
Pune News : प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या गुगल कंपनीने भारतातील शेती क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या वापराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय शेती क्षेत्रासाठी ओपन सोर्स एआय आधारित एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) प्रकल्प सुरू केला आहे.
या एपीआयचे ‘अॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन’ असे नाव असून, भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी त्याचा वापर करण्यात येईल, असे गुगलने जाहीर केले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी एआय मॉडेलचा वापर करण्यात येणार असल्याचे गुगलने सांगितले आहे.
गुगल डीपमाइंडचे अॅग्रिकल्चर अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च लीड अलोक तळेकर म्हणाले, ‘भारतातील शेतकऱ्यांना फायदा करून देणे एवढ्यापुरता या तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित नाही. तर हवामान बदलाच्या (क्लायमेट चेंज) वाढत्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठीच्या प्रयत्नांना बळकटी देण्याच्या कामी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. त्यासाठी गुगलकडून व्यापक माहितीचे रूपांतर अत्यंत सुस्पष्ट आणि रिअल-टाइम डेटामध्ये करण्याचे काम सुरू आहे.’
एपीआय म्हणजे काय? ः
समजा, एक शेतकरी एका कंपनीचं अॅप वापरतो; ज्यामध्ये पाऊस, तापमान, मातीतील ओलावा यांची माहिती पाहता येते. परंतु हे अॅप पावसाची आणि तापमानाची माहिती हवामान खात्याकडून थेट घेत नाही. तर हवामान खात्याचा एपीआय वापरून माहिती घेतली जाते. म्हणजे एक प्रकारे अचूक माहितीसाठी एआयवर आधारित यंत्रणा काम करते.
आता गुगलच्या एपीआयमुळे पीक कोणतं आहे, शेताचं क्षेत्रफळ किती आहे, कधी पेरणी झाली आहे, कधी काढणी होणार आहे याची माहिती उपग्रह आणि मशिन लर्निंगच्या मदतीनं विविध ठिकाणांवरून मिळवता येणार आहे.
जेणेकरून शेती क्षेत्रातील कंपन्यांना नवीन तंत्रज्ञान विकसित करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अचूक माहितीचे विश्लेषण मिळणार आहे. यापूर्वी शेती क्षेत्रातील माहिती मिळविण्यासाठी एपीआय उपलब्ध नव्हता. त्यामुळे शेतीतील अचूक माहिती मिळवणे वेळखाऊ होते. गुगलच्या या प्रकल्पामुळे आता त्यामध्ये सुलभता येऊ शकते.
गुंतवणुकीला प्रोत्साहन ः
या प्रकल्पामुळे खासगी कंपन्यांना गुगल एपीआयच्या मदतीने अचूक माहिती मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठीच्या उपक्रमांमध्ये खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. या एपीआयचा वापर करून एआय आधारित विविध शेती उपयोगी मोबाइल अॅप्स तयार करता येणार आहेत.
या अॅप्सच्या मदतीने शेतकऱ्यांना माती, पाणी, हवामान आणि पीक उत्पादनाचा अंदाज मिळेल. त्यामध्ये अचूकता येण्यासाठी उपग्रह प्रतिमा (सॅटेलाइट इमेजरी) आणि मशिन लर्निगची मदत घेतली जाणार आहे. पिकांच्या लागवडीचे व काढणीची अचूक आकडेवारी उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील कर्जपुरवठा, जमिनीच्या नोंदी आणि हवामान बदलाचे पूर्वानुमानही शेतकऱ्यांना मिळेल, असा दावा गुगलने केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.