Crop Protection
Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : पीक संरक्षण आधुनिक; पण महाग होणार

टीम ॲग्रोवन

सारे जग भविष्यातील शेतीचा (Future Agriculture) वेध बारकाईने घेत आहे. हवामान बदल (Climate Change) ही जागतिक समस्या डोळ्यासमोर ठेवून आता कृषी क्षेत्रातील सर्व घटक संशोधनाच्या कामाला लागलेले दिसतात. तापमान, पाऊस, आर्द्रता (Humidity) या तीनही घटकांमधील होणारे चढउतार चिंताजनक असून त्याचे पडसाद शेतीच्या भविष्यकालीन नियोजनावर होतील. राजस्थानात महापूर, चीनमध्ये दुष्काळ (China Drought), युरोपात तापमान वाढ असे हवामान बदलाचे विचित्र परिणाम आपण एकाचवेळी सध्या पाहत आहोत. त्यामुळे पीकरचनेत (Crop Pattern) मोठे बदल होऊ शकतात.

हरित उत्सर्जनाचे चांगले वाईट परिणाम होतील. कारण, कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढेल. पण हाच वायू, पाणी आणि सूर्यप्रकाशातून पीक वनस्पती अन्ननिर्मिती करतात. त्यामुळे कार्बन वायू वाढणे काही पिकांना फायदेशीर राहील. मात्र गव्हासारख्या पिकांसमोर मोठ्या समस्या उद्भवतील. एक डिग्रीने तापमान वाढले तरी गव्हाच्या उत्पादनात हेक्टरी १० क्विंटलने घट होईल. त्यामुळे कमी दिवसांत येणारे व वातावरणातील बदलांना सहनशील असलेल्या जाती तयार करण्याकडे शास्त्रज्ञांची दिवसरात्र मेहनत सुरू आहे. वनस्पतींच्या वैविध्यपूर्ण रचनेचा बारकाईने अभ्यास करून रेण्वीय स्तरांमध्ये (मॉल्युक्युलर लेव्हल) बदल करीत पिकांच्या नव्या जाती आणल्या जातील.

अचानक दुष्काळ आल्यास पाण्याचा ताण सहन करणारी आणि अति पावसातदेखील तगून राहणाऱ्या जाती शेतकऱ्यांच्या हाती येतील. जनुकीय संपादन (जीन एडिटिंग) तंत्राद्वारे हे शक्य होईल. जैव सुरक्षिततेच्या अंगाने वनस्पतीच्या जनुकीय रचनेत बदल करून पोषण तत्त्वे वाढविलेल्या ‘बायोफोर्टिफाइड’ अन्नधान्याला यापुढे मागणी राहील. त्यामुळे जादा लोह असलेली बाजरी, अधिक जीवनसत्त्वे असलेली केळी अशी अतिपोषण मूल्ये असलेली धान्य व फळे बाजारात दिसू लागतील.

दुसऱ्या बाजूला जमिनीचे कुपोषण वाढेल. उसाचे हेक्टरी ५० टन उत्पादन घेणे म्हणजे वर्षभरात जमिनीतून ५० टन जैव घटक (बायोमास) उपसले जाते. त्याबदल्यात आपण जमिनीला नगण्य अन्न देत आहोत. त्यात पुन्हा खतांच्या किमती वाढत जाणार असल्यामुळे वरखतांचे प्रमाणही कमी होत जाईल. त्यामुळे सेंद्रिय कर्बाची समस्या आणखी गंभीर होईल. त्यावर पर्याय म्हणून अतिसूक्ष्म (नॅनो) तंत्रज्ञानावर आधारित खतांचा वापर वाढेल. दाणेदार युरिया टाकल्यानंतर सध्या ७० टक्के वाया जातो; पण त्याऐवजी नॅनो युरियाची पानांवर फवारणी केल्यास वाया जाण्याचे प्रमाण अवघे ३० टक्के असते. त्यामुळे नॅनो तंत्रज्ञानाने यापुढील निविष्ठा जगत व्यापले जाईल.

वातावरण बदलामुळे भविष्यात कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकेल. यापूर्वी नगण्य (मायनर) असलेल्या किडी मोठ्या (मेजर) प्रमाणात दिसू लागतील. तसेच, ‘होस्ट प्लॅन्ट’ बदलून किडी आता नको त्या झाडांवरही वाढतील.

त्यामुळे पर्यावरणपूरक कीडनाशके असलेली नवी मूलद्रव्ये बाजारात येतील. अर्थात, पीक संरक्षणाचे घटक आधुनिक पण महाग असतील. कारण जगातील बलाढ्य कंपन्या संशोधन व व्यापारासाठी एकत्र येत आहेत. पैसे गुंतवत आहेत. त्यामुळे कमी वापरात जास्त किडींवर नियंत्रण देणारी नवी मूलद्रव्ये या कंपन्या आणतील. पण सामान्य शेतकऱ्यांना महागड्या निविष्ठा परवडणार नाहीत. अशावेळी समूह शेती पद्धत अधिक उपयुक्त ठरेल. समूह शेतीमधील कंपन्या, संस्था, गट ड्रोनद्वारे एकाचवेळी फवारणी करीत कीड-रोगांवर प्रभावी नियंत्रण आणतील. ही पद्धत शेतीमध्ये सर्वत्र स्वीकारली जाईल आणि ती शेतकऱ्यांच्या फायद्याचीही असेल.

आता दुसरा बदल शेतीशी निगडित पशुधनाचा सांगतो. पोल्ट्री, डेअरी यांचे अन्नव्यवस्थापन शेतीमधील पिकांवरच होते. त्यामुळे पशुधनासाठी वापरल्या जाणाऱ्या पिकांमध्येही आवश्यक घटकांना प्राधान्य देणारे तंत्र वापरले जाईल. पशुधन पिके अधिक पोषक बनतील. तुम्ही पाहत आहात, की सोयाबीनचा वापर पशुधनात मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे त्याचे क्षेत्र वाढते आहे. जगात जंगले नष्ट करून सोयाबीनची शेती विस्तारते आहे. जंगले नाहीशी होत असल्यामुळे मातीची धूप वाढलेली आहे. आधुनिक शेतीमुळे काही समस्या नव्याने जगासमोर उद्‍भवतील. त्याविषयी मी कधी तरी तुमच्याशी बोलेल. पण तूर्तास आधुनिक शेतीला सामोरे जाण्यासाठी आपण सारे सज्ज होऊ या!

(शब्दांकन ः मनोज कापडे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT