Grain Agrowon
ॲग्रो विशेष

Millet : ‘श्री अन्न उत्कृष्टता’वरून जिल्ह्यात संभ्रम कायम

Millet Year 2023 : सोलापुर जिल्ह्यासाठी भरड धान्यावर आधारित मंजूर झालेला श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्प बारामतीला पळविल्याच्या प्रकरणावरून गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यासाठी भरड धान्यावर आधारित मंजूर झालेला श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्प बारामतीला पळविल्याच्या प्रकरणावरून गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना भरडधान्यासंबंधी सोलापूर आणि बारामतीचे दोन्ही प्रकल्प वेगळे आहेत, असे सांगितले आहे.

पण सोलापूरचा हा मुख्य प्रकल्प असून, त्या संबंधीच्या प्रशिक्षणाचा प्रकल्प बारामतीत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मग एकाच प्रकल्पाचे दोन भाग, दोन वेगवेगळ्या ठिकाणी कशासाठी केले गेले, यावरुन आता पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण आहे.

राज्याने पौष्टिक तृणधान्य उत्पादनाच्या वाढीसाठी तंत्रज्ञानाचा प्रसार, पीक प्रात्यक्षिके, यांत्रिकीकरण प्रक्रिया, मूल्यसाखळी विकास व प्रचार, प्रसिद्धीचा अंतर्भाव करत सोलापूर जिल्ह्याला श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्प मंजूर केला. वास्तविक, सोलापूर जिल्ह्यात ज्वारीसह अन्य तृणधान्याचे उत्पादन सर्वाधिक होते, हे लक्षात घेऊन हा प्रकल्प खास सोलापूरसाठी मंजूर केला.

सुमारे २०० कोटी रुपयांची तरतूद तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी केली. त्यानंतर जिल्ह्यात जिल्हाधिकारी- कृषी विभाग यांच्यात यासंबंधीच्या बैठकाही झाल्या. पण गेल्या महिना-दीड महिन्यात हा प्रकल्प थेट बारामतीकडे पळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

एवढेच नव्हे, ११ ऑक्टोबर २०२३ ला स्मार्ट प्रकल्पाच्या संचालकांनी हा प्रकल्प बारामतीकडे हलविण्याबाबत पत्रव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. यावरुन सोलापूर जिल्ह्यात संताप निर्माण झाला आहे.

दरम्यान, आता जिल्ह्यातील आमदार, खासदार खडबडून जागे झाले आहेत. यावर सुरू झालेल्या गदारोळानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याला पुष्टी देताना यावर सोलापूरचा प्रकल्प आणि बारामतीचा प्रकल्प दोन्ही वेगळे आहेत, असे स्पष्टीकरण दिले आहे. पण नेमके काय आणि कसे झाले आहे, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

पण ‘‘मी बारामतीचा लोकप्रतिनिधी आहे. बारामतीकर मला निवडून देतात. त्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे,’’ असे ठणकावून सांगायला मात्र ते विसरले नाहीत.

‘श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच’

‘‘सोलापूरला श्री अन्न उत्कृष्टता केंद्र जाहीर करण्यात आले आहे. त्या केंद्राचा मुख्य प्रकल्प सोलापुरातच होणार आहे. त्यापैकी केवळ प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि प्रशिक्षण केंद्र नसल्याने हे प्रशिक्षण केंद्र बारामती येथे होत आहे,’’ असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी (ता.२९) दिले.

सोलापुरात शेतकऱ्यांना प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी सोलापूरातील प्रशिक्षण संस्थांचीही नव्याने शोध मोहीम घेण्यात येत आहे. मूळ प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी ३० कोटी रुपयांच्या निधीतून सुरवातीला आवश्यक सुविधाही या प्रकल्पात उभारण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे प्रकल्पाबाबत कोणताही गैरसमज कोणीही करून घेऊ नये.’

सोलापूरला प्रकल्प, बारामतीला प्रशिक्षण

‘‘सोलापूरला होणारा श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्प आणि प्रशिक्षिण केंद्र दोन्हीही एकाच आवश्यक आहे. किंबहुना, ते अधिक सोईचे आणि फायद्याचे आहे, पण एक प्रकल्प सोलापूरला आणि दुसरा बारामतीला हे कसे काय होऊ शकते,’’ असा प्रश्‍न यशस्विनी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे यांनी उपस्थित केला आहे.

‘‘ज्वारीसह अन्य पिके सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यातच होतात, या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार तरुणांना रोजगार मिळेल. आजघडीला जिल्ह्यात १५० प्रक्रिया प्रकल्प आहेत, ही संख्या आणखी वाढू शकते, हे लक्षात घ्या,’’ असेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT