Pune News : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे सुमारे अकरा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आदी पिकांची मोठी हानी झाली असून, कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यामध्ये १९ हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून, एकूण उत्पादनाच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
विविध पिकांबरोबरच फळबागांचेही नुकसान झाले असून, यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब आदी पिकांचा समावेश आहे. सध्या द्राक्षबागा फळधारणीच्या अवस्थेत असून, डाळिंब फूल धारणेच्या अवस्थेत आहेत. पावसामुळे द्राक्षघड आणि मण्यांमध्ये पाणी साठून घडकूज आणि डाउनीच्या प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाल्याने फवारण्यांचा खर्च वाढला आहे.
फळबागांप्रमाणेच शेतातील विविध पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये कांदा, बटाटा, मका, भाजीपाला, भात या पिकांचा समावेश आहे. नुकसानीमध्ये सर्वाधिक जुन्नर तालुक्यात ४ हजार ८१७ हेक्टर क्षेत्रांवरील पिकांची हानी झाली असून, सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर शिरूर तालुक्यात २ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रावरील पिके जमीनदोस्त झाली आहेत.
पाऊस व गारपिटीने झालेले नुकसान
तालुका --- गावे --- बाधित क्षेत्र (हेक्टर) --- नुकसानग्रस्त शेतकरी
जुन्नर --- ८८ --- ४८१७ -- ४५००
आंबेगाव --- ८१ --- २६१२ --६४२८
शिरूर --- १५ ---२८२४ --- ६१३०
हवेली --- ८ --- ३१९ ---३१९
मुळशी --- १६ --- १२०.२ ---३१९
मावळ ---६७१ ---३६१.६ --- ६७१
वेल्हा --- १९ -- ४०.९ --- २१६
भोर --- ७ --१२.४५ ---४९
खेड ---२७ ---१२० ---८२४
एकूण ---३१५ ---११०२७ -- १९७७३
मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे. त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.