Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नाशिक जिल्ह्यात ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल

Heavy Rain : नाशिक जिल्ह्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांची दैना झाली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांची दैना झाली आहे. ज्यामध्ये मका, सोयाबीन, भात, भाजीपाला, कांदा, द्राक्ष, डाळिंब अशा पिकांची ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके मातीमोल झाली आहेत. ज्यामध्ये ७३ हजार ३५० शेतकरी बाधित झाले असून ४८९ गावांमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यानंतर या नुकसानीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाच्या अहवालात चांदवड, दिंडोरी व सटाणा तालुक्यात द्राक्ष बागांचे ५४२ हेक्टरवर नुकसान आहे.

जिल्‍ह्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे प्रामुख्याने जिरायती क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. कमी पाण्यावर येणारे पीक, पोल्ट्री उद्योगाची कुक्कुटखाद्य व प्रक्रियेसाठी मागणी वाढल्याने मका या नगदी पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मात्र ऐन काढणी सुरू असतानाच पावसाने मोठी नासाडी केली. शिवारात पाणी साचल्याने कणसे पाण्यात भिजल्याने पेरणीच्या १० टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. सटाणा, मालेगाव, देवळा व चांदवड तालुक्यांत हे नुकसान जास्त आहे.

चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत प्रतिकूल परिस्थितीत भाजीपाला लागवडी केल्या होत्या. मात्र मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी अतिवृष्टीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आहेत. सटाणा व मालेगाव तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. यंदा कांद्याला चांगला दर मिळत असतानाच पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवले आहे. काढणीस येणारा खरीप व लागवड केलेला लेट खरीप कांद्याचीही दाणादाण उडाली आहे. कांदे पाण्याखाली गेल्याने सडण्याची भीती आहे.

सोयाबीनसारखे गळीत धान्य पिकाचे चांदवड, निफाड, सटाणा व दिंडोरी तालुक्यांत नुकसान आहे. पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यात भाताला मोठा फटका बसला आहे. कळवण, देवळा व चांदवड तालुक्यांत रब्बी कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने संभाव्य उन्हाळ कांदा लागवडी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच कांदा बियाणे टंचाई असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा महागड्या बियाण्यांचा शोध घेऊन दुबार रोपवाटिका करण्याची वेळ येणार आहे.

जिल्ह्यात पीकनिहाय झालेले नुकसान

पिके नुकसानग्रस्त

क्षेत्र(हेक्टर)

मका १९,०३१.३०

सोयाबीन १,४०३.८०

भात १५४१.७६

टोमॅटो ५२६.५०

भाजीपाला व इतर १२,७०६.४०

कांदा ८२७५.३०

कांदा रोपवाटिका ४८३

द्राक्ष ५४२

डाळिंब ५५०

नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू झाले आहेत. पीक विम्यात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत तातडीने पूर्वसूचना देणे अपेक्षित आहे. तसेच नुकसान झालेल्या भागात सर्व्हेबाबत सूचना दिल्या आहेत.
कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT