Solapur News : यंदाची आषाढी एकादशी १७ जुलैला असून त्या दिवशी पहाटे २.३० वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. यंदाची आषाढी वारी ६ ते २१ जुलै दरम्यान होणार असून प्रत्येक शासकीय विभागाकडून वारीनिमित्त करण्यात येणारी सर्व कामे कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपूर्वी पूर्ण करावीत अशा सूचना आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज आषाढी वारी २०२४ च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक झाली. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मोनिका सिंह ठाकूर, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य अधिकारी राजेंद्र शेळके,
माळशिरस उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, प्रत्येक शासकीय यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवावा. प्रत्येक विभागाने आषाढी वारी निमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. तसेच इतर विभागाकडून त्यांच्या विभागाशी संबंधित कामे ही त्या त्या विभागाशी पाठपुरावा करून पूर्ण करून घ्यावीत. आषाढी वारीत सर्व मानाच्या पालख्या त्यांच्या समवेत येणाऱ्या दिंड्या व लाखो वारकरी भाविक यांना प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उप विभागीय अधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एकत्रित बसून महत्त्वपूर्ण विषय कशा पद्धतीने मार्गी लावता येतील याचे नियोजन करावे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी पालखी मार्गातील जे किरकोळ कामे राहिलेली आहेत ते तत्काळ पूर्ण करावीत. पंढरपूर नगर परिषदेने वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात स्वच्छता चांगली राहील यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच वारीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी उत्कृष्ट राहतील याची खात्री करावी.
आयआरएस सिस्टीम
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आषाढी कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली तर त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली (इन्सिडेंट रेस्पोंस सिस्टीम) वापरण्यात येत आहे. ही सिस्टीम वापरणारा सोलापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. ढोले यांनी दिली. तसेच पालखी मार्ग व पंढरपूर शहरात ४२ आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे स्थापन करण्यात आलेली असून ही केंद्रे यात्रा कालावधीत २४ तास कार्यान्वित राहणार आहेत.
महत्त्वाच्या सूचना
अन्न प्रशासनाने हॉटेल्समधील अन्नपदार्थांची तपासणी करावी
महावितरणने ६५ एकर व पत्राशेड या ठिकाणी वीज कनेक्शन द्यावेत
पुरवठा विभागाने गॅस सिलिंडरची तपासणी मोहीम राबवावी
मंदिर समितीने दर्शन रांगेत भाविकांना सोयी सुविधा द्याव्यात
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील अतिक्रमणे हटवावीत
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.