Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : सोयाबीनसह हरभरा बीजोत्पादनात ‘मास्टरी’

Soybean and Gram Seed Production : परभणी जिल्ह्यातील कोक (ता. जिंतूर) येथील रमाकांत गोरे यांनी सुमारे १० ते १५ वर्षांपासून सोयाबीन व हरभरा बीजोत्पादनात सातत्य जपले आहे.

माणिक रासवे

परभणी जिल्ह्यातील कोक (ता. जिंतूर) येथील रमाकांत गोरे सोयाबीन व हरभरा बीजोत्पादनात प्रसिद्ध झाले आहेत. सुमारे १० ते १५ वर्षांपासून या शेती पद्धतीत त्यांनी सातत्य राखले आहे. करवली (ता. जिंतूर) शिवारात त्यांची हलकी ते मध्यम प्रकारची १५ एकर शेती आहे. खरिपात सोयाबीन, कापूस, तूर तर रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी, घरच्यापुरता भाजीपाला आदी त्यांची पिके आहेत. केसर आंब्याची १०० झाडे आहेत.

घरी पिकवून ते आंब्याची विक्री करतात. बीजोत्पादन पद्धतीतून बाजारभावांपेक्षा अधिक फायदा होतो. तसेच शेतकऱ्यांनाही खात्रीशीर बियाणे दिल्याचे समाधान होते अशा दुहेरी हेतूने गोरे सोयाबीन व हरभरा यांच्या बीजोत्पादनाकडे वळले. पूर्वी सरकारी कंपनीसाठी सोयाबीन, हरभरा यासह कांदा बीजोत्पादन घेतले. परंतु दर परवडत नसल्याने व अर्थकारण तेवढे समाधानकारक होत नसल्याने अलीकडील काळापासून स्वतः थेट विक्री सुरू केली आहे.

शास्त्रज्ञांकडून घेतले धडे

सन २००६ मध्ये कोक येथे प्रत्येक शुक्रवारी होणाऱ्या शेतीशाळेत सर्व ज्ञान गोरे यांनी घेतले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृदाविभागातील शास्त्रज्ञ, पैदासकार यांच्याकडूनही तंत्रज्ञानाचे धडे घेतले. इक्रिसॅट, हैदराबाद येथे कृषी विद्यापीठात आयोजित अभ्यास सहलीतही कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा त्यांचा अभ्यास झाला. विविध प्रशिक्षणांत त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या शेतीला मान्यवर शास्त्रज्ञांच्या भेटी होतात.

बीजोत्पादनात हातखंडा

कृषी विद्यापीठांचे तसेच राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडील सुधारित वाणांचे बीजोत्पादन गोरे करतात. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सोयाबीनच्या एमएयूएस ७२५ व एमएयूएस ७३१ या वाणांचे यंदा बीजोत्पादन घेतले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या केडीएस ९९२ (फुले दूर्वा) या वाणाचे मागील उन्हाळी हंगामात बीजोत्पादन घेतले. त्याचे तीन किलो बियाण्यापासून तीन क्विंटल उत्पादन मिळाले. शंभर रुपये प्रति किलो दराने विक्री केली. इंदूर येथील राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संचालनालयाच्या एनआरसी १४२ या वाणाचे यंदा चांगले उत्पादन मिळाले. एमएयूएस ७२५ वाणात २५ ते ३० टक्के शेंगा चार दाण्याच्या आहेत. त्यामुळे उत्पादकता अधिक मिळते. हा वाण यलो मोझॅक रोगास सहनशील आहे असा गोरे यांचा अनुभव आहे.

सोयाबीन बीजोत्पादन- ठळक बाबी

दरवर्षी १० ते १२ एकरांत बीजोत्पादन. ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राद्वारे रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर. दोन ओळींत दोन फूट, तर दोन झाडांतील अंतर सहा इंच ठेवून लावण. या पद्धतीने एकरी १० ते १२ किलो बियाणे लागते.

दरवर्षी एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा पावसाच्या खंडामुळे एकरी ८ क्विंटलपर्यंत उत्पादन. खंडकाळात तुषार संचाद्वारे पाणी.

रोगप्रतिकार क्षमता व अधिक उत्पादकता असलेल्या वाणांचे थोड्या क्षेत्रावर उत्पादन. मिळणाऱ्या निष्कर्षानुसार पुढील वर्षी क्षेत्र वाढविण्याचे नियोजन.

हरभरा बीजोत्पादन

दरवर्षी ८ ते १० एकरांत बीजोत्पादन.

ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे दोन ओळींमध्ये १८ इंच अंतर ठेवतात.

परभणी कृषी विद्यापीठ विकसित सेमी काबुली बीडीएन ७९८ तसेच राजविजय या वाणांचे बीजोत्पादन. विद्यापीठाच्या रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्मा आदी घटकांचा नियमित वापर.

पेरणीनंतर २५ दिवसांनी कोळपणी. ४० ते ५० दिवसांदरम्यान जानोळ्याला दोरी बांधून दुसरी कोळपणी. त्यामुळे झाडांना माती लागते. आधार चांगला मिळून झाड वाऱ्याने पडत नाही. उत्पादकता वाढीस मदत होते.

घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकरी एकरी चार पक्षिथांब्यांचा वापर.

घरीच ३ ते ४ हौदांद्वारे गांडूळ खत निर्मिती.

उत्पादन

एकरी ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळते. दरवर्षी २५ ते ३० क्विंटल बियाण्याची विक्री होते. सध्या प्रति क्विंटल आठ हजार ते त्याहून अधिक दर किंवा पंचवीस किलोच्या बॅगेची किंमत दोन हजार रुपये आहे. यंदा बियाणे संपले आहे. मात्र येत्या उन्हाळी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे उपलब्ध असल्याचे गोरे सांगतात. सोयाबीन, हरभरा काढणी नंतर ‘स्पायरल सेपरेटर’द्वारे स्वच्छता व प्रतवारी होते. वाळवून तागाच्या पिशव्यांमध्ये साठवणूक होते. त्यामुळे उगवणशक्ती चांगली राहते. व्हॉट्‍सॲप, फेसबुकद्वारे विपणन केलेल्या बियाण्यास शेतकऱ्यांकडून मागणी असते. कर्नाटकापर्यंत बियाणे पोहोचले आहे. शेती व्यवस्थापनासाठी बैलजोडी, सालगडी आहे. गोरे यांना शेतीत कुटुंबातील सदस्यांची मदत होते.

गौरव गीताचे मानकरी

दिवाळी अंक, नियतकालिकांतून गोरे यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. शेतकरी जीवनाचे चित्रण करणाऱ्या कविता शेतकरी संघटनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सादर करतात. ‘अखंड वाढो प्रभा आमचा जिल्हा हा परभणी ही कविता त्यांनी लिहिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा गौरव गीत म्हणून त्याची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचा १ मे २०२२ रोजी तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT