डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
गावशिवाराची फेरी हे दिसायला साधे, सोपे असे तंत्र असले तरी ते लोकसहभाग वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात जास्तीत जास्त गावकऱ्यांची सक्रिय सहभाग असल्यास शिवाराची सद्यःस्थिती लक्षात येते. त्यावरून स्थानिक पातळीवर जलसंधारणाबाबतचे नियोजन ग्रामस्थांच्या सल्ल्यांना शास्त्रीय जोड देत करता येते.
शिवार फेरीदरम्यान गावाचे संपूर्ण चारही दिशांचे शिवार पिंजून काढावे महत्त्वाचे ठरते. तपासणी सूचीचा वापर करावा. अगदी सर्वच ठिकाणी सर्व ग्रामस्थांची उपस्थिती अनेक वेळा शक्य होत नाही. अशा स्थितीमध्ये किमान त्या त्या क्षेत्रामध्ये जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा सहभाग तरी मिळवावा.
ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांनी सहभागिता नोंदविल्यास प्रकल्प व्यवस्थापनास खूप मोठा फायदा होता. शिवार फेरीदरम्यान सरपंच, उपसरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती महत्त्वाची असते. सोबत जल व्यवस्थापनांतील तज्ज्ञ, भूजल तज्ज्ञ, पीक व्यवस्थापनातील तज्ज्ञ, प्राणीशास्त्र / वनस्पतिशास्त्र/ कीटकशास्त्र, भौगोलिक माहिती प्रणाली या विषयातील तज्ज्ञांचा समावेश सर्व्हेक्षण करणाऱ्या संघामध्ये असल्यास अधिक फायदा होतो. केवळ गडबडीने कमी माणसांमध्ये, तज्ज्ञांच्या शिवाय बनवलेला अहवाल व त्यावर आधारीत पुढील नियोजन फारसे फायदेशीर राहीलच असे नाही. कारण स्थानिकांची मते व अनुभव लक्षात न घेतल्यामुळे त्यांना कुणालाही होणारा प्रकल्प आपला असून, आपल्यासाठी केला जात असल्याचे जाणवत नाही.
महाराष्ट्रामध्ये बहुतांश सर्व ग्रामपंचायतींनी ‘लोकसहभागिय जैवविविधता नोंदवही’ (Peoples Biodiversity Register) बनविले आहे. शिवारफेरीमध्येच घेतलेल्या निरीक्षणातून नैसर्गिक साधन संपत्ती नकाशा पूर्ण करता येतो. यासाठी प्राणिशास्त्र/वनस्पतिशास्त्र/ कीटकशास्त्र यातील तज्ज्ञ सोबत असल्याचे अधिक फायदा होतो. गावठाणापासून अंदाजे ५०० मीटर, १००० मीटर, १५०० मीटर अशा अंतरावर होत जाणारे बदल व त्याची निरीक्षणे नोंदवावीत. उदा. बरीचशी गावे नदी अथवा ओढ्याकाठी वसलेली आहेत. त्या पाण्यावर संबंधित गाव विविध गरजांसाठी अवलंबून असते.
मात्र तो ओढा केवळ जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतच वाहून, नंतर कोरडा पडतो. यावरती उपाययोजना म्हणून या ओढ्याचे सर्वेक्षण करून त्यावर कुठे कोणत्या प्रकारेच बंधारे घालता येतील, याचे नियोजन करता येते. या उपचारांना ओघळीवरील उपचार असेही म्हणतात. जर पूर्वीपासूनच काही उपचार अस्तित्वात असतील, त्यांच्या अवस्था व करावी लागणारी देखभाल याबाबत चर्चा करता येते. काही उपचार अशास्त्रीय झाले असतील, कालबाह्य ठरत असतील तर त्याबाबतही योग्य ते निर्णय घेता येतात.
या फेरीमध्ये कृषितज्ज्ञ असल्यास शेतकऱ्यांच्या समस्या व त्यावर संभाव्य उपाययोजना यांचीही चर्चा होते. त्वरित मार्गदर्शन उपलब्ध होते. उदा. एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीचे पाणी जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आटते, अशा वेळी कोणते कमी पाण्यातील पीक घ्यावे किंवा एक दोन पाण्यांचाच कसा व कोणत्या वेळी वापर करायचा, पिकांच्या जल संवेदनशील अवस्थांचे मार्गदर्शन मिळाल्यास फायदा होतो.
भूजल तज्ज्ञ पाणी उपलब्धता वाढविण्याबाबत मार्गदर्शन करू शकतात. शेताशेजारील ओढा किंवा नाल्यामध्ये पाणी साठा वाढविण्यासाठी छोट्या उपाययोजना करणे शक्य असते.
