Akola News : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा आता सर्वच पिकांना फटका बसू लागला. पाऊस, ढगाळ वातावरण, धुक्यामुळे पिकांचे नुकसान दरदिवसाला वाढत असून बुलडाण्यातील नुकसान प्राथमिक अंदाजानुसार ६२ हजार, तर अकोला १४ हजार हेक्टरवर नुकसान पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला दोन दिवस पडलेला पाऊस रब्बीसाठी पोषक मानला जात असताना आता हाच पाऊस रब्बी पिकांसाठीही मारक ठरू लागला. सध्या रब्बी हंगामाचा विमा काढण्याचा कालावधी सुरू असून पोर्टल बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे.
या भागात २७ नोव्हेंबरपासून अवेळी पावसाने ठाण मांडलेले आहे. सुरुवातीचे दोन दिवस पावसाचा जोर अधिक होता. सध्या जोर कमी झाला तरी सतत पाऊस येत असल्याने पिकांना मारक ठरू लागला. सध्या शेतशिवारात खरिपातील कपाशी, तूर आणि रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्याचे पीक उभे आहे.
या चारही पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने कापूस ओला झाला. तुरीचा फुलोर गळाला असून शेंगावर कीडरोगांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला. आता रब्बीतील गहू, हरभऱ्यालाही पाऊस बाधक होत आहे.
प्रामुख्याने हरभऱ्याच्या पिकात सततच्या पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हरभरा पिवळसर होऊन झाड जागेवरच वाळते आहे. एकाचवेळी संकटांची मालिका सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. शुक्रवारी (ता. १) पहाटेपासूनच अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती.
पीकविमा पोर्टल बंद
रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकरी पोर्टलवर जात असताना हे पोर्टल मागीत दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या गहू, हरभऱ्याचा विमा काढण्याचा कालावधी सुरू झालेला आहे. विमा काढून कंपनीकडे नुकसानाची तक्रार देता येईल या उद्देशाने अनेक शेतकरी दररोज सीएससी केंद्रावर जात आहेत. मात्र, पोर्टल बंद असल्याने पीकविमा काढण्याचे काम थांबलेले आहे.
अकोला जिल्ह्यातील लिंबू उत्पादक हवालदिल
जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे लिंबू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊन नुकसान होऊ शकते, असे शेतकरी सांगत आहेत. सर्वच लिंबू बागा सध्या ताणावर होत्या आणि लिंबू उत्पादक शेतकरी बागा फुटण्याच्या प्रतीक्षेत होते. काही ठिकाणी बागा फुटण्यास सुरुवातही झाली होती.
पण अचानक झालेल्या अतिपावसामुळे बागा फुटण्याच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होऊन अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे लिंबू उत्पादनात घटीची शक्यता वाढत चालली आहे. सलग पावसाळी वातावरणामुळे लिंबू उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.