Crop Protection : हळद, आले पिकातील कीड नियंत्रण

सध्या हळद, आले पिकांची लागवड होऊन २ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हा कालावधी हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा (४५ ते ६० दिवस) असतो. हळदीच्या ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित होत असते.
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

डॉ. मनोज माळी, डॉ. सचिन महाजन

सध्या हळद (Turmeric), आले पिकांची लागवड (Ginger Crop Cultivation) होऊन २ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हा कालावधी हळद पिकाची (Turmeric Crop) शाकीय वाढ होण्याचा (४५ ते ६० दिवस) असतो. हळदीच्या ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची या अवस्थेमध्ये निश्‍चित होत असते. पावसाळी वातावरणात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते.

सध्या वातावरणात जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण (Cloudy Weather) मध्येच पाऊस अशी स्थिती आहे. बदलत्या तापमानामुळे हळद पिकावर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव (Pest And Disease Outbreak On Turmeric, Ginger Crop) होण्याची शक्यता असते. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकारावर अनिष्ट परिणाम होतो. दर्जेदार हळद उत्पादनासाठी कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.

१) कंदमाशी

प्रादुर्भावाची अवस्था ः अळी

ओळख ः

- माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. पाय शरीरापेक्षा लांब असतात.

- दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात.

अनुकूल घटक ः

लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक अनुकूल असतो.

लक्षणे ः

- कंदमाशी खोडाच्या बुंध्याजवळ किंवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. साधारण ५ ते ७ दिवसांत अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात.

- ही अळी उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरते. अळ्यांचा कंदामध्ये शिरकाव झाल्यामुळे तेथे रोगकारक बुरशी तसेच सुत्रकृमींचा प्रादुर्भाव होतो. परिणामी कंद मऊ होतात. कंदास पाणी सुटून ते कुजू लागतात.

फवारणी ः प्रतिलिटर पाणी

- क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि किंवा

- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि

१५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.

आमीष ः हेक्टरी सहा मातीची किंवा प्लॅस्टिकची पसरट भांडी घेऊन त्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम आणि दीड लिटर पाणी मिसळून शेतात ठेवावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन, त्यात पडून मरतात. कंदांचे नुकसान करण्याअगोदरच कंदमाशा मरत असल्याने विशेष प्रभावी उपाययोजना आहे.

Crop Protection
Crop Protection : भात पिकाचे प्रभावी संरक्षण

२) खोडकिडा

प्रादुर्भावाची अवस्था ः अळी

ओळख ः

- किडीचा पतंग आकाराने लहान व नारंगी रंगाचा असतो. दोन्ही पंखावर काळ्या रंगाचे ठिपके असतात.

लक्षणे ः

- खोडकिडीची प्रौढ मादी पतंग हळदीच्या कोवळ्या पानांवर अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर प्रथमतः पानांच्या कडेचे हरीतद्रव्य फस्त करते.

- अळी लालसर रंगाची असून शरीरावर काळे ठिपके असतात.

- अळी खोड व कंद पोखरते. खोडाला छिद्र करून आत शिरून आतील भाग खाते.

- खोडावर पडलेले छिद्र हे खोडामध्ये अळी जिवंत असल्याचे लक्षण आहे.

- प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या मध्यभागातील पान पिवळे पडलेले दिसते. कालांतराने खोड वाळायला सुरुवात होते.

नियंत्रण ः

- प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.

- प्रकाश सापळे एकरी १ याप्रमाणे वापर करावा.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- निंबोळी तेल ५ मिलि किंवा

- क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि

गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

Crop Protection
Turmeric : हळदीच्या वायद्यांवर बंदी नकोच !

३) पाने गुंडाळणारी अळी

प्रादुर्भावाची अवस्था ः अळी

प्रादुर्भाव कालावधी ः ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा दुसरा आठवडा.

ओळख ः

- प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असून, पंख काळसर तपकिरी रंगाचे असतात. पंखांवर पांढऱ्या रंगाचा मोठा ठिपका असतो.

- पूर्ण वाढलेली अळी अडीच ते ३.७ सेंमी लांब व हिरव्या रंगाची असते.

- कोष फिक्कट हिरव्या रंगाचा असतो.

- हळदीमध्ये या किडीच्या अंडी, अळी व कोष अवस्था अनुक्रमे ४-५, १३-२५ आणि ६-७ दिवस असतात.

लक्षणे ः

- अळी पाने गुंडाळून त्यातच लपते. पानांच्या आत राहूनच पाने फस्त करते.

- पूर्ण वाढ झालेली अळी पानाच्या गुंडाळीतच कोषावस्थेत जाते.

नियंत्रण ः

- प्रादुर्भाव दिसताच पानांवरील अळ्या व कोष वेचून नष्ट करावेत.

- अळीने गुंडाळलेली पाने खोडून गोळा करून अळीसह नष्ट करावीत.

- क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि

४) पाने खाणारी अळी

प्रादुर्भावाची अवस्था ः अळी

अनुकूल घटक ः पावसाळा सुरू झाल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढताच प्रादुर्भाव दिसू लागतो.

लक्षणे ः

- पाने सुरळी किंवा पोंगा अवस्थेत असताना ही अळी पानावर उपजीविका करते.

- पान खाऊन सुरळीमध्ये छिद्र करते. सुरळीतील पान पूर्णपणे उघडल्यानंतर एका सरळ रेषेमध्ये पानावर छिद्रे आढळून येतात.

नियंत्रण ः

- गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावेत.

फवारणी (प्रतिलिटर पाणी)

- डायमिथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि किंवा

- क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिलि

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४

डॉ. सचिन महाजन, ९४२११ २८३३३

(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com