शेतकऱ्याच्या शेती क्षेत्रामध्ये बांधबंदिस्ती किंवा उताराला आडवी पेरणी या उपायाद्वारेही पावसाचे पाणी अडवून साठवणे शक्य होते. पावसाचे पाणी अधिक साठवून भूजल साठा वाढवू शकतो. याशिवाय विहिरीचे पुनर्भरणही शास्त्रीयरीत्या करता येते. असे त्या त्या क्षेत्रानुसार योग्य ते उपाय तज्ज्ञ त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष सांगू शकतात.
एकंदरीत सर्व कामांचा व त्यासाठी आवश्यक खर्चाचे अंदाजपत्रक बनविता येते. याच पद्धतीने भेटी देत शेतकऱ्यांसोबत चर्चा करून जलआराखडा बनविता येतो. या संपूर्ण प्रक्रियेस नेट प्लॅनिंग (Net Planning) असे म्हणतात. प्रत्येक गटावरील नेट प्लॅनिंग एकत्र करून त्या गावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होतो.
मात्र कोणत्याही सर्व्हेक्षणाविना ओघळीवरील उपचारांच्या कामांचे नियोजन केले जाते. उदा. सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, वळण बंधारे इ. क्षेत्रीय उपचारांमधील सर्वेक्षणाबाबत आपल्याकडे प्रचंड उदासीनता आहे.
शिवार फेरीमध्ये गावातील शेतजमिनीची स्थिती, मातीचा पोत, भूमीक्षमता वर्गीकरण, मातीची खोली, वनस्पतीं, प्राण्यांची -पक्ष्यांची माहिती, हंगामनिहाय पिकांचे वर्गीकरण, त्यावर पडणारी रोगराई व उपाययोजना, परिसरात वापरात असलेल्या विहिरी व कूपनलिकांची संख्या, त्यातून होणारा जलसाठा व त्याचे तेथील दुष्काळाशी असणारे नाते, वीज उपलब्धतेची स्थिती, रस्त्यांची स्थिती, शेतीमालावरील प्राथमिक किंवा द्वितीय प्रक्रिया उद्योगांची उपस्थिती किंवा स्थिती, धुपेसाठी (चादरी, सालकाढी, घळई) प्रभावित जमिनीचे क्षेत्र, जमिनीच्या पोतानुसार व रासायनिक विश्लेषणानुसार पीक व फळपीक लागवडीचे नियोजन, गावातील पशुधनाची संख्या, त्यापासूनचे उत्पादन, चारा उपलब्धता इ. बाबत शिवार फेरीदरम्यान माहिती संकलित करता येते. त्यावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल बनवणे सोपे जाते. अशा लोकांच्या सक्रिय सभागातून माहिती संकलित केल्यामुळे लोकांचा उत्साह दुणावतो.
गावाच्या परिस्थितिकीय (Ecological) दृष्टिकोनातून जलसंसाधने खूपच महत्त्वाची ठरतात. जल उपलब्धतेनुसार स्थानिक परिसंस्था कार्यरत असते. भारतातील दुष्काळी भागामध्ये जलसंसाधनाच्या अभावामुळेच विविध परिसंस्था मोडकळीस आल्याचे निरीक्षण नोंदवलेले आहे. त्यामुळेच त्याचा समावेश पाणलोट व्यवस्थापनाच्या सामायिक मार्गदर्शक सूचनांमध्ये, २०११ (सुधारित) केला आहे. एकूणच गावातील परिसंस्थेसंदर्भात लोकांना जागरूक करून त्यांच्या संवर्धनाच्या दिशेने नेण्यासाठी शिवार फेरी फायद्याची ठरते. गावातील संपूर्ण क्षेत्रांची माहिती घेऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचा नकाशाही तयार करता येतो.
त्याद्वारे गावातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या क्षमता, मर्यादा, संधी व समस्या जाणून (स्वॉट ॲनालिसिस) नियोजन करता येते. अशा प्रकारे केलेले नियोजन आराखडे हे अधिक शास्त्रशुद्धतेकडे जातात. त्यानुसार केलेली जलव्यवस्थापनाची कामे यशस्वी होण्याची शक्यता वाढलेली असते. अशा काटेकोर व्यवस्थापनातूनच हिवरेबाजार, राळेगणसिद्धीसारख्या यशकथा निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पारंपरिक पिकातूनच शेतीमध्ये यशोगाथा लिहिलेल्या आहेत.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१,
(संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे)
- डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१,
(प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.