Climate Change  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलाचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना; राज्यसभेत केंद्र सरकारची कबुली

Monsoon Session 2025 : राज्यसभेत शुक्रवारी (ता. २५) विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी सांगितले की, देशातील काही भागांमध्ये फळ आणि भाजीपाला उत्पादनात ६५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

Dhananjay Sanap

New Delhi : शेती क्षेत्राला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे विविध पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत शुक्रवारी (ता. २५) विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी सांगितले की, देशातील काही भागांमध्ये फळ आणि भाजीपाला उत्पादनात ६५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

हवामान बदलामुळे विशेषतः अनियमित पावसाच्या सरी आणि वाढते तापमान यांचा फळभाज्यांच्या उत्पादनावर थेट परिणाम होत आहे. कांद्याच्या पिकात सलग सहा दिवस पाण्याचा साठा झाल्यास ३६.६ टक्के उत्पादन घटते. टोमॅटो पिकाच्या फुलधारणेच्या टप्प्यात जर तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर उत्पादनात तब्बल ६५ टक्क्यांपर्यंत घट होते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात तापमानात १.५ ते २ अंश सेल्सिअस वाढ झाल्यास सफरचंदाच्या उत्पादनात ३० टक्के नुकसान होते, असेही चौधरी यांनी सांगितले.

तापमानात एक अंश सेल्सिअस वाढ झाल्यास गोड्या पाण्यातील तसेच समुद्री माशांच्या विविध प्रजातींच्या अस्तित्वावर आणि त्यांच्या भौगोलिक वितरणावरही मोठा परिणाम होतो. खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनाला मध्यम तीव्रतेच्या हवामान बदलांचा फटका बसतो आणि यामुळे २० ते ४० टक्के नुकसान होते. तर पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा टोकाच्या हवामान घटनांमुळे ५० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यमंत्री चौधरी यांनी सांगितले की, डीआरआर धन १०० (कमला) आणि पूसा डीएसटी१ हे जिनोम एडिट केलेले भाताचे वाण सुरक्षित असून त्यांचा पिकांच्या जैवविविधतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. या वाणांची निर्मिती सार्वजनिक क्षेत्रात तयार झालेल्या बीपीटी ५२०४ आणि एमटीयु १०१० या पारंपरिक वाणांपासून झाली आहे. ही वाण पूर्णपणे देशी तंत्रज्ञानावर आधारित असून शेतकऱ्यांच्या बीज स्वातंत्र्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.

कृषी क्रांती

‘कृषी क्रांती ४.०’ या संकल्पनेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सांगितले की, कृषी उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी, शाश्वत शेतीसाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना राबविल्या आहेत.

‘किसान ई-मित्र’ नावाचे एआय आधारित आवाजावर चालणारे चॅटबॉट विकसित करण्यात आले असून, ते पीएम किसान सन्मान निधी योजनेसह इतर योजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती देते. हे चॅटबॉट ११ प्रादेशिक भाषांमध्ये उत्तर देत असून दरदिवशी २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळते. आतापर्यंत ९५ लाखांहून अधिक प्रश्नांची उत्तरे या प्रणालीने दिल्याचे ठाकूर म्हणाले.

हवामान बदलामुळे पिकांवर होणाऱ्या कीड प्रादुर्भावावर वेळेत उपाय करता यावा यासाठी ‘राष्ट्रीय कीड निरीक्षण प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एआय आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने पीकांवरील कीडप्रादुर्भाव लवकर ओळखता येतो. या प्रणालीचा वापर १० हजारांहून अधिक कृषी सहाय्यक करत असून ती सध्या ६१ पीकांवरील आणि ४०० पेक्षा जास्त कीटक ओळखू शकते, असा दावाही ठाकूर यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT