना शेणखत वर्षातून एकदा दिले जाते. तसेच सेंद्रिय अर्क तयार करून त्याचा वापर केला जातो.

Horticulture
Agriculture Success Story : अल्पभूधारक देसले बंधू झाले ४५ एकरांचे मालक

गुणवत्तेमुळे मालास उठाव

सर्व फळपिकांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यात येते. ड्रॅगन फ्रूटच्या फळाचे वजन ३०० ग्रॅम ते अर्धा किलो, ७०० ग्रॅमपर्यंत भरते. तर पेरूच आकारही ५०० ते ८०० ग्रॅमपर्यंत जातो. तोंडलीचे व्यवस्थापन काटेकोर ठेवल्याने चकाकी, रंग, टवटवीतपणा प्राप्त होतो. त्यामुळे बाजारपेठेत त्यास उठाव मिळतो. ड्रॅगन फ्रूटची जागेवर विक्री होते.

तर शेवगा व पेरूची विक्री भुसावळ येथे केली जाते. तोंडली जळगाव येथील बाजारात पाठविली जाते. स्थानिक विक्रेतेही शेवगा व पेरूची मागणी नोंदवितात. त्यांनाही किरकोळ स्वरूपात विक्री जागेवरच केली जाते. शेवग्याचे हिवाळ्यात एकरी दर महिन्याला १० ते १२ क्विंटल तर उन्हाळ्यात २८ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. विजय नवनवे प्रयोग शेतात राबवितात. तज्ज्ञ, अभ्यासू शेतकऱ्यांच्या संपर्कात नेहमी असतात. त्यांना पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, डॉ. धीरज नेहेते, भुसावळ येथील ‘आत्मा’चे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव आदींचे मार्गदर्शन मिळते.

उत्पन्नाचा बारमाही ओघ

एका पिकाचा हंगाम संपला की दुसऱ्याचा सुरू होतो. असा रीतीने चक्राकार व बारमाही पद्धतीने पैशांचा ओघ सुरू राहतो. प्रामुख्याने तोंडली पिकाने चौधरी यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भर घातली आहे. सणासुदीसह पितृपक्ष, नवरात्रोत्सवात तोंडलीची काढणी सुरू असते. पावसाळ्यात भाजीपाल्याचा तुटवडा असतो.

या काळातही तोंडलीचे उत्पादन सुरू असते. त्यास ४० ते २० रुपये प्रति किलो दर मिळतो. पेरूला दसरा, दिवाळी या कालावधीत चांगले ‘मार्केट’ व ४० ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतात. ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन जुलैपासून दिवाळी, नोव्हेंबरपर्यंत सुरू असते. त्याची जागेवर प्रति किलो १५० व कमाल २०० रुपये दराने विक्री होते. शेवग्याचे उत्पादन हिवाळ्यात किंवा ऑक्टोबरच्या मध्य काळात सुरू होते. या काळात प्रति किलो कमाल दर ७० ते १०० रुपयांपर्यंत मिळतो. २५ रुपयांपर्यंतही त्याचे दर घसरतात. तोंडली व शेवग्याची आवक उन्हाळ्यात अधिक असते. या काळात त्यांना दर कमी मिळतो.

विजय चौधरी ९२२६४८७७३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com