
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
Public Participation In Rural Development : स्थानिकांच्या गरजांवर आधारित उपक्रम निश्चित केले जातात. प्रकल्प राबविताना पारदर्शकता राहून प्रकल्पातील प्रत्येक लाभार्थ्याचे सामाजिक उत्तरदायित्व निश्चित होते. या सर्व प्रक्रियांमुळे गावाचा सर्वांगीण सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व नैसर्गिक असा शाश्वत विकास होण्यास मदत होते.
त्यामुळे सहभागी ग्रामीण मूल्यांकन (Participatory Rural Appraisal, PRA) हा निकष देशांतर्गत पातळीवरील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) तर वापरतातच, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थाही (उदा. युनेस्को, यूएनडीपी, युएनइपी इ.) विकसनशील व अविकसित देशांच्या विकासाची कामे राबवितानाचा या निकषाचा वापर करतात.
एखाद्या निश्चित केलेल्या गावांच्या विकास प्रकल्पाच्या नियोजनामध्ये स्थानिक ग्रामस्थांनाच विश्वासात घेतले जाते. त्यांची त्या त्या विषयताली मते जाणून व त्यांचा समावेश विकास आराखड्यामध्ये केला जातो. या प्रक्रियेस सर्वसाधारण ग्रामीण सहभागी मूल्यावलोकन असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व स्तरांतील समाजघटक समाविष्ट असतील, याकडे खास लक्ष ठेवलेले असते.
त्यातून त्या त्या गावातील लोकांचे पारंपरिक शहाणपण, स्थानिक ज्ञान आणि मते यांचा विकासकामांमध्ये समावेश होतो. त्यांच्या विचारांना आवश्यक तिथे शास्त्रीय घटकांची जोड दिली जाते. या तंत्रामध्ये अनेक साधने वापरली जातात. प्रकल्पानुसार या साधनांची अदलाबदल करता येते.
रॉबर्ट चेंबर्स आणि गॉर्डन कॉनवे यांनी ‘गतिमान ग्रामीण मूल्यावलोकन’ (RRA) ही संकल्पना रुजविली होती. ही संकल्पना प्रथमदर्शनी योग्य वाटली तरी त्यात फारच कमी वेळेमध्ये माहिती गोळा केलेली असते. त्यामुळे त्यात काही त्रुटी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे या तंत्रामध्ये काहीसे बदल करण्यात आले.
वरील शास्त्रज्ञांनी मांडलेल्या माहितीच्या विश्लेषणात आणि नियोजनात समुदायाला सामील करण्याबाबत भारतातील ‘आगा खान ग्रामीण साह्य कार्यक्रम’ (AKRSP) या बिगर सांप्रदायिक, अशासकीय संस्थेचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी सहभागात्मक दृष्टिकोनात केलेल्या बदलामुळे भारतातील पहिला सहभागी ग्रामीण मूल्यांकन कार्यक्रम गुजरातमधील जुनागढ, लाठोदरा आणि अरेना गावात वापरला गेला.
ग्रामीण सहभागी मूल्यावलोकनाचे तंत्र पहिल्यांदा १९८३ मध्ये रॉबर्ट चेंबर्स या शास्त्रज्ञाने मांडले. काळानुरूप त्यामध्ये बदल होत गेले. हे तंत्र लोकसभागासाठी यशस्वी ठरू लागले. देशामध्ये ग्रामीण भागातील समुदायांना विकासात्मक प्रकल्पांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी व त्यांच्या ज्ञानाचे उपयोग करून घेण्यासाठी त्याचा फायदा होऊ लागला. हे तंत्रज्ञान वापरात आणलेल्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची काही उदाहरणे आपण पाहू.
केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात आला. यात समाविष्ट ग्रामपंचायती व प्रकल्पातील सर्व लाभार्थींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ग्रामीण सहभागी मूल्यावलोकनाची तंत्रे वापरण्यात आली. त्यासाठी खास त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा एकूण परिणाम प्रकल्पाच्या यशावर झाला. एकात्मिक पाणलोट कार्यक्रमासाठी केंद्राचा ६० टक्के, राज्याचा ४० टक्के निधी मिळत असते.
या कार्यक्रमाच्या विश्लेषणासाठी गावात ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे ग्रामसभा घेण्यात येत असे. त्यामध्ये सर्व लोकांना प्रकल्पाबाबत, त्याच्या आर्थिक तरतुदीबाबत आणि कामांच्या एकंदरीत फायद्यासंदर्भात चर्चा घडवली जाई. प्रकल्पातील तरतुदीनुसार ग्रामसभेतच सर्वसंमतीने ग्रामपंचायत पातळीवर सक्षम अशा पाणलोट समितीची रचना केली जाई. या समितीला कोणते अधिकार असतील आणि त्यांची कर्तव्ये कोणती, याचेही विवेचन केले जाई.
हे सर्व अवगत झाल्यानंतर प्रकल्पाचे यश कसे मोजायचे, याबाबत ग्रामीण सहभागी मूल्यावलोकनाचे प्रशिक्षणही काही निवडक ग्रामस्थांना दिले जाई. त्यामुळे गावातील प्रत्येक घटकांचा प्रकल्पामध्ये समावेश आहे का, प्रत्येक योग्य व समपातळीवर लाभ मिळतो, यांची अंमलबजावणी गावपातळीवरच करता येऊ लागली. त्यातून प्रत्येक हा प्रकल्प माझा आणि माझ्यासाठी राबवला जात असल्याची भावना निर्माण होत असे. आपोआप सक्रिय लोकसहभाग वाढत असे.
ग्रामीण सहभागी मूल्यावलोकन प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे
गावातील सार्वजनिक ठिकाणी सभेचे आयोजन करणे. त्यामुळे त्यात दुर्बल / गरीब / शेतकरी / मत्ताहीन लोकांना सहज समाविष्ट करता येईल.
चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रशिक्षकांनी आपली ओळख करून देणे व ग्रामस्थांची ओळख करून घेणे, ही सामान्य प्रक्रिया असते. त्यामुळे गावकऱ्यांकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुलभ होते.
ग्रामपंचायत पातळीवर हे प्रशिक्षण घेताना लोकांना उद्देश सहज समजेल अशा भाषेमध्ये स्पष्ट करावा.
ग्रामीण सहभागी मूल्यावलोकनाची जी तंत्रे आपण वापरणार आहोत, त्याबाबत ओळख करून देणे, त्याचे स्वरूप सांगणे व कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करणे.
‘पीआरए’ च्या साधनांचा वापर सुरू करणे.
पाणलोट क्षेत्र विकासाच्या दृष्टिकोनातून ‘पीआरए’ची खालील साधने आपण गावामध्ये वापरू शकतो.
तंत्र क्रमांक एक – ग्रामस्थांसोबत घनिष्ठता प्रस्थापित करणे.
यासाठी प्रकल्प कार्यान्वयीन संस्था या शासकीय असो की बिगर शासकीय ग्रामस्थासाठी त्या बाहेरच्या असतात. त्यांच्याबाबत विश्वास निर्माण होण्यासाठी व स्थानिक लोकांचे प्रकल्पाच्या संभाव्य कामांमध्ये सहकार्य मिळविण्यासाठी घनिष्ठता प्रस्थापित करणे गरजेचे असते.
ही जवळीक जितकी सामान्य माणसांच्या व त्याच्या कुटुंबाच्या पातळीवर निर्माण होईल, तितके फायद्याचे असते. त्यासाठी विविध स्थानिक सण, उत्सव, समारंभ यात सहभागापासून सुरुवात केली जाते. कुटुंबातील अन्य घटकांशी संपर्क वाढविण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची मदत घेतली जाते.
तंत्र क्रमांक २ - सामाजिक नकाशा
पाणलोट प्रकल्पांसाठी निवडलेल्या गावातील सामाजिक संरचना अभ्यास करण्यासाठी या तंत्राचा वापर होतो. ग्रामस्थांच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी उत्तर दिशा गृहीत धरून असा नकाशा रेखाटावा. यामध्ये समाजशास्त्राच्या तज्ज्ञांनी जास्तीत जास्त गावकऱ्यांचा सहभाग कसा होईल, यावर लक्ष देणे गरजेचे असते.
सामाजिक नकाशातून गावातील प्रत्येक समाजाची व त्यांच्यसाठी उपलब्ध सोयी सुविधा आणि अडचणी यांची माहिती एकत्रित स्वरूपात मांडली जाते. या संकलित माहितीचा सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये जरूर वापर करावा. संकलित केलेल्या माहितीचा नकाशा गावात रांगोळीच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी प्रथम रेखाटावा.
पुढे गावाच्या दर्शनीभागात कायमस्वरूपी लावावा. त्यात प्रकल्पानंतर होत गेलेले बदलही नोंदवत गेल्यास व त्या नकाशाचे वाचन ग्रामस्थांद्वारेच करून गेल्यास आपण कशी प्रगती करत आहोत, हे लोकांना लगेच समजते. या प्रक्रियेमुळे प्रकल्प व त्याच्या कामाविषयी लोकांना आपलेपणा वाटतो.
सामाजिक नकाशा रेखाटत असताना घ्यावयाची काळजी
गावठाणाच्या सीमांची व दिशांचे निश्चिती करणे. उत्तर दिशा गृहीत धरून नकाशा रेखाटावा.
ग्रामस्थांना नकाशा रेखाटण्यासाठी प्रवृत्त करणे.
नकाशामध्ये काही बदल असल्यास विचारणे. त्यांच्या सूचना लक्षात घेणे.
हे नकाशे शक्यतो ग्रामस्थांकडून तयार करून घ्यावेत. अगदीच अडचण आल्यास त्यांना साह्य करावे.
नकाशे काढताना तपासणी सूची उदा. प्रमुख रस्ते, देऊळ/मंदिर, पिण्याच्या पाण्याचे नळ, हातपंप, ग्रामपंचायत इमारत, शाळा, समाजगृहे, वस्त्या, दवाखाने इ. बाबी स्पष्ट दर्शविणारी असावी.
नकाशा पूर्ण झाल्यानंतर ग्रामस्थांकडून माहितीचे विश्लेषण करावे. त्यात दिसणाऱ्या विविध समस्या त्यांच्याकडूनच चर्चेतून काढून घ्याव्यात. त्या कशा सोडवता येतील, या दिशेने विचार प्रक्रिया न्यावी.
या तंत्रामुळे ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती तयार होऊन लोकसहभाग वाढतो.
- डॉ. चंद्रशेखर पवार ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे)
- डॉ. सतीश पाटील ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.