Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crisis : कपाशीवर संकटांचा फेरा

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : कपाशी उत्पादक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदा परभणी, लातूर वगळता एकाही जिल्ह्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही. शिवाय हवामानाच्या प्रतिकूलतेचे संकट संपले नसल्याने कपाशीचे पुढचे भवितव्य काय हे सांगणे तूर्त कठीण होऊन बसले आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यांत सरासरी १० लाख ५९ हजार ३२४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९ लाख १८ हजार ३ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली. दुसरीकडे लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण ४ लाख ८५ हजार ८८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ५४ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. यापैकी परभणी वगळता एकाही जिल्ह्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही. दुसरीकडे लातूरसारख्या सोयाबीनची पेरणी जास्त असणाऱ्या जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.

पारंपरिक कापूस उत्पादक जिल्ह्याच्या तुलनेत लातूरचे क्षेत्र नगण्य असले तरी लागवडीतील वाढ लक्षणीय आहे. प्रामुख्याने जळकोट व अहमदपूर या लातूर जिल्ह्यातील तालुक्यांत कपाशीचे क्षेत्र दिसून येते. कपाशीचे पीक सध्या पाते फुले व बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे १० ते १२ बोंडांपासून ३० ते ४० पर्यंत बोंड भागनिहाय व व्यवस्थापननिहाय पक्व झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

एक ना अनेक संकटे कायम

सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिजोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी आकस्मिक मरचे संकट ओढावले. त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात यश आले. परंतु त्यानंतरही काही भागात अधूनमधून होत असलेल्या पावसाने आकस्मिक मरचे कपाशीवरील संकट अजून टळले नसल्याची स्थिती आहे. याशिवाय कीड, रोगांना पोषक स्थितीमुळे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव, बोंडसड, लाल्याचाही प्रादुर्भाव शेतकरी व शास्त्रज्ञांच्या पाहणीत आढळून आला आहे. बीड जिल्ह्यातील बीड, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव तालुक्यांत आकस्मिक मर प्रामुख्याने दिसून आली. त्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यांतील काही भागात कमी अधिक प्रमाणात आकस्मिक मरचे प्रमाण कायम असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

हवामानाची प्रतिकूलता कायम आहे. आता तर वादळी पाऊस होतोय. आमच्या परिसरात कपाशीची अपेक्षित वाढ झाली नाही. अतिपावसामुळे बोंडसड आकस्मिक मर आहे. काही पीक लाल-पिवळे पडून शेंडा वाळणे, पाने वाळणे, काडीच उभी राहते ही एक समस्या मोठी आहे.
ईश्‍वर सपकाळ तिडका. ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आहे. आकस्मिक मरचे प्रमाणही आहे.
दिलीप पाटील, जरंडी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर

तज्ज्ञांच्या फेरीत दिसली भुरी

छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांच्या नेतृत्वात पैठण, पाचोड, आडुळ, देवगाव, राजापूर, बिल्डा, पेंडगाव, मुर्शिदाबाद वाडी, बोरगाव अर्ज आदी गाव शिवारातील पाहणीत कपाशी पिकावर भुरी आणि करप्याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आढळून आला आहे. प्रमाणात लाल्या विकृतीही दिसून आल्याचे डॉ. झाडे म्हणाले. पोषक वातावरणामुळे हे संकट आहे. शेतकऱ्यांना गंधकयुक्त बुरशीनाशकाची फवारणी घेण्याचा सल्ला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र कमीच. महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिपावसामुळे कपाशीचे पीक पिवळे पडणे आकस्मिक मर काही प्रमाणात आढळून आली.
डॉ अरुण गुट्टे, विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र लातूर
अतिजोरदार पावसामुळे कपाशीत आकस्मिक मर काही प्रमाणात दिसली. त्यावर सुचविलेले उपाय ज्यांनी २४ ते ४८ तासांच्या आत केले त्यांच्या पिकात सुधारणा दिसली. त्यापेक्षा जास्त वेळाने उपाय केलेल्यांना सुधारणा दिसली नाही. काही ठिकाणी नगण्य प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.
डॉ. वसंत सूर्यवंशी, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, अंबाजोगाई, जि. बीड
यंदाच्या खरिपात पाच ते सहा एकरांत कपाशी लागवड केली आहे. सततच्या पावसाने मर रोगाचा तसेच मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.
सुखदेव तौर, शेतकरी, ढालेगाव, ता. गेवराई, जि. बीड
आमच्या शिवारात पोळ्याला पाऊस आला त्यानंतर पंधरवड्याचा खंड पडला. मोठ्या प्रमाणात फूल व पातेगळ झाली. हलक्या जमिनीत हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे आता दही आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे.
निवृत्ती घुले, वखारी, ता. जि. जालना

जिल्हानिहाय कपाशीचे सरासरी व प्रत्यक्ष क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा.... सरासरी...... प्रत्यक्ष

छत्रपती संभाजीनगर.. ३९४७७१.... ३६२४२०

जालना...३०९०५९.... २९१६७६

बीड...३५५४९३.... २६३९०७

लातूर...७५१२...१६२९४

धाराशिव....५२६०...५७९

परभणी.....१९२२१३...१९७९८६

हिंगोली....३८८२१....३०३८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Protection : मेटाऱ्हायझीअम बुरशींद्वारे पीक संरक्षण

Kolhapur Police : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ८०० कार्यकर्त्यांना अटक; शाह, राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम

Chicory : औषधी गुणधर्म असणारी चिकोरी

Agriculture Technology : स्मार्ट शेतीसाठी विद्युत मल्टी टूल वाहक

Vijay Wadettiwar On Chandrashekhar Bawankule : विरोध असतानाही बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड; वडेट्टीवार यांची टीका

SCROLL FOR NEXT