Nanded News : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे चालू आठवड्यात पूर्ण करा, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला दिले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले अनिल पाटील यांनी सोमवारी (ता. ९) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार मी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो आहे. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
आपण स्वत: शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची जाणीव असून सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असे ते म्हणाले. जिल्ह्यामध्ये चार लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा प्रचंड जोर होता, नदी-नाले तुडुंब वाहत होते. त्यामुळे परिसरातील शंभर टक्के पीक बुडाले आहे. अंतिम पंचनामे झाल्यावर नेमकी आकडेवारी पुढे येईल. पूर्ण पंचनामे झाल्यावरच नेमके किती नुकसान झाले हे ठरवता येईल, असे त्यांनी सांगितले.
२०२३ मध्ये झालेल्या नुकसानीपोटी नांदेड जिल्ह्यामध्ये पाच लाख ८२ हजार १२६ शेतकऱ्यांना ४४६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. केवळ १० हजार शेतकऱ्यांनी आपले बँकखाते अपूर्ण ठेवल्याने केवायसी न केल्याने वाटप प्रलंबित आहे. मात्र शेतकऱ्यांचे खाते व्यवस्थित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांना ही रक्कम मिळेल. शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
तातडीने यावर्षीची रक्कमही त्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी पंचनाम्याची गती वाढवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये झालेली जीवितहानी, जनावरांचे नुकसान, घराची पडझड याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बॅकवॉटरमुळे अनेक ठिकाणी विपरित परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या बॅकवॉटर संदर्भात मुंबई मंत्रालयात जलसंपदा विभागासमवेत बैठक लावण्यात येईल, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या वेळी आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव मांडला व त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच राज्य आपत्कालीन राखीव दलाच्या तुकडीचे मुक्कामाचे ठिकाण धुळेऐवजी हिंगोली येथे करण्यात यावे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळू शकते, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. वीजपुरवठा कंपनीचे जवळपास २०५ कोटींचे नुकसान झाल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
नांदेड तालुक्यातील आलेगाव, निळा शिवारात सोमवारी (ता. ९) मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीच्या काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जमीन खरडून जाणे, पिके वाहून जाणे, रस्ते वाहून जाणे, पुलांचे नुकसान होणे, घराची पडझड होणे अशा पद्धतीचे सगळेच नुकसान या भागात झाले आहे.
पाहणी दरम्यान शेकडो शेतकरी मंत्र्यांसोबत शेत दाखवायला, नुकसान दाखवायला उपस्थित होते. शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.